Nawazuddin Siddiqui Birthday Special: लहानपणापासून हा अभिनेता अतिशय सामान्य परिस्थितीत वाढला. शालेय जीवनातच त्याला एका मुलीवर प्रेम होतं, पण तिच्या नजरेत तो कधीच खास ठरला नाही. ती नेहमी 'कृषी दर्शन' पाहायची आणि त्याचाशी बोलायला वेळ द्यायची नाही. एकदा तिच्या या वागण्यामुळे निराश झालेल्या अभिनेत्याने तिला ठामपणे सांगितलं, 'एक दिवस मी तुला टीव्हीवर दिसेन.' हे वाक्य तेव्हा फक्त एक भावनिक प्रतिक्रीया होती, पण त्यामागे असलेली जिद्द पुढे त्याने त्याच्या आयुष्याचा मार्गच बदलून टाकणारी ठरली. हा अभिनेता आहे नावजुद्दीन सिद्दीकी.
नवाजुद्दीनने अभिनयाची वाट निवडली पण ती वाट सरळ नव्हती. वॉचमनची नोकरी करत त्याने पोट भरण्याचा प्रयत्न केला, पण शरीर आणि मन थकल्यानंतरही त्याने थिएटरमध्ये नाटकं केली. अनेकदा थकून तो बेशुद्ध व्हायचा आणि शेवटी त्याला नोकरी गमावावी लागली. त्याच्या आर्थिक परिस्थितीने इतकं टोक गाठलं होतं की एक वेळ अशी आली की त्याला आपल्या आईचे दागिने विकून दिवस काढावे लागले. पण नवाजुद्दीनने मेहनत आणि चिकाटी काही थांबली नाही. दिल्लीच्या 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'मधून अभिनयाचं प्रशिक्षण घेतल्यानंतरही बॉलिवूडमध्ये प्रवेश मिळणं कठीणच होतं. 'सरफरोश'मध्ये मिळालेल्या एका सेकंदांच्या भूमिकेनं त्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही. 'मुन्नाभाई एमबीबीएस'मध्ये छोट्या भूमिकेने त्याने त्याची अभिनयक्षमता दाखवली.
2012 हे वर्ष नवाजुद्दीनसाठी यशस्वी ठरलं. 'गँग्स ऑफ वासेपूर'मधील भूमिकेने त्याला खरी ओळख मिळवून दिली. या चित्रपटाने त्याच्या अभिनयातली खोली, व्यक्तिमत्त्वातील धार आणि एक वेगळाच रॉ चार्म प्रेक्षकांसमोर मांडला. यानंतर 'किक' चित्रपटात सलमान खानसारख्या सुपरस्टारसोबत त्याने खलनायकाची भूमिका साकारली आणि तोही चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजला. या चित्रपटाने तब्बल 378 कोटींची कमाई केली.
नवाजुद्दीनने त्याच्या प्रवासात केवळ मोठ्या पडद्यावरच नाही तर OTT माध्यमावरही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 'सेक्रेड गेम्स', 'रात अकेली है', 'मॅक माफिया' यांसारख्या प्रोजेक्ट्समधून त्याने अभिनयाची विविध रूपं दाखवली. 'बजरंगी भाईजान'मधील 'चांद नवाब' ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे.
हे ही वाचा: राशा थडानीचा 'टिप टिप बरसा पानी'वर धमाकेदार डान्स; चाहते म्हटले, 'ही तर रवीना पेक्षाही...'
आज नवाजुद्दीन सिद्दीकी केवळ अभिनेता नाही, तर संघर्ष, सातत्य आणि आत्मविश्वासाचे प्रतीक बनला आहे. त्याचे अनेक सिनेमे, त्याचा आलिशान बंगला, त्याचे पुरस्कार हे सगळं मिळवताना त्याने आपल्या मुळांशी नातं कधीही तोडलं नाही. त्याने गेल्याच वर्षी मुंबईत एक आलिशान बंगला विकत घेतला आहे. सूत्रानुसार हा बंगला जवळपास 12 कोटींचा आहे. त्याच्या यशामागे असलेली ही प्रत्येक पायरी, प्रत्येक अपयश आणि त्यातून उभारी घेण्याची जिद्द नव्या पिढीसाठी एक प्रेरणास्रोत ठरते. आज नवाजुद्दीन त्याच्या जीवनातील ते एक वाक्य आठवत असेल, 'एक दिवस मी तुला टीव्हीवर दिसेन' आणि आज तो केवळ टीव्हीवर नाही तर प्रेक्षकांच्या हृदयात कायमचा घर करून बसला आहे.