)
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एकच नाव गाजतंय ‘दशावतार’! 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्याच दिवशी रिलीज झालेले ‘आरपार’ आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’ हे चित्रपटही यशस्वी ठरले, मात्र *‘दशावतार’*ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. कोकणातील निसर्गसौंदर्य, स्थानिक संस्कृती, परंपरा आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम असलेल्या या चित्रपटाने सिनेमागृहात प्रेक्षकांचा ओघ कायम ठेवला आहे. चौथ्या आठवड्यातही ‘दशावतार’ प्रेक्षकांना थिएटरकडे खेचत आहे. दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेला ‘बाबुली मेस्त्री’ हा व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी घर करून गेली आहे. बाबुली काकांची साधेपणातली शहाणपणाची भूमिका, आणि त्यातून उमटलेला सामाजिक संदेश यामुळे हा सिनेमा फक्त मनोरंजनापुरता मर्यादित न राहता एक विचार मांडणारा ठरला आहे.
आता प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे ‘दशावतार २’ म्हणजेच या चित्रपटाचा सीक्वेल येणार का? या चर्चेवर अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर हिने नुकतंच भाष्य केलं आहे आणि तिचं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. ‘नवशक्ती’ला दिलेल्या मुलाखतीत प्रियदर्शिनी म्हणाली, 'अनेक प्रेक्षकांचा आग्रह आहे की ‘दशावतार’चा पुढचा भाग यावा. मलाही तसं वाटतं. चित्रपटात बाबुली काका मला सांगतात ‘भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी तुझी, तू हा लढा पुढे चालू ठेव.’ हे वाक्यच पुढील प्रवासाची दिशा दाखवतं. त्यामुळे जर दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सीक्वेलचा विचार केला, तर मी एका पायावर तयार आहे.' तिच्या या विधानानंतर ‘दशावतार २’च्या शक्यतेवर चर्चा अधिकच रंगली आहे. ‘दशावतार’च्या शेवटी बाबुली मेस्त्री या व्यक्तिरेखेचा मृत्यू दाखवला जातो, पण त्याच वेळी वंदना (प्रियदर्शिनी इंदलकर) गावकऱ्यांना एकत्र करून गावाच्या विकासासाठी, त्यांच्या हक्कांसाठी लढा देण्याचा संदेश देते. त्यामुळे चाहत्यांना पुढील भागात वंदनाची भूमिका केंद्रस्थानी पाहायला मिळेल का, याची उत्सुकता वाढली आहे.
चित्रपटाच्या यशाबद्दल बोलायचं झालं तर, ‘दशावतार’ने 25 कोटींचा टप्पा पार केला असून, जगभरात या सिनेमाने तब्बल 26.43 कोटींची कमाई केली आहे. ओशन फिल्म्सची निर्मिती आणि झी स्टुडिओची प्रस्तुती असलेल्या, सुबोध खानोलकर लिखित-दिग्दर्शित या चित्रपटाने ग्रामीण आणि शहरी प्रेक्षक दोघांनाही आपलंसे केलं. चित्रपटातील प्रत्येक पात्र, त्यातील संवाद, आणि कोकणातील अप्रतिम दृश्यं या सगळ्यांनी मिळून ‘दशावतार’ला एक वेगळं स्थान मिळवलं आहे. सामाजिक जाण आणि परंपरेचा संगम दाखवणारा हा सिनेमा अनेकांना विचार करायला लावतो. आता चौथ्या आठवड्यातही या चित्रपटाच्या कमाईत सातत्याने वाढ होत आहे. सिनेमागृहात ‘हाऊसफुल्ल’ फलक झळकत आहेत आणि प्रेक्षक पुन्हा पुन्हा हा सिनेमा पाहण्यासाठी थिएटरकडे धावत आहेत.
अशातच प्रियदर्शिनीच्या वक्तव्यामुळे ‘दशावतार 2’च्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. दिग्दर्शक सुबोध खानोलकर पुढील काही महिन्यांत या विषयावर अधिकृत घोषणा करतील का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
FAQ
‘दशावतार २’ खरंच येणार आहे का?
अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने सांगितलं आहे की, दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी जर सीक्वेलचा विचार केला, तर ती त्यात काम करण्यासाठी “एका पायावर तयार” आहे. त्यामुळे ‘दशावतार 2’बाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
‘दशावतार २’मध्ये कोणती पात्रं दिसू शकतात?
पहिल्या भागात बाबुली मेस्त्रीचं पात्र (दिलीप प्रभावळकर) निधन पावलं आहे. त्यामुळे दुसऱ्या भागात वंदना (प्रियदर्शिनी इंदलकर) ही गावकऱ्यांना एकत्र करून लढा देताना दिसू शकते. तिची भूमिका अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे.
‘दशावतार’ चित्रपटाने किती कमाई केली आहे?
‘दशावतार’ने बॉक्स ऑफिसवर 25 कोटींचा टप्पा पार केला असून, जगभरात एकूण 26.43 कोटींची कमाई केली आहे. चौथ्या आठवड्यातही सिनेमागृहात प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कायम आहे.