'लेक दुआपासून हवा ब्रेक ' ; दीपिका पदुकोणने आई होण्याचा अनुभव सोशल मीडियावर केला शेअर

Deepika Padukone : दीपिकाने अलीकडेच इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेली स्टोरी प्रत्येक आईसाठी चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर तिने रीलच्या माध्यमातून आपले मन मोकळेपणाने व्यक्त केले आहे.

कावेरी पिंपळे | Updated: Mar 2, 2026, 05:57 PM IST
'लेक दुआपासून हवा ब्रेक ' ; दीपिका पदुकोणने आई होण्याचा अनुभव सोशल मीडियावर केला शेअर

बॉलिवूडची ‘मस्तानी’ अर्थात Deepika Padukone सध्या आपल्या जीवनातील सर्वात सुंदर टप्पा अनुभवत आहे. मुलगी दुआच्या जन्मानंतर दीपिकाचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं असून, मातृत्वाच्या प्रवासातील अनुभव तिने हळूहळू चाहत्यांसोबत शेअर करण्यास सुरुवात केली आहे. दीपिकाने सोशल मीडियावर आपल्या अनुभवांचे सविस्तर खुलासे करून, आधुनिक आईंच्या भावनांना शब्द दिले आहेत.

Add Zee News as a Preferred Source

नुकताच तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेली एक स्टोरी सध्या प्रत्येक आईसाठी चर्चेचा विषय ठरली आहे. दीपिकाने एका रीलच्या माध्यमातून आपल्या मनातील भावना खुल्या पद्धतीने मांडल्या आहेत. तिने मिश्किलपणे लिहिलंय की, “माझं टॉक्सिक ट्रेट हे आहे की मला माझ्या बाळावर इतकं प्रेम आहे की तिने कोणाकडेही बघू नये असं वाटतं… पण मला ब्रेकचीही गरज आहे… मी तिच्याशिवाय राहू शकत नाही… मला दिवसातील २४ तास शांतता हवी आहे… पण तरीही मला २४ तास तिच्याच सोबत राहायचं आहे!” या शब्दांत मातृत्वातील ओढाताण, प्रेम आणि स्वतःसाठीची गरज यांचे सुंदर मिश्रण दिसून येते.

दीपिकाची ही पोस्ट वाचून अनेक आईंनी कमेंट्स करून तिच्या भावना मान्य केल्या आणि दाद दिली. या पोस्टमुळे सोशल मीडियावर मातृत्वाच्या भावनिक अनुभवांवर चर्चा जोरात सुरू झाली आहे. मुलांवरचे प्रेम आणि स्वतःसाठी हव्या असलेल्या मोकळ्या वेळेतील संघर्ष दीपिकाने अतिशय प्रांजळपणे मांडला आहे.

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या ‘WAVES 2025’ समिटमध्ये दीपिकाने आई झाल्यानंतरच्या बदलांवर भाष्य करत म्हणाली, 'आई होणं हा माझ्यासाठी एक पुनर्जन्म आहे. आधी माझं आयुष्य फक्त माझ्याबद्दल होतं, माझं घर, करिअर, महत्त्वाकांक्षा. पण आता अचानक माझ्याकडे एका अशा जीवाचा ताबा आहे, जो प्रत्येक गोष्टीसाठी माझ्यावर अवलंबून आहे. ही जबाबदारी मला जीवनाकडे अधिक शिस्तीने आणि जागरूकपणे पाहायला शिकवते.' या शब्दांत मातृत्वाने तिच्या आयुष्यावर किती मोठा परिणाम केला आहे, हे स्पष्ट दिसते.

दीपिका आणि पती Ranveer Singh यांनी ठरवलं आहे की दुआला एका सामान्य आणि साध्या वातावरणात वाढवायचं, ज्यामुळे फिल्मी कुटुंबात जन्मल्यामुळे येणारा प्रसिद्धीचा दबाव तिला जाणवणार नाही. दीपिकाने आपल्या मुलीच्या सुरक्षेला प्राधान्य देत तिच्या सामान्य आयुष्यासाठी खास खबरदारी घेतली आहे.

मातृत्वामुळे दीपिकाच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनातही बदल झाला आहे. आता तिला छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद मिळवणं महत्त्वाचं वाटतं. तिने सांगितलं की पूर्वी ती फक्त करिअर आणि व्यक्तिगत महत्त्वाकांक्षांमध्ये गुंतलेली होती, पण आता प्रत्येक क्षण आणि अनुभव अधिक मौल्यवान वाटू लागला आहे.

दीपिकाच्या खुलास्याने सोशल मीडियावर मातृत्वाचा अनुभव आणि आधुनिक आईंच्या भावनांवर चर्चेला चालना मिळाली आहे. चाहत्यांनी तिच्या अनुभवावर सहानुभूती व्यक्त केली असून, मातृत्वातील संघर्ष, आनंद आणि भावनिक ओढाताण या सगळ्यांवर ती एक प्रेरणा ठरली आहे.

दीपिकाचा मातृत्व प्रवास हे केवळ एक व्यक्तिगत अनुभव नाही, तर अनेक आधुनिक आईंसाठी प्रोत्साहनाचे प्रतीक ठरत आहे, ज्यातून त्यांनी आपल्या जीवनातील संघर्ष, प्रेम आणि संतुलन यावर विचार करावा, अशी प्रेरणा मिळते.

About the Author

kaveri pimpley

कावेरी पिंपळे सध्या ‘झी २४ तास डिजिटल’मध्ये कंटेंट एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पत्रकारितेचा चार वर्षांचा अनुभव आहे.

...Read More