''नायक' चित्रपट पाहिल्यानंतर मी अनिल कपूरला विचारलं, एवढं सगळं...'; फडणवीसांचा खुलासा

Devendra Fadnavis FICCI : ‘FICCI FRAMES 2025’ कार्यक्रमात अक्षय कुमारने विचारलेल्या एका प्रश्नाव देवेंद्र फडणवीस यांनी 'नायक' चित्रपटाचा त्यांच्यावर कसा परिणाम झाला याबद्दल खुलासा केला आहे.   

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 7, 2025, 02:29 PM IST
''नायक' चित्रपट पाहिल्यानंतर मी अनिल कपूरला विचारलं, एवढं सगळं...'; फडणवीसांचा खुलासा

Devendra Fadnavis FICCI :  बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात ‘FICCI FRAMES 2025’ या कार्यक्रमात रंगलेला संवाद सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या खास मुलाखतीत अक्षय कुमारने राजकारण, चित्रपट आणि महाराष्ट्रावर एकामागोमाग एक रंजक प्रश्न विचारले. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या सर्व प्रश्नांना विनोदी, प्रामाणिक आणि दिलखुलास उत्तरं दिली.

Add Zee News as a Preferred Source

फडणवीस एक दिवस 'दिग्दर्शक' बनले तर... 

अक्षय कुमारने या मुलाखतीत विचारलं की, 'नायक' चित्रपटात अनिल कपूर हे एक दिवसाचे मुख्यमंत्री बनले. तसे तुम्ही एक दिवसासाठी फिल्म डायरेक्टर बनलात तर त्या चित्रपटाच नाव ‘महाराष्ट्र’ ठेवलं तर त्याचा पहिला सीन कसा असेल? त्यावर फडणवीस म्हणाले, 'जर महाराष्ट्रावर चित्रपट बनवायचा झाला तर पहिला सीन असा असेल की, छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकासाठी बसलेले असतील. इतक्या वर्षांच्या गुलामीनंतर स्वराज्याचं निर्माण होतंय हा क्षण दाखवणं म्हणजेच ‘महाराष्ट्र’ चित्रपटाचा सर्वात भव्य आरंभ असेल. मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरावर उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत उत्स्फूर्त दाद दिली.

'नायक' चित्रपटाने माझ्या समस्या वाढवल्या- फडणवीस

अक्षय कुमारने पुढे विचारलं की, 'कोणत्या चित्रपटाचा प्रभाव तुमच्यावर सर्वाधिक पडलाय? त्यावर फडणवीस हसत म्हणाले, 'चित्रपटांचा आपल्या भावना आणि संवेदनांवर मोठा प्रभाव पडतो. अनेक चित्रपटांनी मला प्रभावित केलं आहे पण ‘नायक’ चित्रपटाने तर माझ्या समस्या वाढवल्या. त्या चित्रपटात अनिल कपूर एक दिवसाचे मुख्यमंत्री बनतात आणि एकाच दिवशी एवढं काम करतात की लोक मला म्हणतात ‘तुम्ही पण नायकसारखं काम करा'.

'एकदा अनिल कपूर यांना भेटल्यावर मी त्यांना विचारलं ‘तुम्ही ‘नायक’ का बनवलात? आता लोकांना असं वाटतं, तुम्ही नायक आणि आम्ही नालायक! या चित्रपटाने लोकांच्या अपेक्षा उंचावल्या पण त्याचबरोबर एक बेंचमार्कही निर्माण केला असं फडणवीस म्हणाले. 

राजकारणातील रिअर हिरो कोण? 

अक्षय कुमारने या मुलाखतीत फडणवीसांना विचारलं राजकारणामधील तुमचा रिअल हिरो कोण आहे? यावर मुख्यमंत्र्यांनी ठाम उत्तर दिलं, 'आज भारताचा खरा रिअल हिरो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. भारतात दशकानुदशके गरीबी हटाओचे नारे दिले गेले पण गेल्या 10 वर्षांत मोदींनी प्रत्यक्ष 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं. आज भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. तंत्रज्ञान, संरक्षण, विकास अशा प्रत्येक क्षेत्रात आपण जगाशी स्पर्धा करत आहोत. मोदींनी ‘विकसित भारत 2047’ या स्वप्नाचं स्पष्ट चित्र आपल्यासमोर उभं केलं आहे असं ते म्हणाले. 

FAQ

‘FICCI FRAMES 2025’ कार्यक्रमात अक्षय कुमार आणि देवेंद्र फडणवीस यांचा संवाद कसा रंगला?

अक्षय कुमार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संवाद विनोदी, प्रामाणिक आणि दिलखुलास होता. राजकारण, चित्रपट आणि महाराष्ट्रावर रंजक प्रश्न आणि उत्तरांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

फडणवीस एक दिवस ‘दिग्दर्शक’ बनले तर ‘महाराष्ट्र’ चित्रपटाचा पहिला सीन कसा असेल?

फडणवीस म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सीन असेल. गुलामीतून स्वराज्य निर्माण होण्याचा हा भव्य आरंभ असेल.’ या उत्तरावर प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

‘नायक’ चित्रपटाचा फडणवीसांवर परिणाम कसा?

फडणवीस हसत म्हणाले, ‘नायक’ने माझ्या समस्या वाढवल्या. अनिल कपूर एक दिवसाचा CM होऊन एवढे काम करतो, म्हणून लोक मला म्हणतात, ‘तुम्हीही नायकसारखे करा.’ हे अपेक्षांचे बेंचमार्क वाढवते.

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More