मुकेश मिलमध्ये ‘उलाढाल’च्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शकाने पाहिलं भूत? सांगितला त्याचा धक्कादायक अनुभव!

Aditya Sarpotdar shares horror Experience : भीतीदायक सिनेमांसाठी ओळखले जाणारे आदित्य सरपोतदार यांनी मुलाखतीत शूटिंगवेळी घडलेल्या थरारक घटनेचा खुलासा केला.    

Intern | Updated: Nov 7, 2025, 05:42 PM IST
मुकेश मिलमध्ये ‘उलाढाल’च्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शकाने पाहिलं भूत? सांगितला त्याचा धक्कादायक अनुभव!

मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक आदित्य सरपोतदार हे सध्या त्यांच्या नवीन चित्रपट ‘थामा’मुळे चर्चेत आले आहेत. भयपटांच्या (हॉरर) जगतात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारे आदित्य यांनी याआधी ‘मुंज्या’, ‘काकुडा’, आणि ‘झोंबिवली’ सारख्या थरारक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. तर दुसरीकडे, ‘उलाढाल’, ‘क्लासमेट्स’, ‘फास्टर फेणे’, ‘सतरंगी रे’, ‘नारबाची वाडी’, आणि ‘उनाड’ अशा चित्रपटांमधून त्यांनी मनोरंजन आणि भावनिक कथांचा अनोखा संगम प्रेक्षकांसमोर आणला आहे.

Add Zee News as a Preferred Source

परंतु, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आदित्य सरपोतदार यांनी त्यांच्या आयुष्यातील एक धक्कादायक आणि अविस्मरणीय अनुभव शेअर केला आहे जो त्यांच्या ‘उलाढाल’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मुंबईतील प्रसिद्ध मुकेश मिल या ठिकाणी घडला होता.

शूटिंगदरम्यान घडलेला थरारक प्रसंग

‘बोल भिडू’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत आदित्य सरपोतदार यांनी हा प्रसंग सांगताना म्हटलं 'आम्ही ‘उलाढाल’चं शूटिंग मुंबईच्या मुकेश मिलमध्ये करत होतो. दुपारची शिफ्ट होती. आमच्या टीममधील एक तरुण कॉस्ट्युम डिझायनर मुलगी ब्रेकच्या वेळी गाडीत झोपली होती. काही वेळानंतर ती घामाघूम होऊन सेटवर आली आणि अचानक म्हणाली, ‘सर, मी घरी जाते!’' दिग्दर्शक पुढे म्हणाले 'मी तिला विचारलं, काय झालं? ती म्हणाली, ‘मी वॉशरूमला गेले होते. आत कोणी नव्हतं. पण मी आत गेल्यावर बाजूच्या वॉशरूममधून अचानक फ्लश दाबल्याचा आवाज आला. मी घाबरले. बाहेर आले तेव्हा कोणीच नव्हतं. मग दरवाज्याबाहेर पायांचे आवाज ऐकू आले, पण तिथंही कोणी नव्हतं.’ ती मुलगी इतकी घाबरली होती की गाडीत परत येताना तिच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवल्यासारखं तिला जाणवलं. 'ती म्हणाली, ‘सर, माझ्या मागे कुणीतरी आहे असं वाटलं. मी गाडीतून थेट उडी मारली आणि पळत आले.’ ती इतकी हादरली होती की म्हणाली, ‘कुणाला तरी माझ्यासोबत पाठवा, मी घरी जाते.’ आणि ती त्याच अवस्थेत निघून गेली,' असं सरपोतदार सांगतात.

भूत की कल्पना?

हा अनुभव खरा होता की ती मुलगी झोपेतून गोंधळली होती, याबद्दल दिग्दर्शकांनी स्पष्ट सांगितलं नाही. पण तिचा विश्वास पक्का होता की तिथं एखाद्या जुन्या डान्सर किंवा ज्युनियर आर्टिस्टचं आत्मा आहे. मुकेश मिल हे ठिकाण अनेक वर्षांपासून अंधश्रद्धा आणि भयकथांसाठी प्रसिद्ध आहे. 1980 च्या दशकात या मिलमध्ये भीषण आग लागली होती, ज्यात काही कामगार आणि कलाकारांचा मृत्यू झाला, अशी चर्चा आहे. तेव्हापासून या ठिकाणी वारंवार शूटिंगदरम्यान विचित्र गोष्टी घडल्याच्या अफवा पसरत आल्या आहेत. आदित्य सरपोतदार म्हणतात 'मुकेश मिलमध्ये अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांचं शूटिंग होतं. पण जिथं आग लागली होती, त्या भागात आजही रात्री फारसे लोक जात नाहीत. आमच्या टीममध्ये सगळे धैर्यवान लोक होते, पण त्या दिवशी सगळ्यांच्या अंगावर काटा आला होता.'

‘थामा’मुळे पुन्हा चर्चेत आदित्य

‘थामा’ या त्यांच्या नवीन चित्रपटामुळे आदित्य सरपोतदार पुन्हा एकदा चर्चेत आहेत. भय, रहस्य आणि भावनांचा संगम असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळी अनुभूती देणार आहे. आदित्य यांच्या मते, “भयपट फक्त घाबरवण्यासाठी नसतात, ते समाजाचं आणि मनाचं प्रतिबिंब दाखवतात.

FAQ
आदित्य सरपोतदार यांनी हा किस्सा कधी आणि कुठे सांगितला?
आदित्य सरपोतदार यांनी ‘थामा’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ‘बोल भिडू’ या युट्यूब चॅनेलवरील मुलाखतीत हा किस्सा सांगितला.

हा प्रसंग नेमका कुठे आणि कोणत्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडला?
हा भयानक प्रसंग मुंबईतील प्रसिद्ध मुकेश मिल येथे ‘उलाढाल’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडला.

या घटनेदरम्यान नेमकं काय झालं होतं?
टीममधील एका कॉस्ट्युम डिझायनर मुलीने वॉशरूममध्ये गेल्यावर फ्लशचा आणि पायांचा आवाज ऐकला, पण तिथं कोणीच नव्हतं. तिला पाठीमागून कुणीतरी हात ठेवल्यासारखंही जाणवलं, त्यामुळे ती घाबरून सेटवर परत आली.

About the Author