धर्मेंद्र यांच्या निधनाचं वृत्त खरं की खोटं? मुलगी ईशा देओलची Instagram पोस्ट, 'ते आता...'

Esha Deol Instagram Post on Dhamrmendra: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असून, त्यात सुधारणा होत असल्याचं ईशा देओलने सांगितलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 11, 2025, 10:31 AM IST
धर्मेंद्र यांच्या निधनाचं वृत्त खरं की खोटं? मुलगी ईशा देओलची Instagram पोस्ट, 'ते आता...'

Esha Deol Instagram Post on Dhamrmendra: बॉलिवूडचे हिमॅन धर्मेंद्र ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  प्रकृतीच्या कारणास्तव मागील अनेक दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र यादरम्यान त्यांच्यासंबंधी काही चुकीच्या बातम्या पसरत आहेत. अभिनेत्री आणि त्यांची मुलगी ईशा देओलने इंस्टाग्रामला पोस्ट शेअर करत वडिलांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आहे. तसंच सर्व दावे फेटाळून लावत खोट्या बातम्या पसरत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

ईशा देओलची इंस्टाग्राम पोस्ट

"मीडिया फार घाईत दिसत असून, खोट्या बातम्या पसरवत आहेत. माझ्या वडिलांची प्रकृती स्थिर असून, त्यात सुधारणा होत आहे. आम्ही सर्वांना आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करते. बाबांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद," असं ईशा देओलने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ESHA DEOL (@imeshadeol)

हेमा मालिनी यांचा संताप

"जे घडत आहे ते अक्षम्य आहे! जबाबदार चॅनेल्स उपचारांना प्रतिसाद देत असलेल्या आणि बरे होत असलेल्या व्यक्तीबद्दल खोट्या बातम्या कशा पसरवू शकतात? हे अत्यंत अनादरपूर्ण आणि बेजबाबदार आहे. कृपया कुटुंबाचा आणि त्यांच्या गोपनीयतेच्या गरजेचा योग्य आदर करा," अशी पोस्ट हेमा मालिनी यांनी केली आहे. 

याआधी हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची माहिती दिली होती. "रुग्णालयात निरीक्षणासाठी दाखल असलेल्या धरमजींबद्दल काळजी व्यक्त केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. त्यांच्यावर सतत लक्ष ठेवले जात आहे आणि आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत. त्यांच्या आरोग्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करा अशी मी विनंती करते," असं त्यांनी मह्टलं आहे. 

धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमध्ये झाला. त्यांचे पूर्ण नाव धरम सिंह देओल आहे. चाहते त्यांना प्रेमाने गरम-धरम म्हणतात. धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये "दिल भी तेरा हम भी तेरे" या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांची रेस्तराँची साखळीही आहे. शाहरुख खान, सलमान खान, अमिषा पटेल आणि गोविंदा यांच्यासह अनेक कलाकार त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. 

2012 मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण हा भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविण्यात आलं. सहा दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 'यादों की बारात', 'मेरा गाव मेरा देश', 'नौकर बीवी का', 'फूल और पत्थर', 'बेताब', यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. 

धर्मेंद्र केवल कृष्ण देओल यांचा जन्म पंजाबमधील लुधियाना येथील एका गावात झाला. त्यांनी 1954 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी लग्न केलं आणि नंतर चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. नंतर, ते अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले, ज्यांच्याशी दुसरं लग्न केले.

89 व्या वर्षीही धर्मेंद्र सोशल मीडियावर सक्रिय आहेत. निरोगी जीवनशैली आणि सेंद्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देणारे व्हिडिओ ते शेअर करत असतात. त्यांच्या अनेक इंस्टाग्राम पोस्टमध्ये ते ट्रॅक्टर चालवताना, शेताची काळजी घेताना आणि त्यांच्या चाहत्यांना साधे जीवनाचे धडे आणि शेतीच्या टिप्स देताना दिसत असतात.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More