वंदना गुप्तेंची सही घेण्यासाठी चाहत्याची भन्नाट आयडिया! अभिनेत्री म्हणाल्या, 'असं पहिल्यांदाच पाहिलं...'

वंदना गुप्तेंची सही घेण्यासाठी चाहत्याचं हटके पाऊल; अभिनेत्री आश्चर्यचकित!  

Intern | Updated: Oct 15, 2025, 01:41 PM IST
वंदना गुप्तेंची सही घेण्यासाठी चाहत्याची भन्नाट आयडिया! अभिनेत्री म्हणाल्या, 'असं पहिल्यांदाच पाहिलं...'

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं अनेक दशकांपासून जिंकली आहेत. नाटकं, मालिका आणि सिनेमांमधून त्यांनी आपली अद्वितीय कलाकौशल्याची छाप पाडली आहे. सध्या त्या ‘कुटुंब कीर्तन’ या नाटकातून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी रंगमंचावर दिसत आहेत. अलीकडेच या नाटकाच्या प्रयोगादरम्यान वंदना गुप्ते यांना एक अविस्मरणीय अनुभव आला. एका चाहत्याने त्यांची फरशीवर सही घेतली, आणि हा अनोखा क्षण अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केला.

Add Zee News as a Preferred Source

वंदना गुप्ते यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत लिहिलं 'आज ठाण्यातील ‘गडकरी रंगायतन’मध्ये ‘कुटुंब कीर्तन’ नाटकाचा प्रयोग झाला. मेकअप रूममध्ये एक गृहस्थ माझी सही घेण्यासाठी भेटायला आले. त्यांनी एका 2 बाय 4च्या टाइलवर माझी सही घेतली. मला थोडं आश्चर्य वाटलं, म्हणून कारण विचारलं.' त्यावर चाहत्याने उत्तर दिलं 'गडकरी रंगायतन हे ठाण्याचं वैभव आहे. जिथे अनेक महान कलाकार आपली कला सादर करत आले आहेत. रंगमंदिराचे नूतनीकरण करताना मी त्यातील 3-4 फरश्या घरी आणल्या. मी माझ्या आवडत्या कलाकारांची सही ह्या फरश्यांवर घेतो. माझ्या घराची एक भिंत सह्यांनी भरलेली असेल आणि ती माझ्यासाठी एक ऐतिहासिक, मौल्यवान आठवण ठरेल.'

वंदना गुप्ते म्हणाल्या 'मला खरंच खूप गलबलून आलं ते ऐकून. आमच्या कलेवर लोक किती प्रेम करतात हे जाणून छान वाटलं. खरं तर असे प्रेक्षक आहेत म्हणूनच आम्ही रंगमंचावर टिकून आहोत. बालगंधर्व उगाच नाही प्रेक्षकांना मायबाप म्हणत असत.' या हटके घटनेने सोशल मीडियावर चाहत्यांमध्येही मोठी चर्चा सुरू केली आहे. अनेकांनी वंदना गुप्ते यांच्या पोस्टवर कमेंट्स करत चाहत्याच्या प्रेमाचे कौतुक केले आहे. अभिनेत्रीच्या या अनुभवामुळे रंगमंचावर कलाकार आणि प्रेक्षक यांच्यातील भावनिक नाळ अधिक दृढ झाल्याचे दिसते. ‘कुटुंब कीर्तन’ नाटकाचा विषय पारंपरिक कुटुंबीय नाट्य आणि त्यातील भावनिक, सामाजिक आणि हास्यरस घटकांवर आधारित आहे. वंदना गुप्ते यांच्या अभिनयामुळे नाटकाला अधिक रंगत आणि जिवंतपणा मिळतो. त्यांच्या अनुभवाने प्रेक्षक आणि कलाकार यांच्यातील आत्मीयतेची आठवणही पुन्हा जागृत केली आहे.

FAQ
वंदना गुप्तेंला हटके अनुभव कसा आला?
वंदना गुप्तेंना त्यांच्या नाटक ‘कुटुंब कीर्तन’ च्या प्रयोगादरम्यान एका चाहत्याने फरशीवर सही घेतल्याने हा हटके अनुभव आला. अभिनेत्री थोड्या आश्चर्यचकित झाल्या आणि हा क्षण सोशल मीडियावर शेअर केला.

चाहत्याने फरशीवर सही का घेतली?
चाहत्याने सांगितले की, त्याने रंगमंदिराचे नूतनीकरण करताना 3-4 फरश्या घरी आणल्या आणि त्या फरश्या त्याच्यासाठी प्रिय कलाकारांची सही घेण्याची जागा बनवली. ही भिंत त्याच्यासाठी ऐतिहासिक आणि मौल्यवान आठवण असेल.

वंदना गुप्तेंने या घटनेबद्दल काय प्रतिक्रिया दिली?
वंदना गुप्तें म्हणाल्या की, 'मला खूप गलबलून आलं ते ऐकून. आमच्या कलेवर लोक किती प्रेम करतात हे जाणून छान वाटलं. खरं तर असे प्रेक्षक असल्यामुळेच आम्ही रंगमंचावर टिकून आहोत.'

About the Author