गोविंदा अचानक रुग्णालयात दाखल! काही तासांतच डिस्चार्ज, स्वतः दिली तब्येतीची माहिती

Govinda Health Update : प्रकृती बिघडल्याने गोविंदा यांना मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता ते घरी परतले असून त्यांनी आपल्या आरोग्याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे.  

कावेरी पिंपळे | Updated: Nov 12, 2025, 04:20 PM IST
गोविंदा अचानक रुग्णालयात दाखल! काही तासांतच डिस्चार्ज, स्वतः दिली तब्येतीची माहिती

बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि करिष्माई अभिनेता गोविंदा गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या समस्येमुळे चर्चेत आला होता. रात्री अचानक चक्कर आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने त्यांना मुंबईतील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल केले. मध्यरात्री दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीची तपासणी करून योग्य उपचार सुरू केले. केवळ 24 तासांच्या आत त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने दुपारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. गोविंदाच्या अचानक रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. सोशल मीडियावर #GetWellSoonGovinda हा हॅशटॅग ट्रेंड होत होता. अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. nदरम्यान, ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांनाही काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे दोन्ही सुपरस्टार्सच्या आरोग्याच्या बातम्यांमुळे चाहत्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र, आता धर्मेंद्र आणि गोविंदा दोघांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याने चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Add Zee News as a Preferred Source

गोविंदा यांनी दिली हेल्थ अपडेट

रुग्णालयातून बाहेर पडल्यावर मीडियाशी संवाद साधताना गोविंदा यांनी स्वतःच आपल्या प्रकृतीबाबत खुलासा केला. ते म्हणाले ' मी गेल्या काही दिवसांत खूपच मेहनत घेतली होती. अति व्यायामामुळे शरीर थकले होते आणि त्यामुळे मला चक्कर आली. योग आणि प्राणायाम उत्तम आहेत, पण मर्यादेपेक्षा जास्त व्यायाम करणं योग्य नाही. शरीर आणि मन दोन्ही संतुलित ठेवण्यासाठी योग आणि प्राणायामच सर्वोत्तम आहेत. डॉक्टरांनी मला औषधं दिली असून आता मी बरा आहे.' या वेळी गोविंदाचा नेहमीसारखा स्टायलिश अवतारही चर्चेचा विषय ठरला. काळा टी-शर्ट, चॉकलेटी जॅकेट, जीन्स आणि काळा चष्मा असा लूक घेऊन तो मीडियासमोर हजर झाला होता.

काय म्हणाले गोविंदाचे सल्लागार ललित बिंदल?

गोविंदाचे जवळचे मित्र आणि कायदेशीर सल्लागार ललित बिंदल यांनी सांगितलं की 'गोविंदाला मंगळवारी सकाळपासूनच अस्वस्थ वाटत होतं. संध्याकाळी त्यांची तब्येत आणखी बिघडली. चक्कर आणि अशक्तपणामुळे त्यांनी मला फोन करून मदत मागितली. मी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांच्या योग्य उपचारानंतर आता ते पूर्णपणे बरे आहेत.' ललित बिंदल यांनी पुढे सांगितलं की, गोविंदाची पत्नी सुनीता आहूजा एका लग्नसमारंभासाठी बाहेरगावी गेल्याने ती या काळात रुग्णालयात उपस्थित राहू शकली नाही. मात्र, गोविंदाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने कुटुंबीयांनी दिलासा व्यक्त केला आहे.

धर्मेंद्रबाबतही व्यक्त केला आनंद

गोविंदा यांनी रुग्णालयातून बाहेर पडल्यावर ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबतही आनंद व्यक्त केला. ते म्हणाले 'धर्मेंद्रजी माझ्यासाठी प्रेरणास्थान आहेत. ते आता ठणठणीत आहेत, हे ऐकून मला प्रचंड आनंद झाला. मी त्यांना प्रणाम करतो.' धर्मेंद्र आणि गोविंदा हे दोघेही बॉलिवूडमधील सर्वाधिक आवडते कलाकार मानले जातात. दोघेही आता रुग्णालयातून सुखरूप बाहेर पडल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी दोघांनाही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

चाहत्यांची प्रतिक्रिया

गोविंदाच्या डिस्चार्जनंतर ट्विटर (एक्स) आणि इन्स्टाग्रामवर चाहत्यांनी ;Get Well Soon Chi Chi' आणि 'Stay Strong Legend' असे संदेश शेअर केले. काहींनी त्यांच्या जुन्या कॉमेडी सीनचे क्लिप्स पोस्ट करून लिहिलं 'हास्याचा राजा परत आला! लवकर बरा हो गोविंदा!'

आरोग्याबाबत दिला संदेश

शेवटी गोविंदाने चाहत्यांना संदेश देताना म्हटलं 'शरीरावर अती ताण देऊ नका. आरोग्य सर्वात मोठं धन आहे. थोडा वेळ स्वतःसाठी काढा, योग आणि प्राणायामाचा सराव करा. हाच खरा बॅलन्स आहे.' गोविंदाच्या जलद बरे होण्याने बॉलिवूडमध्येही दिलासा मिळाला आहे. त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्स आणि रिअॅलिटी शोच्या शेड्युलबद्दल मात्र अद्याप काही अपडेट आलेलं नाही. मात्र सध्या ते घरी विश्रांती घेत आहेत आणि लवकरच पुन्हा कामावर परतण्याची अपेक्षा आहे.

FAQ
गोविंदाला रुग्णालयात का दाखल करण्यात आलं होतं?
अति व्यायाम आणि थकव्यामुळे त्यांना चक्कर येऊन रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

गोविंदा सध्या कसे आहेत?
त्यांच्या प्रकृतीत पूर्ण सुधारणा झाली असून डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला आहे.

धर्मेंद्र आणि गोविंदाच्या आरोग्याविषयी काय अपडेट आहे?
दोघेही आता ठणठणीत असून चाहत्यांचे आभार मानत आहेत.

About the Author

kaveri pimpley

कावेरी पिंपळे सध्या ‘झी २४ तास डिजिटल’मध्ये कंटेंट एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पत्रकारितेचा चार वर्षांचा अनुभव आहे. ...Read More