एकेकाळी प्रसिद्धीच्या शिखरावर असणारा रॅपर हनी सिंग (Honey Singh) याच्या आयुष्यावर आधारित डॉक्युमेंट्री नुकतीच रिलीज झाली आहे. या डॉक्युमेंट्रीच्या सुरुवातीलाच सांगण्यात आलं आहे की, 'नऊ वर्षांनंतर, नेमकं काय झालं हे मला तुम्हाला सांगू दे. मी आज जे कॅमेऱ्यावर सांगणार आहे ते कोणालाच माहिती नाही'. यानंतर या डॉक्युमेंट्रीतून अनेक मोठे गौप्यस्फोट होणार आहेत याचा अंदाज येतो.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या डॉक्युमेंट्रीत रॅपर हनी सिंगने अमेरिका दौऱ्यात शाहरुख खानने कानाखाली मारल्याच्या अफवांवर भाष्य केलं आहे. शाहरुक खानने कानाखी मारल्यानंतर त्याच्या डोक्यात टाके पडले अशी चर्चा होती. पण ही अफवा खरी आहे का?
हनी सिंगने सांगितलं की, त्याने शाहरुखच्या चेन्नई एक्स्प्रेस या चित्रपटासाठी ब्लॉकबस्टर 'लुंगी डान्स' केल्यानंतर, अभिनेत्याने त्याला त्याच्यासोबत दौऱ्यात येण्यासाठी विचारलं होतं. हनी सिंगकडे खूप काम असतानाही त्याने ही ऑफर स्विकारली होती.
दौऱ्यादरम्यान एका संध्याकाळी, आपण परफॉर्म करण्याच्या स्थितीत नव्हतो. तरीही सक्ती केली जात होती असा खुलासा हनी सिंगने केला. "जेव्हा ते मला शोसाठी शिकागोला घेऊन गेले, तेव्हा मी म्हणालो, 'मला परफॉर्म करायचे नाही'. मला खात्री होती की त्या शोदरम्यान मी मरणार आहे. सर्वांनी मला सांगितले की मी तयार व्हावं, पण मी नकार दिला. माझे व्यवस्थापक आले आणि म्हणाले, 'तुम्ही तयार का होत नाही?' मी म्हणालो 'मी जात नाही," असं हनी सिंगने सांगितलं.
परफॉर्म करायला लागू नये यासाठी हनी सिंगने सगळे केस कापून टाकले आणि टकला झाला. "मी वॉशरुममध्ये गेलो, ट्रिमर घेतलं आणि सगळे केस उडवले. त्यानंतर मी त्यांना आता कसं परफॉर्म करु असं विचारलं. त्यावर त्यांनी टोपी घाल आणि कर असं उत्तर दिलं", असं हनी सिंगने सांगितलं. टक्कल करुनही फायदा होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर मी कप उचलून डोक्यात घातला. यामुळे जखम झाली आणि टाके पडले. शाहरुख खानच्या कानाखालीने नाही असा खुलासा हनी सिंगने केला आहे.
"तिथे कॉफी मग पडलेला होता. मी तो उचलला आणि डोक्यावर आपटला. कोणीतरी शाहरुख खानने माझ्या कानाखाली लगावल्याची अफवा पसरवली. तो माझ्यावर प्रेम करतो आणि माझ्यावर कधीच हात उचलणार नाही," असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.
याच डॉक्युमेंट्रीत हनी सिंगच्या बहिणीने या घटनेनंतर आपण थोडाही उशीर न करता त्याला तात्काळ भारतात आणण्याचा निर्णय घेतला अशी माहिती दिली. तिने सांगितलं की, "मी माझ्या रुममध्ये होते. त्याने मला माझ्यासोबत काहीतरी योग्य नाही असा मेसेज करुन स्काईपवर येण्यास सांगितलं. यानंतर त्याने मला वाचव असं सांगितलं आणि डिसकनेक्ट झाला".