लोकप्रिय गायक शंकर महादेवन यांनी फक्त बॉलिवूड मध्येच नाही तर मराठी चित्रपटांसाठी देखील गाणी गायली आहेत. त्यांनी तमिळ, तेलगू आणि कन्नड चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. काल 13 मे रोजी त्यांना आणखी एका पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आणि तो म्हणजे झी 24 तास महाराष्ट्र रत्न. झी 24 च्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्या सीनियर सोनाली कुलकर्णीनं शंकर महादेवन यांची मुलाखत घेतली. तेव्हा त्यांनी त्यांचे शिक्षण कसे झाले यावर सांगितले.
शंकर महादेवन यांनी सांगितले की त्यांचे शालेय शिक्षण चेंबूर मध्ये झाले. दहावीत असताना ते शाळेत हिंदी विषयात सर्वाधिक गुण मिळवणारे विद्यार्थी होते. त्यांना लहानपणापासूनच संगीताची ओढ होती. त्याच वयात त्यांनी वीणा वादन आणि शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली.
संगणक अभियंता ते संगीतकार
सोनाली कुलकर्णीने त्यांना विचारले की त्यांचे करिअर आधीच ठरले होते का? त्यावर शंकर महादेवन हसत म्हणाले, 'त्यावेळी करिअरचे दोनच पर्याय होते- डॉक्टर किंवा इंजिनिअर आणि तेव्हा मी गायनाची आवड असतानाही इंजिनियर निवडले.' त्यांनी नवी मुंबईतच संगणक अभियांत्रिकीची पदवी मिळवली. पदवी मिळवल्यानंतर त्यांनी एका आंतरराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काही काळ काम केले. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडण्याचा विचार केला.
पण त्यांच्या मनात सतत एक प्रश्न असायचा -'मी खरंच गायक होऊ शकतो का?' सुरुवातीला थोडी भीती होती, पण शेवटी त्यांनी ठरवलं की आयुष्यभर संगणकासमोर बसून अमेरिकेसाठी काम करण्यापेक्षा भारतात राहून शास्त्रीय संगितासाठी काहीतरी वेगळं करावं आणि तिथूनच सुरू झाली त्यांच्या संगीत प्रवासाची खरी वाटचाल.
Breathless आणि शंकर-एहसान-लॉय यांचा यशस्वी प्रवास
1998 मध्ये आलेल्या Breathless या अल्बमने त्यांना राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळवून दिली. या गाण्यात त्यांनी सलग श्वास न घेता गायन केलं होतं. जे आजही एक अद्वितीय कामगिरी मानली जाते. त्यानंतर त्यांनी शंकर-एहसान-लॉय या संगीत त्रयीमध्ये सहभाग घेतला. या तिघांनी मिळून बॉलिवूडला 'दिल चाहता है', 'कल हो ना हो', 'रंग दे बसंती', 'तारे जमीन पर', 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' यांसारखी गाणी दिली.
मुलाखतीतील मजेशीर किस्से
सोनाली कुलकर्णीने या मुलाखतीत एक मजेशीर आठवण शेअर केली. तिने सांगितले की तिची आणि शंकर महादेवन यांची पहिली भेट 'मिशन काश्मीर' या चित्रपटाच्या संगीत सत्रात झाली होती. त्यावेळी ती त्यांच्या संगीताने इतक्या भारावून गेली की ती सहजच म्हटली- 'मी त्या क्षणीच त्यांच्या प्रेमात पडले.' यावर दिग्दर्शक विदू विनोद चोप्रा यांनी हसत सोनालीच्या खांद्यावर हात ठेवून सांगितले, 'शंकरचं आधीच लग्न झालंय- संगीताशी!'
पुरस्कार आणि सन्मान
13 मे 2025 रोजी झालेल्या झी 24 तास महाराष्ट्र गौरव सोहळ्यात शंकर महादेवन यांना महाराष्ट्र रत्न या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या संगीतप्रवासातील अमूल्य योगदानासाठी त्यांना ही प्रतिष्ठित मान्यता देण्यात आली.
शंकर महादेवन हे फक्त एक यशस्वी संगीतकार नाहीत, तर एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व देखील आहेत. त्यांनी शिक्षण, नोकरी आणि कला यांच्यात योग्य तो समतोल साधत संगीत क्षेत्रात स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या या कारकिर्दीला झी 24 तास महाराष्ट्र गौरव 2025 मंचावर सन्मान मिळाला आणि प्रेक्षकांना एक प्रेरणादायी अनुभव घेता आला.