A R Rahman Health Update: ऑस्कर पुरस्कार विजेता संगीतकार ए. आर. रेहमानला रविवारी सायंकाळी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. चेन्नईमधील कॉर्परेट रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर काही तासांमध्ये त्याला डिस्चार्जही मिळाला. मात्र या दरम्यान अनेक वेगवेगळ्या बातम्या सोशल मीडियावरुन व्हायरल झाल्या. याचदरम्यान ए. आर. रेहमानच्या पत्नीने पीटीआयशी बोलताना त्यांच्या घटस्फोटामागील खरं कारण सांगितलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 58 वर्षीय ए. आर. रेहमानला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही तासांनंतर रेहमानला डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ए. आर. रेहमान हा लंडनवरुन परतल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. मात्र डॉक्टरांनी ए. आर. रेहमानला डिहायड्रेशनमुळे म्हणजेच शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्रास झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सध्या रमझानच्या महिन्यानिमित्त ए. आर. रेहमान उपवास करत असल्याने त्याला डिहायड्रेशनचा त्रास झाला. ए. आर. रेहमानच्या प्रकृतीला कोणताही धोका नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, दुसरीकडे पती रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळाल्यानंतर आणि यासंदर्भातील वृत्तामध्ये आपला पूर्वाश्रमीची पत्नी असा उल्लेख असल्याचं समजल्यानंतर सायरा रेहमान यांनी पीटीआयला पाठवलेल्या ऑडिओ मेसेजमध्ये आपला पूर्वाश्रमीची पत्नी असा उल्लेख टाळण्याची विनंती केली. "मी त्यांना लवकर आराम मिळावा अशी प्रार्थना करते. मला हे स्पष्ट करायचं आहे की, आम्ही अधिकृतरित्या घटस्फोट घेतलेला नाही. आम्ही अजूनही पती-पत्नी आहोत. मागील दोन वर्षांपासून मला प्रकृतीसंदर्भातील समस्या असल्याने आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मला त्यांना कोणताही त्रास द्यायचा नाहीये. मी प्रसारमाध्यमांना विनंती करते की त्यांनी माझा उल्लेख पूर्वाश्रमीची पत्नी असा करु नये. आम्ही विभक्त होत असलो तरी मी कायम त्यांच्यासाठी प्रार्थना करते," असं ए. आर. रेहमान यांची पत्नी सायरा रेहमान यांनी 'पीटीआय' या वृत्तसंस्थेला सांगितलं.
AUDIO | "I wish him (A R Rahman) a speedy recovery. I would like to clarify that we haven't divorced officially, and we are still husband and wife. We have separated because my health hasn't been good for the past two years, and I don't want to give him any stress. Therefore, I… pic.twitter.com/bMd27xKYjp
— Press Trust of India (@PTI_News) March 16, 2025
ए. आर. रेहमान यांनी लग्नाच्या 29 वर्षांनंतर पत्नी सायरा बानोला घटस्फोट देत असल्याची घोषणा मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात केली. सोशल मीडियावर याबद्दलची पोस्ट लिहित त्यांना सर्वांनाच मोठा धक्का दिला. ए. आर. रेहमान आणि सायरा बानो यांचं 12 मार्च 1995 रोजी चेन्नईत लग्न झालं होतं. त्यांना खतीजा, रहीमा आणि अमीन ही तीन मुलं आहेत. ए. आर. रेहमान आणि सायरा बानो यांचं अरेंज मॅरेज आहे. आपल्या मुलाला जोडीदार शोधून देण्यामध्ये ए. आर. रेहमानच्या आईने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.