'खऱ्या Dead Bodyसोबत शूटिंग करताना अंगावर शहारे आले…' उमेश कामतचा भीषण अनुभव !

Umesh Kamat Shooting with a real dead Body: हॉस्पिटल सीनचं रहस्य उघड! उमेश कामतने खऱ्या मृतदेहासोबत दिला सीन.

कावेरी पिंपळे | Updated: Nov 12, 2025, 05:45 PM IST
'खऱ्या Dead Bodyसोबत शूटिंग करताना अंगावर शहारे आले…' उमेश कामतचा भीषण अनुभव !

कलाकार हे सिनेमा किंवा मालिकांमध्ये काम करताना अनेकदा वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जातात. एखादा सीन परिपूर्ण व्हावा म्हणून ते जीव तोडून मेहनत घेतात. काही वेळा या मेहनतीत भीती, धैर्य आणि भावना यांची खरी परीक्षा होते. असाच एक धक्कादायक अनुभव मराठीतील लोकप्रिय अभिनेता उमेश कामत यांनी उघड केला आहे.

Add Zee News as a Preferred Source

‘ताठ कणा’ सिनेमासाठी केलेलं धाडस

उमेश कामत लवकरच ‘ताठ कणा’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात त्यांनी जगप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. प्रेमानंद रामाणी यांची भूमिका साकारली आहे. ही भूमिका साकारताना त्यांना खऱ्या हॉस्पिटलमध्ये, आणि तेही खऱ्या मृतदेहासोबत सीन शूट करावा लागला, असा खुलासा त्यांनी अलीकडेच केला आहे. उमेश म्हणाला 'आमचे दिग्दर्शक गिरीश मोहिते सर म्हणाले की परवानगी मिळाली आहे आणि आता आपल्याला हा सीन रिअल लोकेशनवर खऱ्या मृतदेहासोबत शूट करायचा आहे. हे ऐकून माझं हृदय धडधडायला लागलं. मला वाटलं, मी हा सीन कसा देणार?'

भीती, वास आणि शांतता – एक भयानक क्षण

उमेश पुढे सांगतो 'मी जेव्हा त्या खोलीत गेलो तेव्हा तिथे मृतदेह ठेवलेला होता. त्या ठिकाणचा वास, ती भयाण शांतता… सगळं काही अंगावर काटा आणणारं होतं. मला पहिल्यांदाच असा अनुभव येत होता. तिथे कोणीच नव्हतं मी एकटाच आत होतो.' तो म्हणतो 'गिरीश सर म्हणाले, ‘कॅमेरा बाहेर असेल, तू आत जा, आणि मी ॲक्शन म्हटल्यावर काम सुरू कर. कट म्हटल्यावर लगेच बाहेर ये.’ त्या क्षणी मी स्वतःला सावरलं. मी कोणाची भूमिका साकारतोय हे लक्षात घेतलं आणि ती भीती झटकून दिली. शेवटी सीन उत्तम झाला.'

भूमिकेप्रती समर्पण

उमेशच्या या अनुभवावरून त्याची भूमिकेप्रती असलेली निष्ठा दिसून येते. तो म्हणतो 'मी जर त्या वेळी घाबरलो असतो, तर या सिनेमाला काही अर्थ उरला नसता. मी हा सीन करताना डॉ. रामाणी यांचं व्यक्तिमत्त्व समोर ठेवलं. ते नेहमी धैर्य आणि शांततेने काम करतात. तो आत्मविश्वास माझ्यात आणायचा होता.'

‘ताठ कणा’ सिनेमात कोण कोण?

‘ताठ कणा’ या चित्रपटात उमेश कामतसोबत सायली संजीव, दीप्ती देवी, शैलेश दातार, अजित भुरे आणि रवी गोसाई यांसारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन गिरीश मोहिते यांनी केलं असून तो 28 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपटाची पार्श्वभूमी

हा सिनेमा डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित आहे. गरीब परिस्थितीतून डॉक्टर होऊन जागतिक स्तरावर नाव कमावणाऱ्या या व्यक्तीची कथा उमेश कामतच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.

उमेश कामतचं धाडस – एक उदाहरण

उमेश कामतने या भूमिकेसाठी दाखवलेलं धैर्य आणि समर्पण पाहता प्रेक्षकांमध्ये या सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. खऱ्या मृतदेहासमोर सीन देणं ही कोणत्याही अभिनेत्यासाठी सोपी गोष्ट नाही, पण उमेशने ते अत्यंत संयमाने आणि व्यावसायिकतेने पार पाडलं.

FAQ

‘ताठ कणा’ हा सिनेमा कोणावर आधारित आहे?

‘ताठ कणा’ हा सिनेमा जगप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यांच्या संघर्षमय प्रवास आणि जिद्दीची कहाणी या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे.

उमेश कामतला खऱ्या मृतदेहासोबत शूट का करावं लागलं?

चित्रपटातील एका वास्तवदर्शी सीनसाठी दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी रिअल लोकेशनवर शूट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे उमेशला खऱ्या हॉस्पिटलमध्ये, खऱ्या मृतदेहासमोर सीन द्यावा लागला.

‘ताठ कणा’ सिनेमा कधी प्रदर्शित होणार आहे?
‘ताठ कणा’ हा चित्रपट 28 नोव्हेंबर 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात उमेश कामतसोबत सायली संजीव, दीप्ती देवी, शैलेश दातार यांसारखे कलाकार झळकणार आहेत.

About the Author

kaveri pimpley

कावेरी पिंपळे सध्या ‘झी २४ तास डिजिटल’मध्ये कंटेंट एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पत्रकारितेचा चार वर्षांचा अनुभव आहे. ...Read More