मुंबई : सध्याच्या घडीला गोव्यात सुरु असणाऱ्या ५०व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया म्हणजेच IFFI2019मध्ये एक भलताच प्रकार घडल्याचं उघडकीस आलं. ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. IFFIच्या संकेतस्थळावर झालेली ही चूक लक्षात येताच अनेकांना धक्का बसला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IFFIच्या संकेतस्थळावर एका विभागात गतकाळातील काही लोकप्रिय आणि दिग्गज दिग्दर्शकांमध्ये गणल्या जाणाऱ्या सत्यजीत रे यांच्या कारकिर्दीचा आढावा घेण्यात आला होता. त्यांच्या कारकिर्दीविषयी काही महत्त्वाची माहितीसुद्धा लिहिण्यात आली होती. पण, या माहितीसोबत जोडण्यात आलेला फोटो मात्र चुकीचा होता. सत्यजीत रे यांच्याऐवजी ज्येष्ठ लेखक, कवी, दिग्दर्शक गुलजार यांचा फोटो येथे जोडण्यात आला होता. ही बाब जेव्हा लक्षात आली, तेव्हा लगेचच संकेतस्थळावर ही चूक सुधारली गेली. 


IFFI2019च्या संकेतस्थळावर सत्यजीत रे यांच्या १९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या गनाशत्रू या चित्रपटाची माहिती दिली होती. यासोबतच दिग्दर्शकांविषयीसुद्धा काही माहिती देण्यात आली होती. पण, रे यांच्या नावाशेजारी लावण्यात आलेला फोटो हा त्यांचा नसून गुलजार यांचा होता. एका युजरच्या ही चूक लक्षात आली ज्यानंतर सोशल मीडियावर याविषयीचा स्क्रीनशॉट शेअर करत त्याविषयीची माहिती दिली. ही चूक समोर येताच तातडीने ती सुधारण्यात आली. 


छाया सौजन्य- ट्विटर 

इफ्फीच्या आयोजकांकडून आणि संबंधित गोष्टीसाठी जबाबदार असणाऱ्यांकडून अशी चूक होणं खरंतर अनेकांसाठी अनपेक्षित होतं. त्यामुळे यंदाचं इफ्फीचं हे पर्व या चुकीमुळेही चर्चेत आहे. 



दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या IFFI2019 या चित्रपट महोत्सवाची रंगत दिवसागणिक वाढत आहे. या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी महानायक अमिताभ बच्चन आणि सुपरस्टार रजनीकांत यांना कलाजगतातील त्यांच्या योगदानासाठी गौरवण्यात आलं होतं. शिवाय फ्रेंच अभिनेत्री  Isabelle Huppert यांनाही जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.