Jab We Met Sequel: बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहिलेली जोडी म्हणजेच शाहिद कपूर आणि करीना कपूर! आजही वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असेलेले हे दोन चेहरे मागील दोन ते तीन आठवड्यांपासून सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत असण्याचं कारण म्हणजे दोघांनी नुकतीच एका पुरस्कार सोहळ्यात एकमेकांना मारलेली मिठी! एकेकाळी एकमेकांच्या अखंड प्रेमात असलेल्या या दोघांच्या ब्रेकअपला 16 वर्षांचा काळ लोटला आहे. मात्र आजही या दोघांनी प्रमुख भूमिका साकारलेला 'जब वी मेट' हा चित्रपट चाहत्यांच्या सर्वात आवडत्या चित्रपटापैकी एक आहे. या चित्रपटाचा पुढील भाग यावा अशी चाहत्यांची फार आधीपासूनच इच्छा आहे. आता नुकतीच या दोघांची अगदी मैत्रीपूर्ण सार्वजनिक भेट झाल्यानंतर 'जब वी मेट'च्या सिक्वेलची मागणी दोघांच्या चाहत्यांकडूनही जोर धरु लागली आहे. असं असतानाच या भेटीवर 'जब वी मेट'च्या दिग्दर्शकानेही पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
साधारण दोन आठवड्यांपूर्वी पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यामध्ये शाहिद आणि करीना एकमेकांना अगदी मिठी मारुन भेटले. त्यानंतर हे दोघे स्टेजवरच उभे राहून एकमेकांशी बराच वेळ बोलत होते. ही दृष्य सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाली. 2004 ते 2009 दरम्यान हे दोघे एकमेकांना डेट करत होते. याच कालावधीमध्ये 2007 साली 'जब वी मेट' प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात करीनाने साकारलेली गीत आणि शाहिदने साकारलेली आदित्य कश्यप या उद्योजकाची भूमिका चाहत्यांच्या मनात घर करुन गेली.
मात्र हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पुढील काही महिन्यांमध्ये या दोघांतील दुरावा वाढला आणि अखेर 2009 मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. यानंतर हे दोघे सार्वजनिक ठिकाणी अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या वेळा भेटले. मात्र कधीही त्यांच्या मोकळेपणे संवाद झाल्याचं दिसलं नाही. याचा अपवाद ठरला नुकताच पार पडलेला आयफाचा सोहळा. या सोहळ्याती दोघांनी एकमेकांसोबत अगदी मित्र-मैत्रिणीप्रमाणे गप्पा मारल्याचं दिसून आलं.
Jaipur, Rajasthan: Actor Shahid Kapoor & actress Kareena Kapoor Khan attends the IIFA Awards pic.twitter.com/DvTOwdh1aM
— IANS (@ians_india) March 8, 2025
ब्रेकअपनंतर 16 वर्षांनी पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून का असेना शाहिद आणि करीनाला एकत्र पाहून चाहते मात्र सुखावले आहेत. शाहिद आणि करीनाला एकत्र पाहून अनेकांनी 'जब वी मेट'चा सिक्वेल काढावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र या भेटीवर 'जब वी मेट'चा दिग्दर्शक इम्तियाज अलीनेही प्रतिक्रिया नोंदवली आहे. पीटीआयशी बोलताना इम्तियाजने, "शाहिद आणि करीना दोघेही आयफा पुरस्कार सोहळ्यात एकमेकांना भेटले हे फारच रंजक आहे. या भेटीनंतर लोक माझ्याशी 'जब वी मेट'संदर्भात बोलत आहेत. शाहिदने यापूर्वीच सांगितलं आहे की तो या साऱ्यातून मुव्ह ऑन झाला आहे. मात्र माझ्या मते यामधून प्रत्येकजण मुव्ह ऑन झाला आहे. 'जब वी मेट'ला आता फार कालावधी झाला आहे."
चित्रपटाचा पुढचा भाग काढणार का याबद्दल बोलताना इम्तियाज अलीने, "माझ्या मते आपण त्याच्या भेटीचा हा क्षण 'जब वी मेट'चा सिक्वेल येईल की नाही याबद्दल चर्चा करुन खराब करता कामा नये," असंही म्हटलं आहे. "मी सध्या शाहिद आणि करीनासोबत कोणत्याही चित्रपटाचा विचार केलेला नाही. मात्र हे दोघे भेटले हे फारच छान झालं आहे. दोघेही फार उत्तम कलाकार आहेत. त्या दोघांबरोबर काम करताना मला फारच छान अनुभव आला हे वेगळं सांगण्याची गरज नाही," असंही इम्तियाजने म्हटलं आहे.