'हे पूर्णपणे अश्लील आहे', जावेद अख्तर यांनी KKHH साठी गाणी लिहिण्यास दिला होता नकार, गीतकाराने केलं उघड

गीतकार समीर अंजन (Sameer Anjan) यांनी 'कुछ कुछ होता है' (Kuch Kuch Hota Hai) चित्रपटासाठी गाणी लिहिण्याची संधी कशी मिळाली याचा खुलासा केला आहे.  

शिवराज यादव | Updated: Mar 26, 2025, 03:36 PM IST
'हे पूर्णपणे अश्लील आहे', जावेद अख्तर यांनी KKHH साठी गाणी लिहिण्यास दिला होता नकार, गीतकाराने केलं उघड

बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) दिग्दर्शित केलेल्या 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची गणना कल्ट क्लासिक चित्रपटांमध्ये केली जाते. या चित्रपटाने शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) रोमँटिक इमेजवर अधिकृतपणे छाप मारली होती. शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि काजोल यांच्यातील ही लव्हस्टोरी प्रेक्षकांनी फार भावली होती. चित्रपटाली गाणी तर आजही तितक्याच आवडीने ऐकली जातात. मात्र समीर यांच्यासाठी या चित्रपटासाठी गाणी लिहिणं फार सोपं नव्हतं. कारण ते जावेद अख्तर यांची जागा घेत होते. 

चित्रपटाचं नाव फार अश्लील आहे सांगत जावेद अख्तर यांनी करण जोहरच्या पहिल्या चित्रपटासाठी गाणी लिहिण्यास नकार दिला होता असा खुलासा समीर यांनी केला आहे. चित्रपटाला तरुण आणि फ्रेश लूक देण्यासाठी नंतर समीर यांना आणण्यात आलं. लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत समीर यांनी आपला अनुभव सांगितला. तसंच चित्रपटाच्या नावात आपल्याला काहीच आक्षेपार्ह आढळलं नसल्याचं म्हटलं. 

जावेद अख्तर यांनी करण जोहरला नाव बदलण्यास सांगितलं

समीर यांनी मुलाखतीत सांगितलं की, "जावेद साहेब यांनी चित्रपटासाठी गाणी लिहिणं अपेक्षित होतं. मात्र चित्रपटाचं नाव न आवडल्याने त्यांनी चित्रपट सोडला. त्यांनी करण जोहरला नाव बदललं तरच काम करेन असं सांगितलं. कारण त्यांना कथा आवडली होती, मात्र नाव आवडलं नव्हतं".

यादरम्यान एका प्रेक्षकाने त्यांना जेव्हा जावेद अख्तर यांच्यासारखी मोठी व्यक्ती हे अश्लील असल्याचं सांगतं तेव्हा तुमची काय प्रतिक्रिया असते असं विचारलं. त्यावर ते म्हणाले, "मला त्यात काहीच अश्लीलता वाटली नाही. मी तेव्हा तरुण होतो आणि त्यात काही अश्लील आहे असं वाटलं नाही. मला नंतर माहिती मिळाली की जावेद अख्तर यांना हे काय नाव आहे असं वाटलं होतं. जेव्हा मी लिहायला बसलो तेव्हा तरुण होतो आणि त्या प्रेमाच्या भावनेत बुडालो होतो. जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा काहीतरी होतं".

पुढे ते म्हणाले, "जर दिग्दर्शकाने हे नाव दिलं असेल तर त्याने पूर्ण विचार केला असेल आणि यामागे काहीतरी स्टोरी असेल".

करणला समीर यांची मूळ शैली हवी होती

तथापि, जावेद साहेबांचा समीर यांच्यावर प्रभाव पडला. जेव्हा त्यांनी गाणी लिहिण्यास घेतली तेव्हा त्यांना करण जोहरला प्रभावित करायचं होते. त्यांनी जावेद अख्तर यांच्या शैलीत लिहिण्याचा प्रयत्न केला. पण करणने समीर यांना त्यांच्या मूळ शैलीत लिहिण्यास सांगितलं. 

"जेव्हा मला गाणी लिहिण्याची ऑफर देण्यात आली, तेव्हा मला वाटलं की हा चित्रपट आधी जावेद साहेबांकडे गेला असल्याने, मी काही शायरी जोडावी जेणेकरून करण प्रभावित होईल. मी त्याला एक परिच्छेद ऐकवला असता तो रागावला आणि मला उलट प्रतिक्रिया मिळाली," अशी आठवण त्यांनी सांगितली. 

“तो म्हणाला की मी तुम्ही तरुण असल्याने फोन केला. ही कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची कहाणी आहे, मला तुमची लिहिण्याची शैली हवी आहे, अगदी साधी. त्याला शायरी अजिबात नको होती. जेव्हा मी दुसऱ्या प्रयत्नात गेलो तेव्हा मी त्याला सांगितले की लोकांना आवडो किंवा न आवडो, हे खूप सोपे दिसत आहे. करणला आत्मविश्वास होता आणि त्याने मला खात्री दिली की मी ताण घेऊ नये. त्याला जे हवे होते ते मिळाले,” असंही त्यांनी सांगितलं.