व्हिस्कीची अ‍ॅलर्जी झाल्याने मी एकाच झटक्यात बिअरच्या 18 बाटल्या...; जावेद अख्तर यांचा धक्कादायक खुलासा

बॉलिवूड गीतकार जावेद अख्तर यांनी मला कंपनीची गरजच नाही असं सांगितलं.   

शिवराज यादव | Updated: May 9, 2025, 06:36 PM IST
व्हिस्कीची अ‍ॅलर्जी झाल्याने मी एकाच झटक्यात बिअरच्या 18 बाटल्या...; जावेद अख्तर यांचा धक्कादायक खुलासा

बॉलिवूडमधील ज्येष्ठ गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी नेहमीच आपल्या मद्यपान व्यवसाबाबत जाहीरपणे भाष्य केलं आहे. 'मिड डे'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपण एकदा एकाच वेळी बिअरच्या 18 बाटल्या संपवल्या होत्या असा खुलासा केला आहे. "मला व्हिस्कीची अॅलर्जी झाली होती. त्यानंतर मी विचार केला की, आपण फक्त बिअर प्यायला हवं. पण मी एकाच वेळी बिअरच्या 18 बाटल्या संपवत असे. यानंतर मी विचार केला की, अरे यार मी बिअर पिऊन माझं पोट का वाढवत आहे? त्यामुळे मी बिअर सोडली आणि रम पिऊ लागलो," असं जावेद अख्तर यांनी सांगितलं आहे. 

आपण बिअर पिताना कोणाची सोबत मिळावी याची वाटही पाहत नव्हतो असंही जावेद अख्तर म्हणाले. "मला कोणाच्या सोबतीचीही गरज नव्हती. कोणी असेल सोबत तर ठीक आहे, अन्यथा मी एकटाच पिऊन टाकेन".

2012 मध्ये सत्यमेव जयते या मालिकेतील एका भागात जावेद अख्तर यांनी त्यांच्या व्यसनाबद्दल जाहीरपणे सांगितलं होतं. "मी 19 वर्षांचा असताना अगदी तरुणपणात दारू पिण्यास सुरुवात केली होती. शिक्षणानंतर मी मुंबईत आलो तेव्हा मित्रांसोबत दारू पिण्यास सुरुवात केली आणि नंतर त्याची सवयच झाली. पूर्वी माझ्याकडे पुरेसे पैसे नसायचे. पण यश मिळाल्यानंतर त्याचीही समस्या नव्हती. मग एक वेळ आली जेव्हा मी दिवसातून एक बाटली प्यायचो," असं जावेद अख्तर यांनी सांगितली. 

याआधी शबाना आझमी यांनी कशाप्रकारे जावेद अख्तर यांचं व्यसन हाताळलं याबद्दल सांगितलं होतं. अरबाज खानच्या 'द इनव्हिन्सिबल्स' या टॉक शोमध्ये शबाना आझमी यांनी पती जावेद अख्तर यांनी त्यांचं प्रमाणाबाहेर सुरु असलेलं मद्यपान कशाप्रकारे रोखलं याबद्दल सांगितलं होतं. "त्यांना माहिती होतं की, जर मी असंच मद्यपान करत राहिले तर मी फार काळ जगू शकणार नाही आणि आपलं कामही क्रिएटिव्हपण करु शकणार नाही, आम्ही लंडनमधील एका फ्लॅटमध्ये होतो. त्यांच्या शरिराला दारुचा दुर्गंध येत होता. मी म्हटलं हा दौराही पुन्हा तशाच काही अनुभवांपैकी असणार आहे. यानंतर त्यांनी हळूच मला सांगितलं की, काहीतरी ब्रेकफास्ट बनव. त्यांनी ब्रेकफास्ट केला आणि मला म्हणाले, मी आता यापुढे मद्यपान करणार नाही," अशी आठवण शबाना आझमी यांनी सांगितली होती.

पुढे त्यांनी सांगितलं होतं की, "मी काहीही म्हटलं नाही. मी फक्त म्हटलं म्हणजे? ते म्हणाले, मी यापुढे मद्यपान करणार नाही. ते याआधी असं बोलले नव्हते आणि तेव्हापासून त्यांनी मद्याला हात लावला नाही. इतकी इच्छाशक्ती असणं फार कठीण आहे".