'...तर मी एखाद्या गरिबाप्रमाणे रिक्षात मेलो असतो,' कमल हासन यांनी उघड केलं सत्य; 'आईचा अपमान कऱण्यासाठी मी...'

कमल हासन (Kamal Haasan) यांनी आपले मार्गदर्शक के. बालचंदर (K Balachander) यांच्याशी असलेल्या त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. तसंच त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार एका दुःखद घटनेतून वाचल्याचीही माहिती दिली.  

शिवराज यादव | Updated: May 15, 2025, 06:11 PM IST
'...तर मी एखाद्या गरिबाप्रमाणे रिक्षात मेलो असतो,' कमल हासन यांनी उघड केलं सत्य; 'आईचा अपमान कऱण्यासाठी मी...'

बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे कमल हासन (Kamal Haasan) यांनी आपल्याकडे तरुण असताना, एखादी चांगली नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक कौशल्य नव्हतं असं सांगितलं आहे. तसंच आईचा अपमान करण्यासाठी केशकर्तनकार म्हणून काम करण्यास सुरुवात केल्याचाही खुलासा केला आहे. यादरम्यान त्यांनी त्यांचे मार्गदर्शक, चित्रपट निर्माते-लेखक के. बालचंदर यांच्याशी असलेले त्यांचे नाते आणि त्यांच्याकडून मिळालेल्या शहाणपणाबद्दलच्या शिकवणीबद्दलही सांगितलं. Hollywood Reporter India ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्यामुळे कशाप्रकारे आपण दुर्दैवी शेवट होण्यापासून वाचलो याचा खुलासा केला. आपले अनेक मित्र आपल्यापेक्षा जास्त कौशल्य असतानाही दुर्देवी शेवट झाल्याचं ते म्हणाले. 

आपलं सुरुवातीचं आयुष्य आणि चिंतांची आठवण करून देताना ते म्हणाले, “ज्या व्यक्तीने मला बालचंदर माझे सर्वोत्तम जोडीदार असतील असं सांगितलं तो माझा आणखी एक गुरू होता, तो एक केशकर्तनकार होता आणि त्याने मला त्याचं काम शिकवलं. मी एका सलूनमध्ये केशकर्तनकार म्हणून काम केलं होतं, पण ते बहुतेक माझ्या आईला हिणवण्याच्या हेतूने होते. कारण तिला वाटायचं की मी काहीच करत नाही. मी पेपरबॅक वाचत होतो आणि सिनेमा पाहत होतो आणि ती म्हणाली की मी हे करायला नको होते. माझ्याकडे ज्या प्रकारची प्रतिभा होती, मला सहज काम मिळत नव्हते. मी माझ्या आईचा अपमान कसा होईल याचा विचार केला आणि मी केशकर्तनकार झालो”.

त्यांनी सांगितले की बालचंदर यांना या कथेपासून प्रेरणा मिळाली होती आणि त्यांनी त्यांच्या 'जरा सी जिंदगी' या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये याचा वापर केला होता. त्यांनी सांगितलं की, जेव्हा ते 18 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी बालचंदर यांना आपल्याला दिग्दर्शक व्हायचं आहे असं सांगितलं होतं. परंतु बालचंदर यांनी त्यांना त्या मार्गावर जाण्यापासून परावृत्त केलं. जर तू दिग्दर्शक झालास तर संपूर्ण आयुष्य ऑटो रिक्षात प्रवास करण्यात घालवशील असं ते म्हणाले होते. तसंच तुझ्यात चित्रपट स्टार बनण्याचे गुण त्याच्यात आहेत असं सुचवणारे ते पहिले व्यक्ती  होत. "ऑटो रिक्षातून फिरणं विसरुन जा, पण जर मी त्यांचा सल्ला ऐकला नसता तर कदाचित रिक्षातच जीव गमावला असता," असं कमल हासन यांनी सांगितलं. 

कमल हासन यांनी यावेळी आपल्या अनेक मित्रांना, ज्यामधील बरेच जण आपल्यापेक्षा जास्त प्रतिभावान होते, त्यांना दुःखद परिस्थितीत आपले प्राण गमावताना पाहिले आहे अशी आठवणही सांगितली. "रस्त्यावरच त्यांचे निधन झाले," असं बालचंदर यांनी दिलेल्या सल्ल्याची आठवण करत ते म्हणाले. "अशा प्रकारे मी पूर्णपणे अभिनय क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. जर मी ती चूक केली असती तर ते बरोबर ठरले असते. मी माझ्या अनेक मित्रांना असंच जीव  गमावताना पाहिलं आहे. म्हणूनच मी श्री. बालचंदर यांचा आभारी आहे, कारण मी त्या मार्गाने जाऊ शकलो असतो. मी माझ्या चिंता, माझ्या अपूर्ण स्वप्नांसह, ऑटो रिक्षात मेलो असतो आणि ऑटो रिक्षात एक मृतदेह आहे हे कोणालाही कळले नसते," असं कमल हासन यांनी सांगितलं.