'सुनील शेट्टीने मला अक्षरश: रडवलं', India Idol च्या मंचावर करिष्मा कपूरचा खुलासा

मी पोलिस किंवा युनिटमधील कोणाला तरी हाणामारी थांबवण्यासाठी बोलवायला गेले.

Updated: Jul 15, 2021, 08:38 PM IST
'सुनील शेट्टीने मला अक्षरश: रडवलं', India Idol च्या मंचावर करिष्मा कपूरचा खुलासा

मुंबई : स्मॉल स्क्रिनवरील इंडियन आयडल 12 च्या मंचावर येणाऱ्या आठवड्यात बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री करिष्मा कपूर हजेरी लावणार आहे. यावेळी कार्यक्रमातील टॉप 6 स्पर्धक करिष्मासमोर एकापेक्षा एक दमदार परफॉर्मन्स सादर करणार आहेत. तर करिष्मा देखील बॉलिवूड सिनेमांमध्ये काम करत असताना घडलेले काही मजेशीर किस्से शेअर करणार आहे. यावेळी होस्ट आदित्य नारायणसोबत झालेल्या मजेदार चर्चेदरम्यान करिष्माने खुलासा केला की सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि आमिर खान हे सर्वात मोठे जोकर आहेत.

या यादीत अभिनेता सुनील शेट्टी पहिल्या क्रमांकावर आहे, कारण त्याने शुटींगदरम्यान सेटवर करिष्मासोबत अनेकवेळा प्रँक केले आहेत. इंडियन आयडलच्या स्पर्धेकांसमोर काही मजेशीर किस्सा करिष्माने शेअर केले. करिष्माने सांगितलं की, "आम्ही चेन्नईमध्ये एका सिनेमाचं शुट करत होतो. तेव्हा एक धोती परिधान केलेला व्यक्ती दूरवर बसला होता. तिथे बरेच लोक आले होते, त्यामुळे मला वाटलं की तो एखादा साऊथमधील ज्येष्ठ कलाकार आहे. नंतर अण्णा म्हणजेच सुनील शेट्टीने मला त्या व्यक्तीला भेटायला सांगितलं. आम्ही एकत्र फोटो देखील क्लिक केले. 

"आम्ही पुढची 20 मिनिटे त्यांच्याशी बोलत होतो. नंतर शॉट येण्यापूर्वी तोच व्यक्ती माझा मेकअप करत होता आणि त्याला पाहून मला धक्काच बसला. मी ताबडतोब सुनिलकडे गेले आणि त्याची चौकशी केली. तेव्हा सुनीलने मला सांगितलं की, तो माझ्यासोबत प्रँक करत होता."

सुनिल शेट्टीमुळे करिष्माच्या डोळ्यात आलं पाणी 

करिष्माने इंडियन आयटल 12 च्या मंचावर आणखी एक मजेशीर किस्सा शेअर केला. "एकदा सेटवर अ‍ॅक्शन सिक्वेन्स दरम्यान, दोन लोक खंजीर घेऊन आले आणि त्यांच्यात वाद सुरु झाला. ते पाहून मी इतकी घाबरले की, मी पोलिस किंवा युनिटमधील कोणाला तरी हाणामारी थांबवण्यासाठी बोलवायला गेले. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी जेव्हा माझ्या डोळ्यांत अश्रू आले तेव्हा सुनीलने सांगितले की ते माझी मस्करी करत होते." त्यामुळे सुनील शेट्टी सर्वात खोडकर व्यक्ती असल्याचं करिष्माने यावेळी सांगितलं.

करिष्मा आणि सुनील यांनी कृष्णा, रक्षक, गोपी-किशन सह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. सुनील आणि करिष्माची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली होती. सध्या करिष्मा चित्रपटांपासून दूर आहे. 2012 मध्ये 'डेंजरस इश्क' या चित्रपटात तिने काम केलं होतं.