)
Vijay TVK rally tragedy Tamil Nadu: करूरमध्ये झालेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीत आपला नवरा गमावलेल्या एका महिलेनं अभिनेता आणि तामिळागा वेत्त्री कळगम (TVK) पक्षाचे प्रमुख विजय यांनी दिलेली 20 लाख रुपयांची आर्थिक मदत परत केली आहे. कारण म्हणून तिने सांगितलं की, तिला अपेक्षा होती विजय स्वतः करूरला येऊन भेटतील, पण त्यांनी सर्व कुटुंबांना चेन्नईजवळील खासगी ठिकाणी बोलावलं.
गेल्या महिन्यात विजय यांच्या पक्षाच्या करूर येथील सभेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 41 लोकांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर विजय यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २० लाख रुपयांची भरपाई दिली होती. परंतु आता त्या पीडितांपैकी एका कुटुंबानं ती रक्कम परत केली आहे.
कोडंगिपट्टी गावातील शंकवी परमल या महिलेनं आपल्या पतीचा जीव गेलेला असताना विजय यांच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली. तिच्या म्हणण्यानुसार , “मी अपेक्षा केली होती की विजय स्वतः करूरला येतील आणि आमचं दुःख ऐकतील. पण त्यांच्या पक्षाच्या काही सदस्यांनी माझ्या नवऱ्याच्या कुटुंबातील काही जणांना माझ्या नकळत महाबळिपुरमला नेलं. ते योग्य नाही.” शंकवीने सांगितलं की तिला ही मदत आठवड्याभरापूर्वी तिच्या खात्यात आली होती. त्यानंतर तिने ती रक्कम RTGS मार्फत परत पाठवली. बँकेच्या मागणीप्रमाणे अधिकृत पत्र देऊन तिनं व्यवहार पूर्ण केला.
दुसरीकडे, अभिनेता ते राजकारणी झालेल्या विजय यांनी महाबळिपुरमजवळील एका खासगी हॉलमध्ये चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या 41 पैकी 33 कुटुंबीयांशी प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी काही जखमी पीडितांनाही बोलावण्यात आलं होतं. माहितीनुसार, विजय यांनी प्रत्येक कुटुंबाशी सुमारे 20 मिनिटं वैयक्तिक संवाद साधला. अनेक जण या भेटीत भावुक झाले. विजय यांनी त्यांना धीर दिला आणि झालेल्या घटनेबद्दल क्षमायाचनाही केली.
काही कुटुंबीयांच्या मते, विजयने सांगितले की सरकारकडून परवानगी न मिळाल्याने आणि करूरमध्ये योग्य खासगी जागा उपलब्ध नसल्याने त्यांना तिथं थेट भेट घेता आली नाही. त्यामुळे भेट महाबळिपुरममध्ये आयोजित करण्यात आली. या भेटीसाठी 160 हून अधिक नातेवाईक रविवारी रात्री करूरहून चेन्नईला आले होते. कार्यक्रम सकाळी 9 वाजता सुरू झाला आणि संध्याकाळी 6.30 पर्यंत चालला. “तो स्वतः आला नाही, म्हणून मी पैसे परत केले” शंकवी परमल हिनं पुढं सांगितलं की, “माझा नवरा गेला, आमचं सगळं उद्ध्वस्त झालं. विजय स्वतः आमच्याकडे आले असते, तर आम्हाला थोडा दिलासा मिळाला असता. पण त्यांनी दूरवरून सगळं केलं. त्यामुळे मला वाटलं, ही मदत मी ठेवू नये.” शंकवीचा हा निर्णय सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे. काही लोकांनी तिच्या भावनांचा सन्मान केला, तर काहींनी विजय यांच्या भूमिकेचं समर्थन केलं.
करूर चेंगराचेंगरीचा प्रसंग TVK पक्षाच्या प्रचार सभेदरम्यान घडला होता, जिथं गर्दीचा ताबा सुटल्यामुळे ही दुर्दैवी दुर्घटना घडली. या घटनेनंतर विजय यांनी तत्काळ मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदत जाहीर केली होती आणि जखमींनाही वैद्यकीय सहाय्य पुरवलं होतं.