‘केदार शिंदेने मला कपडे व चपला उचलायचं काम दिलं’; भाऊ मंदार शिंदेचा धक्कादायक खुलासा !

Brother Mandar Shinde's shocking revelation Kedar Shinde : केदार शिंदे यांच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटानंतर मावशी चारुशीला साबळे वाच्छानी यांनी खंत व्यक्त केली होती; आता त्यांचे भाऊ मंदार शिंदेही समोर आले असून धक्कादायक अनुभव उघड केले आहेत.  

कावेरी पिंपळे | Updated: Feb 4, 2026, 08:48 AM IST
‘केदार शिंदेने मला कपडे व चपला उचलायचं काम दिलं’; भाऊ मंदार शिंदेचा धक्कादायक खुलासा !

मुंबई: मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आतापर्यंत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट प्रेक्षकांसमोर आणले आहेत. मात्र गेल्या काही काळापासून केदार केवळ त्यांच्या सिनेमांमुळेच नव्हे, तर कौटुंबिक वादांमुळेही चर्चेत आले आहेत. केदार शिंदे हे पद्मश्री शाहीर साबळे यांचे नातू असून, त्यांचे कुटुंबीय त्यांच्याबद्दल नाराज असल्याचे दिसून येत आहे.

Add Zee News as a Preferred Source

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर केदार शिंदे यांच्या मावशी चारुशीला साबळे वाच्छानी यांनी कामाबाबत खंत व्यक्त केली होती. चारुशीला यांचे आरोप होते की, पतीच्या निधनानंतर आर्थिक आणि कामाच्या बाबतीत गरज असताना केदार शिंदे यांनी त्यांना अपेक्षित मदत केली नाही.

यानंतर केदार यांचे भाऊ मंदार शिंदेही समोर आले आहेत. मंदार सध्या मुंबईत एका व्यावसायिकाकडे ड्रायव्हर म्हणून काम करत आहेत. घर चालवण्यासाठी त्यांना हे काम करावं लागत असल्याचे त्यांनी सांगितले. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत मंदार म्हणाले, 'लोकधारेपासून सुरू झालेला माझा प्रवास हा मालिका दिग्दर्शन, सिनेमा दिग्दर्शन, इव्हेंट दिग्दर्शन अशा अनेक स्तरांवर पार पडला. हा प्रवास आता ड्रायव्हिंग या व्यवसायावर संपतोय. मी पद्मश्री शाहीर साबळे यांचा नातू आहे, पण परिस्थिती अशी झाली की घर चालवण्यासाठी मला हे काम करावं लागलं.'

मंदार शिंदे यांनी आणखी खुलासा केला की, केदार शिंदे यांनी त्यांना एका मालिकेसाठी कलाकारांचे कपडे आणि चपला ने-आण करण्याचं काम दिलं आणि त्यासाठी फक्त 100 रुपये मिळाले. 'एका काळात मला चित्रपट दिग्दर्शनाची संधी मिळाली होती, पण निर्मात्याने तो प्रोजेक्ट अचानक काढून घेतला. का घेतला हे माहित नाही,' असेही त्यांनी सांगितले.

मंदार शिंदे पुढे म्हणाले, '13 जानेवारी रोजी सकाळी पोलिसांचा फोन आला की, तुमच्या मुलाचा अपघात झाला आहे. मुलाच्या उपचारांसाठीचा खर्च मोठा होता. मी एका व्यापान्याकडे ड्रायव्हिंग करतो. सुरुवातीला वाईट वाटलं, पण घर चालवणं महत्त्वाचं आहे. आपल्या इंडस्ट्रीत कंपूशाही आहे; एखादा कितीही चांगला कलाकार किंवा दिग्दर्शक असला तरी त्याला काम मिळत नाही. घरात काम नसेल तर बाहेर काय मागणार?'

केदार शिंदे यांच्या मावशी चारुशीला साबळे वाच्छानी यांनी यापूर्वीही नाराजी व्यक्त केली होती. शाहीर साबळे यांच्या ‘लोकधारा’ कार्यक्रमातून केदार यांनी करिअरची सुरुवात केली, मात्र पतीच्या निधनानंतर चारुशीला यांना कामाची गरज असताना मदत न मिळाल्याने त्यांनी खंत व्यक्त केली होती.

सध्या या कुटुंबीयांच्या आरोपांमुळे हा विषय चर्चेत आला असून, केदार शिंदे यांनी अद्याप या सर्व आरोपांबाबत आपली भूमिका मांडलेली नाही. तंत्र, अनुभव आणि कौटुंबिक संबंध यामुळे मनोरंजन विश्वातील या वादाचा मुद्दा प्रेक्षकांसाठी आणि मीडिया साठी महत्वाचा ठरला आहे.

About the Author

kaveri pimpley

कावेरी पिंपळे सध्या ‘झी २४ तास डिजिटल’मध्ये कंटेंट एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पत्रकारितेचा चार वर्षांचा अनुभव आहे.

...Read More