`मी दहा-बारा दिवस...`, श्रुती मराठेला आहे `या` गोष्टीचं व्यसन
`मला याची सवय कशी लागली, कधी लागली हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. मला त्यातून एक वेगळीच मज्जा येते`, असं श्रुती मराठे यावेळी म्हणाली
Shruti Marathe Addiction : मराठी चित्रपटसृष्टीसोबतच दाक्षिणात्य सिनेमांमध्येही अभिनेत्री श्रुती मराठेने अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 'राधा ही बावरी' या मालिकेमुळे घराघरात पोहोचली. यात तिने राधा धर्माधिकारी हे पात्र साकारले होते. या मालिकेनंतर ती 'जागो मोहन प्यारे' या मालिकेत झळकली. यात तिने एका परीची भूमिका साकारली होती. श्रुती लवकरच एका दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे. नुकतंच श्रुतीने तिला असलेल्या एका व्यसनाबद्दल सांगितले आहे.
श्रुती मराठे ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. श्रुतीने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याबरोबरच ती उत्तम नृत्य करते. 'एकापेक्षा एक' या कार्यक्रमात तिने तिच्या नृत्यकौशल्याने सर्वांनाच चकीत केले होते. श्रुतीने आतापर्यंत विविध चित्रपट, मालिकांमध्ये आणि जाहिरातींमध्ये काम केलं आहे. आता श्रुतीने 'आरपार' या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिला असलेल्या एका व्यसनाबद्दल खुलासा केला आहे.
"त्यातून एक वेगळीच मज्जा येते"
यावेळी ती म्हणाली, "मी दरवर्षी गणपतीत पुण्याला जाते. तिथे जाऊन मी 10-12 दिवस ढोल वाजवते. मला ढोल वाजवायला प्रचंड आवडतो. मला याची सवय कशी लागली, कधी लागली हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण आपल्याला एका गोष्टीचं व्यसन असतं, तसं माझ्यासाठी ढोल-ताशा हे व्यसन आहे."
"मला त्यातून एक उर्जा मिळते. एक वेगळंच समाधान मिळतं. त्यातून मला एक वेगळाच आनंद मिळतो. मी अनेकदा सांगते की वर्षभरात गणपतीदरम्यानचे हे 10 दिवस मी सर्वाधिक आनंदी असते. मला पहिल्या वर्षी ढोल कसा बांधायचा, तो कसा वाजवायचा काहीच माहिती नव्हते. त्यानंतर आज दहा वर्षे झालीत. मी ढोल वाजवते. मी खूप शिकले आहे. मला त्यातून एक वेगळीच मज्जा येते. ढोल वादन करण्यामुळेच मला माझा आगामी तेलुगू चित्रपट मिळाला", असे श्रुती मराठेने यावेळी सांगितले.
दरम्यान श्रुती मराठेने तिच्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दीची सुरुवात पेशवाई या मालिकेद्वारे केली. यात तिने 'रमाबाई पेशवा' ही भूमिका साकारली होती. यानंतर ती 'सनई चौघडे' या मराठी चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत तिने अश्विनी हे पात्र साकारले होते. त्यानंतर ती मोजक्याच मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये झळकली. पण तिचा मोठा चाहतावर्ग आहे.