ठाकरे बंधुंच्या मेळाव्याला मराठी कलाकारांनी का फिरवली पाठ? तेजस्विनी पंडीतने सर्वच सांगितलं...

Tejaswini Pandit Reaction: मराठी चित्रपट सृष्टीतून भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडीत,चिन्मयी सुमित असे मोजके कलाकार सोडता कोणीही उपस्थित दिसले नाही. 

प्रविण दाभोळकर | Updated: Jul 5, 2025, 06:04 PM IST
ठाकरे बंधुंच्या मेळाव्याला मराठी कलाकारांनी का फिरवली पाठ? तेजस्विनी पंडीतने सर्वच सांगितलं...
तेजस्विनी पंडीत

Tejaswini Pandit Reaction: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात विजयी मेळावा घेतला. या मेळाव्याला विविध पक्षांचे नेते, काही मराठी कलाकार आणि शिवसेना, मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संथ्येने उपस्थित होते. दरम्यान ठाकरेंच्या मेळाव्याकडे मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले.

वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आयोजित या मेळाव्याला मराठी माणसांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी मराठी चित्रपट सृष्टीतून भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडीत,चिन्मयी सुमित असे मोजके कलाकार सोडता कोणीही उपस्थित दिसले नाही.  मराठी कलाकारांच्या गैरहजेरीबाबत अभिनेत्री तेजस्विनी पंडितला प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने आपले परखड मत व्यक्त केले. 'इतरवेळी जेव्हा मदत लागते तेव्हा शिवतीर्थाचा दरवाजा ठोठावला जातो. पण जेव्हा मराठीच्या प्रश्नासाठी एकत्र येण्याची वेळ येते, तेव्हा काही कलाकार समोर का येत नाहीत? एक कलावंत म्हणून मलाही हा प्रश्न पडतो, असे ती म्हणाली. ही बाब दुर्दैवी आहे. मी इतर कलाकारांबद्दल जास्त बोलू शकत नाही, पण मी स्वतः मराठी भाषेच्या लढ्यासोबत कायम आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र पाहणे ही मराठी माणसासाठी उत्साहवर्धक गोष्ट आहे. या एनर्जीचा अनुभव घेण्यासाठी मी इथे आलो असल्याची प्रतिक्रिया अभिनेता सिद्धार्थ जाधवने दिली.

शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया 

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारवर टीका केली. यानंतर भाजपकडून प्रतिक्रिया देण्यात आली. तसेच शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. शिवसेनेचे नेते प्रतिक्रिया देत असताना त्यांच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट करण्यात आली. ज्यामध्ये राज ठाकरेंना उजवं माप देण्यात आला तर उद्धव ठाकरेंना डिवचण्यात आलयं. 9 विरोधाभास दाखवणारी वाक्य शेअर करण्यात आली असून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील फरक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. 

काय म्हणाले दरेकर?

राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मराठी विजय मेळाव्यानंतर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी भाजपकडून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंमध्ये शरद पवार यांचीच आयडिओलाॅजी त्यांच्याच भिनली आहे आहे. राजकीय पेरणी करण्याचा प्रयत्न या इव्हेंट मधून झाला. तर भाजप आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाविषयी मळमळ आणि गरळ ओकण्याचे काम सध्या सुरु आहे. दोघांच्या भाषणात महिमामंडन सुरू आहे. देवेंद्रजी महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहेत. त्यामुळे लोकं फळं येणाऱ्या झाडावरच दगड मारत असतात. त्यामुळे आता आपलं कसं होणार? हेच आजच्या इव्हेंटवरुन दिसतंय.'पुढे दरेकर म्हणाले की, दोन्ही नेत्यांची भाषणं ऐकली राज ठाकरे मराठीचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करत होते, स्पष्टीकरण देत होते, एकत्र येण्यासाठी आवाहन करत होते. मात्र सत्ता गेल्याचे वैषम्य उद्धव ठाकरेंच्या भाषणात दिसत होतं. राजकीय पेरणी करण्याचा प्रयत्न या इव्हेंटमधून झाला. झेंडे आणायचे की नाही, वर कोण बसायचं यावरुन सगळे कन्फ्यूज होते. राजकारणाचा दर्प या मेळाव्यात दिसत होता. उद्धव ठाकरेंमध्ये शरद पवार यांचीच आयडिओलाॅजी भिनली आहे, अशी टीका ही दरेकर यांनी यावेळी केली. मुंबई महापालिकेत कोण कंत्राटदार मोठे केलेत आणि किती मराठी होते? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना किती मराठी माणसाचे हित जपले? सरकार मराठी माणसांच्या हितासाठी आपल्याला समर्थन देईल, यात दुमत नक्कीच नाही. भाजपनं सुद्धा मराठी माणसासाठी भूमिका घेतली आहे. अभिजात दर्जा देखील फडणवीस साहेबांच्या प्रयत्नाने मिळाला आहे. मराठी भाषा भवन तुमच्या काळात उभं राहू शकलं नाही हे देखील सत्य आहे असेही भाजप नेते प्रविण दरेकर म्हणाले.