Mukta Barve's Birthday: अजूनही का केलं नाही लग्न? अभिनेत्रीने सांगितलं स्पष्ट कारण!

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मुक्ता बर्वे यंदा आपला 45वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनय, नाट्य आणि मालिकांच्या माध्यमातून आपली वेगळी छाप निर्माण करणारी ही अभिनेत्री आजही अविवाहित आहे. मुक्ताने स्वतः लग्न न करण्याचे कारण सांगितले आहे.   

Intern | Updated: May 17, 2025, 02:24 PM IST
Mukta Barve's Birthday: अजूनही का केलं नाही लग्न? अभिनेत्रीने सांगितलं स्पष्ट कारण!

मुक्ताच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच रसिकांमध्ये कुतूहल असते. विशेषतः तिने आजवर लग्न का केलं नाही, हा प्रश्न अनेकांना सतावत असतो. पुण्यात जन्मलेल्या मुक्तामध्ये लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अभिनयाचं औपचारिक शिक्षण घेऊन तिने मनोरंजन विश्वात पदार्पण केलं आणि अगदी लवकरच आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. चित्रपट, नाटक, मालिका कोणतंही माध्यम असो, मुक्ताने प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे.

अविवाहित राहण्यामागचं तिचं स्पष्ट मत
वयाच्या 45 व्या वर्षीही अविवाहित असलेल्या मुक्ताला या विषयावर अनेकदा प्रश्न विचारले गेले. मात्र, तिने यावर फारसं खुलं उत्तर दिलं नव्हतं. काही वेळा तिने थेट टाळलं, पण एकदा एका मुलाखतीत तिने अत्यंत परखड आणि समजूतदार उत्तर दिलं. ती म्हणाली, 'मी सध्या जितकी समाधानी आणि आनंदी आहे, त्यापेक्षा जर माझं सुख आणि समाधान लग्नामुळे वाढणार असेल, तरच मी नक्कीच लग्न करेन.' या उत्तरातून तिचा विचारशील दृष्टिकोन, आत्मनिर्भरता आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यावर असलेला विश्वास दिसून येतो.

मुक्ताचा अभिनय प्रवास
मुक्ता बर्वेचे नाव आठवताचं तिच्या भूमिका आठवतात त्या म्हणजेच, 'जोगवा' मधील सुली, 'एक डाव धोबीपछाड' मधील नटखट मुलगी, 'मुंबई पुणे मुंबई' मधील स्वच्छंद आणि आधुनिक विचारांची गौरी.

तिने खेडवळ स्त्रीपासून ते आधुनिक शहरी तरुणीपर्यंतच्या अनेक भूमिका जिवंतपणे साकारल्या. लाजाळू, शांत स्वभावाची मुक्ता लहानपणी फारसं बोलत नसे. तिच्या व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास वाढवण्यासाठी तिच्या आईने 'रुसू नका फुगू नका' हे नाटक लिहून, तिला अभिनयाची संधी दिली. या नाटकात तिने भित्रा ससा आणि परी राणी या दोन भूमिका एकाच वेळी साकारल्या.

हे ही वाचा: 'अक्षय कुमारने माझा वापर केला आणि सोयीस्करपणे...', शिल्पा शेट्टीने उघड केलं होतं सत्य; 'एकाच वेळी मला आणि ट्विंकलला...'

वयाच्या 15व्या वर्षी ती रत्नाकर मतकरींच्या 'घर तिघांचं हवं' या नाटकात झळकली. नंतर तिच्या अभिनय प्रवासाला खरी चालना मिळाली 'जोगवा' या चित्रपटातून. या चित्रपटानंतर 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' मालिकेतील राधा आणि 'मुंबई पुणे मुंबई'मधील गौरी ही पात्रं प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली.

मुक्ता बर्वे ही केवळ एक अभिनेत्री नसून ती एक विचारशील आणि आत्मनिर्भर व्यक्तिमत्त्व आहे. अभिनयात जितकी ती प्रगल्भ आहे, तितकीच ती स्वतःच्या आयुष्याबाबत जागरूक आहे. लग्न करण्यासाठी समाजाच्या दबावाऐवजी स्वतःच्या सुखाची, समाधानाने जगण्याची मुक्ताने निवड केली आहे.