ख्रिसमस पार्टी भोवली; दारु, आग अन्... `त्या` कृत्यामुळे रणबीर कपूरविरोधात पोलिसांत तक्रार
Ranbir Kapoor : धार्मिक भावना दुखावल्याचा आणि सनातन धर्माचा अपमान केल्याप्रकरणी मुंबईतील दोन वकिलांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
Ranbir Kapoor : अॅनिमल चित्रपटामुळे अभिनेता रणबीर कपूर सध्या फार चर्चेत आला आहे. अशातच बॉलिवुड अभिनेता रणबीर कपूरबाबत मोठी बातमी समोर येत आहे. ख्रिसमस साजरा करणे रणबीर कपूरला महागात पडू शकते. रणबीर कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळेच रणबीर अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी रणबीर कपूरविरुद्ध मुंबईच्या घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच रणबीरविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारीमध्ये करण्यात आली आहे.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही कपूर कुटुंबीयांनी ख्रिसमस पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये संपूर्ण कुटुंब एकाच छताखाली एकत्र आले होते. व्हायरल व्हिडिओमध्ये ख्रिसमसच्या सेलिब्रेशनदरम्यान रणबीर आधी केकवर व्हाईन ओततो. त्यानंतर मेणबत्ती पेटवतो आणि शेवटी 'जय माता दी' म्हणत असल्याचे दिसत आहे. व्हाईन ओतलेला केक कापताना रणबीरचे 'जय माता दी' म्हणणे लोकांना आवडत नाही. त्यामुळे एका वकिलाने त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांनी केली असून त्यामध्ये त्यांनी भारतीय दंड संहिताच्या कलम 295A, 298,500 आणि 34 अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.
काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?
व्हिडीओमध्ये रणबीर डायनिंग टेबलवर बसलेला दिसत असून, त्याच्याच शेजारी आलियासुद्धा उपस्थित असल्याचे दिसत आहे. तिथं कुटुंबातील इतरही मंडळी आहेत, कारण त्यांचा आवाज आणि कल्ला व्हिडीओमध्ये ऐकू येतोय. त्याचवेळी कुटुंबातील एक सदस्य तिथं असणाऱ्या स्पाँज केकवर दारूची बाटली उपडी करताना दिसतोय. तो असं करत असताना मागून कोणीतरी त्याला, 'आणखी ओत...' असंही सांगत होता. इथं रणबीर केकला स्मोकी फ्लेवर देण्यासाठी म्हणून लाइटरनं तो पेटवतो आणि या साऱ्यामध्ये 'जय माता दी' असं म्हणत गंमत करताना दिसतो.
मात्र दारूने भरलेला केक कापणे आणि नंतर ‘जय माता दी’ म्हटल्याने अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्यांनी मुंबईतील घाटकोपर पोलीस ठाण्यात रणबीर कपूरविरोधात तक्रार दाखल केली आहे.
हिंदू धर्मात, इतर देवतांचे आवाहन करण्यापूर्वी अग्निदेवतेचे आवाहन केले जाते, पण कपूर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी दुसर्या धर्माचा सण साजरा करताना जाणूनबुजून हिंदू धर्मात प्रतिबंधित मादक पदार्थांचा वापर केला आणि जय माता दी अशी घोषणा दिली. या प्रकारामुळे सनातन धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहे. अशा अस्वस्थ व्हिडिओंमुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते, असे तक्रारदारांनी म्हटलं आहे.
या पार्टीत रणबीर कपूरसोबत नव्या नंदा, आलिया भट्ट, राहा कपूर, अगस्त्य नंदा, निखिल नंदा, करिश्मा कपूर, तिची मुलं समायरा आणि कियान, रणधीर कपूर, रीमा जैन, नीला देवी, बबिता कपूर आणि त्यांच्याशी संबंधित अनेक लोक उपस्थित होते. कपूर कुटुंबीय उपस्थित होते.