प्रवासाची बॅग, हातात बाप्पाची मूर्ती अन्...; 'या' ठिकाणी सुरु आहे 'नवरा माझा नवसाचा 2'चे शूटींग, Video व्हायरल

या व्हिडीओत सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, स्वप्निल जोशी, हेमल इंगळे हे कलाकार दिसत आहेत. यात व्हिडीओच्या सुरुवातीला हे चौघेजण रेल्वे स्थानकात चालताना दिसत आहेत. 

नम्रता पाटील | Updated: Mar 27, 2024, 06:44 PM IST
प्रवासाची बॅग, हातात बाप्पाची मूर्ती अन्...; 'या' ठिकाणी सुरु आहे 'नवरा माझा नवसाचा 2'चे शूटींग, Video व्हायरल title=

Navra Majha Navsacha 2 Movie Shooting : मराठी चित्रपटातील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट म्हणून नवरा माझा नवसाचा या चित्रपटाला ओळखले जाते. या चित्रपटातील गाणी, डायलॉग आणि भूमिका यावर आजही अनेक मराठी प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचे लाखो चाहते आहेत. 2004 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा पुढील भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी अवघ्या महिन्याभरापूर्वीच 'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाची घोषणा केली. आता या चित्रपटाच्या शूटींगचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाच्या शूटींगला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली. याबद्दल अभिनेते सचिन पिळगावकरांनी एक पोस्ट शेअर करत माहिती दिली होती. तसेच त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला होता. या व्हिडीओत अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर या मुहुर्तचा क्लॅप हातात घेऊन हसताना दिसत होत्या. तसेच अभिनेते सचिन पिळगावकर, अली असगर, स्वप्निल जोशी या कलाकारांसोबतच 'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटाची संपूर्ण टीमही उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. 

आणखी वाचा : 'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपटातून अशोक सराफ बाहेर? चर्चांना उधाण

त्यानंतर आता 'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाच्या शूटींगला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ रत्नागिरी रेल्वे स्थानकातील आहे. या व्हिडीओत सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, स्वप्निल जोशी, हेमल इंगळे हे कलाकार दिसत आहेत. यात व्हिडीओच्या सुरुवातीला हे चौघेजण रेल्वे स्थानकात चालताना दिसत आहेत. यावेळी स्वप्निलच्या हातात गणपती बाप्पाची सुबक मुर्ती पाहायला मिळत आहे. तर सचिन पिळगावकरांच्या हातात एक बॅग दिसत आहे. ते एका ढोलकी वादन करणाऱ्याला काहीतरी विचारताना दिसत आहेत.

यावेळी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर चित्रपटाची संपूर्ण टीम, क्रू मेंबर्स, कॅमेरामॅन आणि इतर तंत्रज्ञ मंडळीही दिसत आहेत. या व्हिडीओवर "नवरा माझा नवसाचा 2, स्थळ-रत्नागिरी, शूटींग" असे लिहिण्यात आले आहे. हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. 

आणखी वाचा : '...म्हणून आम्ही प्रशांत दामलेंची भूमिका कापली', ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील अभिनेत्याने केला खुलासा

दरम्यान 'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, अलीसागर, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, संतोष पवार अशी दिग्गज कलाकारांची फौज असणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे. आता चित्रपटाची कथा काय असणार? कधी प्रदर्शित होणार? असे प्रश्न अनेक प्रेक्षकांना पडले आहेत. पण याची उत्तरं या चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर आल्यानंतरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत.