India Pakistan Tension : भारत आणि पाकिस्तान याच्यामध्ये शस्त्रसंधीनंतर सीमाभागात आता कुठे शांततेचं वातावरण पाहायला मिळालं. असं असतानाही या दोन्ही देशांमध्ये धुमसणारी ठिणगी मात्र अद्याप विझली नाही, हे म्हणणं गैर ठरणार नाही. भारत आणि पाकिस्तान या देशामधील तणावाचे पडसाद सर्वत क्षेत्रांमध्ये पाहायला मिळाले. अगदी कलाविश्वसुद्धा इथं मागे राहिलं नाही.
भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदीच्या मागणीपासून ते अगदी काही जुने व्हिडीओ व्हायरल होईपर्यंतच्या असंख्य चर्चा मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या. त्यातच आता अभिनेता इरफान खान याचाही एक व्हिडीओ नेटकरी वारंवार पाहत आहेत. बरं, फक्त व्हिडीओ पाहतच नाहीयेत तर, इरफानच्या बोलण्याच्या शैलीवरून त्याचं कौतुकही करत आहेत.
अष्टपैलू अभिनेता अशी ओळख असणाऱ्या इरफानला एका कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानच्या एका पत्रकारानं पाकमध्ये येण्यासंदर्भातील प्रश्न विचारला होता. 'Hello इरफान भाई.... पाकिस्तानमध्येही तुमचा फार मोठा चाहतावर्ग आहे. तुम्ही पाकिस्तानला यावं अशी आमची इच्छा आहे, तो आमच्यासाठी सुवर्णक्षण असेल....' असं म्हणत पत्रकारानं त्याचा प्रश्न सादर केला.
पाकिस्तानातील या पत्रकाराच्या प्रश्नाचं क्षणातजच उत्तर देत इरफान म्हणाला, 'मी तिथं येईन, पण परत येईन की नाही?' असा प्रतिप्रश्न त्यानं केला. इरफानची उत्तर देण्याची ही शैली पाहून या कार्यक्रमासाठी असणाऱ्या प्रेक्षकांमध्येही एकच हशा पिकला.
Today we have S-400, AkashTeer, but back then, we had Irrfan Khan to destroy Pakistan pic.twitter.com/DEhrqVem3b
— BALA (@erbmjha) May 13, 2025
इरफानचा हा व्हिडीओ नेमका तेव्हाच व्हायरल होत आहे, जेव्हा पाकिस्तानी कलाकाराना भारतात बंदी घालण्यात आली आहे. इतकंच नव्हे, तर भारतीय माहिती व प्रसारण मंत्रालयानं या तणावग्रस्त परिस्थितीमध्ये पाकिस्तानी कलाकृतीना देशातील सर्व माध्यमांवरून काढण्याचेही निर्देश दिले होते. ज्यामुळं भारतात सध्या पाकिस्तानी कलाकृती आणि कलाकारांना थारा देण्यात आलेला नाही हीच वस्तूस्थिती. तूर्तात इरफानचा हा व्हिडीओ आणि त्यानं पाकिस्तानी पत्रकाराला दिलेलं उत्तर पाहून चाहते म्हणतायत, 'मान गये इरफान मियाँ....'.