भारतातच प्रसिद्धी, पैसा कमवून Instagram वरुन Indian Army चा अपमान करणाऱ्या माहिरा, फवादला दणका; यापुढे...

Mahira Khan Fawad Khan Anti India Statement: भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी पोस्ट केलेल्या भारतविरोधी इन्स्टाग्राम स्टोरी, त्यावरुन आता त्यांना भारताने दणका दिलाय.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 9, 2025, 08:28 AM IST
भारतातच प्रसिद्धी, पैसा कमवून Instagram वरुन Indian Army चा अपमान करणाऱ्या माहिरा, फवादला दणका; यापुढे...
भारतात प्रसिद्धी पैसा कमवून भारताविरोधातच ओकली गरळ

AICWA On Mahira Khan Fawad Khan Anti India Statement: 'ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन'ने (एआयसीडब्यूए) पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान आणि फवाद खानने केलेल्या भारतविरोधी विधानांचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे. भारताने 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 7 मे च्या मध्यरात्री हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. मात्र पाकिस्तानवर हल्ला केल्याने भारतात येऊन पैसे आणि प्रसिद्धी कमावणाऱ्या काही पाकिस्तानी कलाकारांनी चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात त्याप्रमाणे भारतावरच टीका केली. या कलाकारांनी आपल्या इन्स्टाग्राम आणि सोशल मिडिया अकाऊंट्सवरुन भारताविरोधात गरळ ओकल्यानंतर आता एआयसीडब्यूएने या कलाकरांना सुनावलं आहे.

फवाद आणि माहिराच्या विधानाचा निषेध

पाकिस्तानी कलाकारांवर भारतामध्ये पूर्णपणे बंदी घालावी अशी मागणी 'ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन'ने केली आहे. माहिरा आणि फवादने केलेल्या भारतविरोधी विधानांवरुन संताप व्यक्त करताना 'ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन'ने एक पत्रकच जारी केलं आहे. या पत्रकामध्ये माहिराने भारतीय लष्कराने (संरक्षण दलांनी) केलेल्या कारवाईला, 'फारच भित्रे' म्हटल्यावरुन आक्षेप घेतला आहे. तर फवाद खानने दहशतवादाचा विरोध करण्याऐवजी खोट्या भूमिकांना पाठिंबा दिल्याचा ठपका ठेवत 'ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन'ने त्याला खडे बोल सुनावले आहेत.

फवाद आणि माहिराची विधानं हा भारतीय सैनिकांचा अपमान

फवाद आणि माहिराने केलेली विधान ही भारताचा 'अपमान करणारी' आहेत. तसेच, "देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांचा हा अपमान आहे," अशा शब्दांमध्ये 'ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन'ने दोन्ही पाकिस्तानी कलाकारांच्या भूमिकेचा निषेध केला आहे. यापुढे या दोघांसहीत कोणत्याही पाकिस्तानी कलाकारासोबत भविष्यात कोणताही भारतीय काम करणार नसल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

पाकिस्तानी कलाकारांवर घातली बंदी

'ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन'ने सर्व पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालत असल्याचं जाहीर केलं आहे. पाकिस्तानी कलाकारांबरोबर चित्रपट निर्माते,अर्थ पुरवठादारांना भारतीय मनोरंजन क्षेत्रात काम करता येणार नाही, असं 'ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन'ने सांगितलं आहे. "मनोरंजन क्षेत्रात कोणत्याही पाकिस्तानी व्यक्तीसोबत भारतीय काम करणार नाही. तसेच अंतरराष्ट्रीय स्तरावरही पाकिस्तानी कलाकारांबरोबर भारतीय कलाकार स्टेज शेअर करणार नाहीत," असं 'ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन'ने स्पष्ट केलं आहे.

सर्व पाकिस्तानी कार्यक्रम, गाणी, पॉडकास्ट बंद करण्याचे निर्देश

भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (MIB) भारतातील सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म, मीडिया स्ट्रीमिंग सेवा आणि इंटरमीडिएर्सला पाकिस्तानमध्ये निर्मिती झालेल्या वेब सिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट आणि इतर स्ट्रीमिंग सेवा तात्काळ थांबवण्याचे निर्देश गुरुवारीच दिले आहेत.