शेफालीच्या निधनानंतर अजूनही सावरलेला नाही पराग त्यागी; पत्नीच्या आठवणीत भावुक म्हणाला, 'माझ्या आयुष्यात…'

पराग त्यागी शेफालीसाठी भावनिक, व्हिडीओ पाहून मन हलके होईल  

कावेरी पिंपळे | Updated: Dec 15, 2025, 07:15 PM IST
शेफालीच्या निधनानंतर अजूनही सावरलेला नाही पराग त्यागी; पत्नीच्या आठवणीत भावुक म्हणाला, 'माझ्या आयुष्यात…'

Parag Tyagi's Emotional Post : टेलिव्हिजन विश्वात ‘कांटा लगा गर्ल’ म्हणून ओळख मिळवलेल्या आणि ‘बिग बॉस 13’मुळे घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं अवघ्या 42 व्या वर्षी निधन झालं. 27 जून रोजी तिच्या अचानक जाण्याची बातमी समोर आली आणि संपूर्ण मनोरंजनसृष्टीसह चाहत्यांना मोठा धक्का बसला. शेफालीच्या निधनानंतर तिचा पती, अभिनेता पराग त्यागी पूर्णपणे खचून गेला आहे. या धक्क्यातून तो अजूनही सावरलेला नाही, हे त्याच्या सोशल मीडिया पोस्ट्सवरून स्पष्टपणे दिसून येत आहे.

Add Zee News as a Preferred Source

पराग त्यागी अनेकदा सोशल मीडियावर शेफालीच्या आठवणीत भावनिक पोस्ट शेअर करत असतो. तिच्यासोबतचे फोटो, जुन्या आठवणींचे व्हिडीओ आणि मनाला भिडणारी कॅप्शन्स यामुळे चाहत्यांचेही डोळे पाणावतात. परागची प्रत्येक पोस्ट शेफालीच्या चाहत्यांसाठी तसेच त्यांच्या जवळच्या मित्रमंडळींसाठी हृदय हेलावून टाकणारी ठरत आहे. आज शेफाली जरीवालाचा वाढदिवस आहे. या खास दिवशी पराग त्यागीने पुन्हा एकदा त्याच्या लाडक्या ‘परी’ची आठवण जपणारा एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शेफाली जरीवाला आणि परागची आई एकत्र नाचताना दिसत आहेत. दोघीही मनसोक्त आनंद घेताना आणि हसताना पाहायला मिळतात. हा जुना व्हिडीओ असला, तरी त्यामधील भावनांनी चाहत्यांना चांगलंच भावूक केलं आहे.

या व्हिडीओसोबत परागने लिहिलेलं कॅप्शन विशेष लक्ष वेधून घेत आहे. परागने लिहिलं आहे, 'लोक म्हणतात की एका पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, कारण माझ्या आयुष्यात परी आणि आई या दोन महिला आहेत. मित्रांनो, या दोघींचाही वाढदिवस एकाच दिवशी 15 डिसेंबरला असतो. Happy Birthday my life… शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यावर प्रेम करत राहीन.'

परागची ही पोस्ट वाचून चाहते आणि मित्रमंडळी प्रचंड भावूक झाले आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी कमेंट्स करत परागला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. 'ती नेहमी तुझ्यासोबत आहे', 'तुला खूप ताकद मिळो', अशा शब्दांत चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शेफाली जरीवालाने 2014 साली अभिनेता पराग त्यागीशी विवाह केला होता. लग्नाआधी हे दोघंही काही काळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. लग्नानंतर दोघांनीही आपलं नातं नेहमीच सकारात्मक आणि प्रेमळ पद्धतीने जपलं. या जोडप्याच्या लग्नाला तब्बल 11 वर्षे झाली होती. मात्र, काही महिन्यांपूर्वीच शेफालीच्या अचानक निधनामुळे परागच्या आयुष्यात दुःखाचं सावट पसरलं आहे.

शेफालीच्या आठवणींमध्ये रमलेला पराग त्यागी अजूनही या दु:खातून सावरलेला नसला, तरी तिच्या आठवणी जपून ठेवत, प्रेम आणि भावना व्यक्त करत तो तिच्या चाहत्यांच्या मनालाही स्पर्श करत आहे.

FAQ

शेफाली जरीवालाचा निधन कधी आणि किती वयात झाला?
शेफाली जरीवालाचं 27 जून रोजी अवघ्या 42 व्या वर्षी निधन झालं.

शेफालीच्या वाढदिवसानिमित्त पराग त्यागीने काय शेअर केलं?
शेफालीच्या वाढदिवसानिमित्त पराग त्यागीने तिचा एक जुना भावनिक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये शेफाली आणि परागची आई एकत्र नाचताना दिसत आहेत.

पराग त्यागीच्या पोस्टमुळे चाहत्यांची काय प्रतिक्रिया होती?
परागच्या भावनिक पोस्टमुळे चाहते प्रचंड भावूक झाले असून, अनेकांनी कमेंट्सद्वारे परागला धीर आणि आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.

About the Author

kaveri pimpley

कावेरी पिंपळे सध्या ‘झी २४ तास डिजिटल’मध्ये कंटेंट एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पत्रकारितेचा चार वर्षांचा अनुभव आहे.

...Read More