बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनी 'हेरा फेरी 3' चित्रपट सोडल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. परेश रावल यांनी अचानक चित्रपट सोडल्याने निर्मात्यांपैकी एक असणाऱ्या अक्षय कुमारने 25 कोटींची नुकसान भरपाईची नोटीस पाठवली आहे. दरम्यान 'मिड डे'ला दिलेल्या मुलाखतीत परेश रावल यांनी आपण नेमका चित्रपट का सोडला याचं कारण सांगितलं आहे. आपल्या निर्णयानंतर प्रियदर्शन यांनी तो बदलण्यासाठी प्रयत्न केल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे.
"मला माहिती आहे की, हा अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का आहे. जेव्हा प्रियदर्शन दिग्दर्शन करतात तेव्हा आमच्या तिघांची जोडी जबरदस्त असते याची मला कल्पना आहे. पण मला त्यांचा भाग आहोत असं वाटत नसल्याने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला," असं परेश रावल म्हणाले.
"सध्या तरी हे अंतिम आहे. मी नेहमीच म्हणतो की कधीही नाही म्हणू नका. भविष्यात काय होईल हे कोणी सांगू शकत नाही," असंही सूचक विधान परेश रावल यांनी केलं.
18 मे रोजी परेश रावल यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत, क्रिएटिव्ह मतेभद किंवा पैशांच्या मुद्द्यांवरुन चित्रपट सोडला नसल्याचं सांगितलं होतं. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "हेरा फेरी 3 मधून बाहेर पडण्याचा माझा निर्णय क्रिएटिव्ह मतभेदांमुळे नव्हता हे मी सांगू इच्छितो. मी पुन्हा सांगतो की चित्रपट निर्मात्याशी कोणताही क्रिएटिव्ह मतभेद नाही. चित्रपट दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्याबद्दल मला अपार प्रेम, आदर आणि विश्वास आहे."
दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्याप्रती प्रेम व्यक्त करताना परेश रावल म्हणाले, "माझं प्रियदर्शन यांच्यावर प्रेम आहे आणि एक दिग्दर्शक म्हणून त्यांच्याप्रती खूप आदर आणि विश्वास आहे. आम्ही पूर्वीही एकत्र अद्भुत चित्रपट केले आहेत आणि पुढेही करत राहू. कोणतेही क्रिएटीव्ह मतभेद नव्हते आणि त्यांच्यासोबत असं होण्याची शक्यताही नाही".
पैशाची समस्या आहे का? असं विचारलं असता, परेश रावल यांनी सांगितलं, "प्रेक्षकांच्या प्रेमाची आणि आदराची तुलना पैशांशी करता येत नाही. सध्या, मला असे वाटलं की ही एक भूमिका आहे जी मी करू इच्छित नाही, इतकंच."
प्रियदर्शन यांनी आपलं मन वळवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केल्याचंही ते म्हणाले. त्यांनी स्पष्ट केलं की, "प्रियदर्शनजींनी माझं मत बदलण्याचा प्रयत्न केला पण ते [मला] ओळखतात. त्यांना सर्वांना माहिती आहे की जर मी काही ठरवले तर मी तेच करतो. म्हणून ते पुढे जात नाहीत."
या चित्रपटासाठी परेश रावल यांना त्यांच्या नेहमीच्या मानधनापेक्षा तिप्पट जास्त मानधन देण्यात आल्याची माहिती आहे. अक्षय, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांनी यावर्षी एप्रिलमध्ये चित्रपटाचं चित्रीकरण सुरू केलं होते. अक्षय 'हेरा फेरी 3' चा निर्माता देखील आहे. त्याने निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्याकडून कायदेशीररित्या हक्क खरेदी केले आहेत.