)
'स्वराज्याचं रक्षण करायला राजे पुन्हा येत आहेत...' असं म्हणत महेश मांजेरकर लिखित आणि दिग्दर्शित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 31 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं टीझर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. महाराजांचे आतापर्यंत आपण नेतृत्व, दृष्टीकोन, धैर्य, धोरणात्मक विचार यासारखे गुण पाहिले आहेत. पण आता पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज यांचे आक्रमक रुप पाहायला मिळत आहे.
या टीझरमधून महाराजांच्या मराठी अस्मितेचा मुद्दा, शेतकऱ्याच्या आत्महत्येचा मुद्दा आणि मुंबईत मराठी माणसाचं असलेलं स्थान यावर भाष्य केलं आहे.
सिद्धार्थ बोडके या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. महाराजांच्या भूमिकेसाठी महेश मांजरेकरांनी एका वेगळ्या अभिनेत्याचा विचार केला आहे. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या सिनेमात विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री अशी कलाकारांची तगडी फौज आहे. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले, “माझ्यासाठी हा चित्रपट म्हणजे आजच्या समाजाशी भिडण्याचा प्रयत्न आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांनी केवळ स्वराज्य उभं राहिलं नाही, तर एक जनमानस जागृत झाले. आजच्या पिढीपुढे असलेल्या प्रश्नांकडे पाहाताना, त्याच विचारांचा प्रकाश पडद्यावर आणायचा आहे. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा प्रवास इतिहास सांगणारा असेलच, त्याचबरोबर वर्तमानाला प्रश्न विचारणारा, त्याला जागवणारा आणि दिशा दाखवणारा ठरेल. कलाकार म्हणून मी गप्प बसू शकत नाही आणि हा सिनेमा माझ्या अस्वस्थतेचा, माझ्या जिव्हाळ्याचा आवाज आहे.”
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट कशाबद्दल आहे?
हा चित्रपट 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय!' चा सिक्वेल आहे. मूळ चित्रपटात एक सामान्य माणूस (दिनकर भोसले) आपल्या ओळखीच्या संकटात सापडतो आणि शिवाजी महाराजांच्या आत्म्याची मदत घेऊन सामाजिक अन्यायाविरुद्ध लढतो. सिक्वेलमध्ये सामाजिक आणि राजकीय मुद्दे, विशेषतः महाराष्ट्राच्या ओळखीशी संबंधित थीम्स दाखवल्या जाणार आहेत. कथेचे तपशील अद्याप गोपनीय आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते कोण आहेत?
दिग्दर्शक आणि लेखक: महेश मंजरेकर. निर्माते: राहुल जोशी आणि महेश मंजरेकर.
चित्रपटातील मुख्य कलाकार कोण आहेत?
सिद्धार्थ बोडके (छत्रपती शिवाजी महाराज), सचिन खेडेकर (दिनकर भोसले), महेश मंजरेकर (विशेष भूमिका), प्रिया बापट (मुख्य नायिका). मूळ चित्रपटातील इतर कलाकार जसे मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव इ. परत येण्याची शक्यता आहे.