)
Shivaji Park Dusshera Melava : मे महिन्यापासून सुरु झालेला पाऊस अद्यापही थांबण्याचं नाव घेत नाहीये. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे यंदा दसऱ्यातही पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे दरवर्षी शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर पावसाचं संकट ओढावलं आहे.
दसरा मेळावा म्हटलं की डोळ्यासमोर येतो शिवाजी पार्क आणि शिवसैनिकांनी गज्ज भरलेलं मैदान. या मैदानानं अनेक दसरा मेळावे गाजवले. यावर्षीचा दसरा मेळावा आणखी खास असणार आहे. कारण उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंचे सूर जुळल्याने आणि हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याने मनसे आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यात शिवसेना UBTकडून भव्य शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे. गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडण्याचीही शक्यता आहे.
शिवसेनेच्या स्थापनेपासून दरवर्षी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर या ठिकाणी मेळावा घेण्यासाठी शिंदे गटानेही परवानगी मागितली होती. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून या मैदानावरील मेळाव्यासाठी दोन्ही गटांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली. यंदा मात्र यावर जास्त काही वाद न होता, हे मैदान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालं आहे. तर शिंदेंचा मेळावा हा आझाद मैदानावर होणार आहे. एकीकडे मेळाव्याची लगबग सुरु असताना दुसरीकडे मात्र शिवाजी पार्कची परिस्थीती ही बिकट आहे.
यंदाच्या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट ओढावलं आहे. दसरा मेळावा अवघ्या काही दिवसांवर आला असताना मुंबईत पावसानंही जोर धरला आहे. त्यामुळे शिवाजी पार्कमध्ये सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळतं आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कमध्ये येतात. या सर्व शिवसैनिकांची सोय कशी करायची यावर पक्षामध्ये चर्चा सुरु आहे.
मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. यंदा अतिवृष्टीने आणि महापूराने मराठवाड्याला अक्षरश: झोडपून काढलं आहे. शेतातील उभ्या पिकांचा चिखल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी दोन तास चिखलात उभं राहिलं तर काय बिघडतं असं म्हणत दसरा मेळावा शिवाजी पार्कातच घेण्याचा निर्धार उद्धव ठाकरेंनी केला आहे.
पावसानं अनेक नेत्यांच्या सभा गाजवल्या. शरद पवारांची साताऱ्यात भर पावसात झालेली सभा अजूनही कोणी विसरलेलं नाही. त्यामुळे दसरा मेळाव्यावरील पावसाचं सावट हे उद्धव ठाकरेंसाठी टर्निंग पॉईंटही ठरू शकतं.
FAQ
यंदा दसरा मेळावा का खास ठरणार?
उद्धव आणि राज ठाकरे बंधूंचे सूर जुळल्याने आणि दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याने मनसे आणि शिवसेना UBT च्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. गर्दीचे रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे.
पावसाचा अंदाज काय?
मे महिन्यापासून सुरू असलेला पाऊस अद्याप थांबलेला नाही. हवामान खात्याने बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दसऱ्यातही पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवला आहे.
शिवाजी पार्कची सध्याची स्थिती कशी?
मुंबईत पावसाने जोर धरल्याने शिवाजी पार्कमध्ये सर्वत्र चिखल आणि पाणी साचले आहे. मेळाव्यासाठी शिवसैनिकांची सोय कशी करायची यावर पक्षात चर्चा सुरू आहे.