पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवर `कलंक`
`हमसे ज्यादा बरबाद कोई नही इस दुनिया में`
मुंबई : सोशल मीडियाचा वापर हा फक्त आणि फक्त मनोरंजन किंवा ट्रोलिंगसाठी होतो असा अनेकांचा समज गेल्या काही दिवसांपासून दृढ झाला आहे. पण, याला शह देत पोलीस खात्याकडून मात्र याच सोशल मीडियाचा वापर जनजागृती आणि गुन्हेगारांना ताकीद देण्यासाठी करण्यात येत आहे. राजस्थान पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवरुन याचच एक उदाहरण नुकतच पाहायला मिळालं. मुंबई, नागपूर यांच्यामागोमाग आता राजस्थान पोलिसांनी चक्क बॉलिवूड चित्रपटाच्या नावाचा आणि पोस्टरचा वापर करत साकारण्यात आलेलं मीम हे अमली पदार्थांविरोधी मोहिमेसाठी वापरलं आहे.
आलिया भट्टची झलक असणारं 'कलंक' चित्रपटाचं पोस्टर राजस्थान पोलिसांनी ट्विट केलं. ज्यावर 'हमसे ज्यादा बरबाद कोई नही इस दुनिया में', असं लिहिण्यात आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या य़ा ओळीचा अफलातून आणि पुरेपूर वापर राजस्थान पोलिसांनी केल्याचं त्यांचं ट्विट पाहून लक्षात येत आहे.
'अमली पदार्थ खरेदी करण्यासाठी, तुम्ही पैसे चोरताय? तर मग, चोरीचा हा कलंक आणि अमली पदार्थांचं व्यसन तुमचा आनंद हिरावून घेऊ शकतं. त्यामुळे अमली पदार्थांचं सेवन टाळा नाहीतर ते तुमचा घात करतील', असं या ट्विटमध्ये लिहिण्यात आलं आहे. कलंक चित्रपटातील सर्व कलाकारांसह करण जोहरलाही या ट्विटमध्ये टॅग करण्यात आलं होतं. ज्याची दखल घेत वरुण धवननेही अमली पदार्थांचं सेवन करु नका, असं म्हणत पोलिसांच्या या ट्विटला रिट्विट केलं.
अभिषेक वर्मा दिग्दर्शित आणि करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असणाऱ्या चित्रपटात आलिया भट्ट, वरुण धवन, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर हे कलाकार झळकणार आहेत. १७ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.