मुंबई : राजस्थानातील राजपूत करणी सेना पुन्हा एकदा सक्रिय झाली असून, ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांना निशाणा करण्यात येत आहे. करणी सेनेची सध्याची आक्रमक भूमिका पाहता त्यांनी अख्तर यांना थेट घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे. सामनातील अग्रलेखातून बुरखा बंदीची मागणी करणाऱ्या शिवसेनेची एकंदर भूमिका पाहता घुंगट बंदीही करावी अशी मागणी अख्तर यांनी केली होती. ज्यानंतर त्यांनी करणी सेनेचा रोष ओढावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करणी सेनेच्या महाराष्ट्र विंगच्या अध्यक्षपदी असणाऱ्या जीवन सिंह यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली. 'बुरखा हा दहशतवादाशी जोला गेला असून राष्ट्रीय सुरक्षिततेच्या  मुद्द्याशीही तो निगडीत आहे. त्यामुळे अख्तर यांनी तीन दिवसांमध्ये त्यांच्या या वक्तव्याबद्दल माफी मागावी नाहीतर पुढे येणाऱ्या परिणामांचा सामना करण्यास तयार रहावं', असा इशाराच करणी सेनेकडून देण्यात आला आहे. 


माफी मागितली नाही तर, अख्तर यांचे डोळे काढून हातात देऊ आणि त्यांची जीभ हासडू अशी धमकी त्यांना करणी सेनेकडून देण्यात आली आहे. इतकच नव्हे तर त्यांना घरात घुसून मारू असंही धमकवण्यात आलं आहे. त्यामुळे आता या आक्रमक करणी सेनेला शांत करण्यासाठी जावेद अख्तर त्यांच्या ठाम भूमिकेविषयी माफी मागणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  घुंगट बंदीविषयीच्या वक्तव्यानंतर अख्तर यांनी एक एक ट्विट करत आपलं स्पष्टीकरण दिलं होतं. त्याचविषयी आता या प्रकरणाला पुढे काय वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 



काय म्हणाले होते अख्तर? 


गुरुवारी भोपाळमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते म्हणाले, 'बुरखा बंदी करण्याची मागणी तुम्ही करत असाल आणि ही कोणा एकाची विचारसरणी असेल तर त्यावर माझा काहीच आक्षेप नाही. पण, आता लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात  राजस्थानच्या सरकारने राज्यात घुंगटबंदीही जाहीर करावी. मला असं वाटतं की घुंगट आणि बुरखा या दोन्ही प्रथा बंद व्हाव्यात.' या प्रथा बंद झाल्यास आपल्याला आनंद होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. त्यांच्या याच भूमिकेवर करणी सेनेकडून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली.