बॉलिवूड अभिनेता आमीर खान (Aamir Khan) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या ड्रीम 11 (Dream 11) च्या जाहिरातीमुळे चर्चेत आहेत. जाहिरातीमधील त्यांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडली आहे. जाहिरात रिलीज झाल्यानंतर काही वेळातच तुफान व्हायरल झाली होती. त्यातच आता जाहिरातीचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. यामध्ये दोघांनी वेगवेगळी जाहिरात केल्याचं दिसत आहे. ड्रीम 11 च्या या जाहिरातीही प्रेक्षकांना आवडत आहेत. यामध्ये दोघेही ड्रीम 11 संघासाठी धोरण आखताना दिसत आहेत. या जाहिरातील त्यांच्यासोबत भारतीय क्रिकेटर रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव दिसत आहे. आमीर खानने रणबीर सिंग बोलायला लावत त्याला ट्रिक केल्यानंतर आता रणबीर कपूर अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाच्या मदतीने आमीर खानविरोधात योजना आखत असल्याचं दिसत आहे.
नव्या जाहिरातीत रणबीर कपूर आमीर खानच्या उंचीवरुन त्याची खिल्ली उडवताना दिसत आहे. जाहिरातीच्या सुरुवातीला रणबीर कपूर आमीर खानला सांगतो की, 'जड्डू, आपल्याला आमीर सरांच्या डोक्याला टार्गेट करायचं आहे. तू बाऊन्सरची प्रॅक्टिस सुरु कर'. यावर जडेजा आपण फिरकी गोलंदाज असून, बाऊन्सरसाठी लागणारा वेग कमी पडेल असं उत्तर देतो. त्यावर रणबीर त्याला सांगतो, 'आमीर सरांची उंची पण कमी आहे'.
दरम्यान एका वेगळ्या जाहिरातीत, आमीर भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहसोबत नवीन खेळाडूंना सामावून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. बुमराह सूर्यकुमार यादवची ओळख करुन देत तो त्यांच्या संघातील सर्वोत्तम स्लेजर असू शकतो असं सांगतो. यावर आमीर खान सूर्यकुमार यादवला 'रणबीर 11' मधील एखाद्याला बाद केल्यानंतर तो कसा स्लेजिंग करेल असं विचारतो. त्यावर सूर्यकुमार उत्तर देतो की, तो कानाखाली वाजवेल. यावर आमीर आश्चर्यचकित होताच सूर्यकुमार गाणं असं स्पष्ट करतो आणि रणबीरच्या 'ए दिल है मुश्किल' चित्रपटातील 'चन्ना मेरेया' वाजवायला सुरुवात करतो. यावर आमीर आनंदी होतो आणि सूर्यकुमार यादवसोबत नाचू लागतो आणि म्हणतो, "टीममध्ये स्वागत आहे, यार."
पहिल्या जाहिरातीत आमीर खान रणबीर कपूरला रणबीर सिंग अशी ओळख करुन देत असल्याने वाद झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. तर रणबीर कपूर आमीर खानला म्हातारा म्हणत आता निवृत्त व्हा असं सांगतो.