बॉक्स ऑफिसवर धुरंधरचा धडाका; रणवीर सिंगची भावूक पोस्ट चर्चेत

सध्या रणवीर सिंगचा धुरंधर चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अशातच रणवीर सिंगने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

सोनेश्वर पाटील | Updated: Dec 15, 2025, 07:18 PM IST
बॉक्स ऑफिसवर धुरंधरचा धडाका; रणवीर सिंगची भावूक पोस्ट चर्चेत

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या बहुचर्चित चित्रपट ‘धुरंधर’च्या यशाचा मनमुराद आनंद घेत आहे. 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या 10 दिवसांत भारतात 350 कोटींपेक्षा अधिक कमाई केली असून, जगभरात 500 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. बॉक्स ऑफिसवर मिळणारा जबरदस्त प्रतिसाद आणि प्रेक्षकांची पसंती यामुळे ‘धुरंधर’ सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

Add Zee News as a Preferred Source

‘धुरंधर’ला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून, चित्रपटाला मोठा फायदा होत आहे. अनेक ठिकाणी प्रेक्षकांच्या वाढत्या गर्दीमुळे सिनेमागृहांमध्ये शोज वाढवण्यात आले आहेत. सोशल मीडियावरही चित्रपट पाहण्यासाठी थिएटरबाहेर लागलेल्या रांगांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या यशामुळे कलाकारांपासून निर्मात्यांपर्यंत सगळेच आनंदात असल्याचं पाहायला मिळत आहे.

रणवीर सिंहची भावूक पोस्ट

या प्रचंड यशाच्या दरम्यान रणवीर सिंगने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर त्याने लिहिलं, किस्मत की एक बहुत खूबसूरत आदत है, कि वो वक्त आने पर बदलती है… लेकिन फिलहाल… नजर और सब्र. यासोबत त्याने हात जोडणारा इमोजीही शेअर केला आहे. ‘धुरंधर’च्या यशानंतर रणवीरची ही पहिलीच प्रतिक्रिया असल्याने चाहत्यांमध्ये या पोस्टची विशेष चर्चा होत आहे.

दमदार स्टारकास्ट आणि अभिनय

आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘धुरंधर’मध्ये रणवीर सिंगसोबत संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन, अक्षय खन्ना यांसारखे दिग्गज कलाकार झळकत आहेत. 40 वर्षीय रणवीर सिंग या चित्रपटात भारतीय गुप्तहेर हमजा अल मझारीच्या भूमिकेत दिसत असून, त्याचा प्रभावी आणि दमदार अभिनय प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. रणवीरच्या अपोजिट चित्रपटात 20 वर्षांची अभिनेत्री सारा अर्जुन दिसत आहे.

‘धुरंधर 2’चीही घोषणा

‘धुरंधर’ची कथा इथेच संपत नसून, चित्रपटाचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या शेवटीच ‘धुरंधर 2’ची घोषणा करण्यात आली असून, हा सिक्वेल 19 मार्च 2026 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहत्यांचा उत्साह आणखी वाढला आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, ‘धुरंधर’मध्ये पाकिस्तानची वास्तविक परिस्थिती दाखवल्यामुळे गल्फ देशांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपटाने मोठी कमाई करत आपली ताकद सिद्ध केली आहे.

.

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More