Red Soil Stories : शिरीष गवससोबत 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? अवघ्या पंधरा दिवसात..., बायकोने सगळंच सांगितलं

Red Soil Stories चे लोकप्रिय यूट्यूबर शिरीष गवस याचा मृत्यू नेमका कसा झाला, डॉक्टरांच्या दुर्लक्ष की सोशल मीडियाचा अतिवापर नेमकं काय झालं त्या दिवशी, याबद्दल पहिल्यांदाच शिरीषची पत्नी पूजा गवस हिने सगळंच सांगून टाकलं.   

नेहा चौधरी | Updated: Oct 12, 2025, 05:46 PM IST
Red Soil Stories : शिरीष गवससोबत 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? अवघ्या पंधरा दिवसात..., बायकोने सगळंच सांगितलं

Red Soil Stories : कोकणातील प्रसिद्ध इन्फ्लूएन्सर शिरीष गवसचं  2 ऑगस्ट 2025 ला निधन झालं.  रेड सॉइल स्टोरीज या प्रसिद्ध यूट्यूब चॅनलचा निर्माता शिरीष आणि त्याची बायको पूजा महाराष्ट्रातील घराघरात नाही तर जगभरात नावारुपाले आले. पण अचानक शिरीषच्या जाण्यामुळे हे चॅनेल बंद होणार का? एवढा कमी वयात शिरीषचं जाण्यामागे नेमकं कारण काय, सोशल मीडियाच्या अतिवापर की डॉक्टरांचं दुर्लक्ष की, शिरीषने आपल्या प्रकृतीची काळजी घेतली नाही, असे अनेक प्रश्न गेल्या दोन महिन्यांमध्ये चाहत्यांसोबत इतर इन्फ्लूएन्सर उपस्थितीत केले होते. अखेर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शिरीषची बायको आणि रेड सॉइल स्टोरीजची निर्माती पूजा गवसने दिली आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्यात सगळंच सांगून टाकलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

रेड सॉइल स्टोरीज हे बंद होणार का?

कोरोना काळात मुंबईत शिरीषची आयटीची नोकरी गेली. तर पूजाला सिनेसृष्टीत फिल्म मेकिंग क्षेत्रात हवं तसं काम मिळत नव्हतं. अखेर त्यांनी कोकणात त्यांचं गावी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी यूट्यूब चॅनल रेड सॉइल स्टोरीज सुरु केलं. शिरीषच्या जाण्यामुळे आता रेड सॉइल स्टोरीज हे बंद होणार का? असा प्रश्न सर्वांना पडला होता. तर पूजाने स्पष्टपणे सांगितलं की, शिरीषचं हे स्वप्न ती कधी बंद पडू देणार नाही. प्रत्येक व्हिडीओमागे त्याची मेहनत आहे, हे व्हिडीओ म्हणजे शिरीषचा श्वास होते. त्याची ही मेहनत वाया जाऊ द्यायची नाही, असा निर्धार पूजाने केला आहे. पूजा म्हणाले की, त्याच्या जाण्यामुळे हे घर सुन्नसुन्न वाटतंय, पण तरी हिम्मत न हरता मी हे चॅनेल सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

अवघ्या पंधरा दिवसात...,

जुलै महिन्यात अचानक शिरीषला फिट आली आणि अवघ्या पंधरा दिवसात शिरीष आम्हाला कायमचं सोडून निघून गेला. हे सगळं इतकं अचानक घडलं की पुढचे कित्येक दिवस ही गोष्ट पचवणं खूप जड गेलं. डॉक्टरांनी ब्रेन ट्यूमर अस निदान केलं. एक अत्यंत तल्लख बुद्धीच्या, प्रज्ञावान माणसाला नेमका मेंदूचा आजार व्हावा हेच मुळात न पटण्यासारखा होतं. शिरीषच्या मृत्यूने आम्ही परिवारच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि जगभरातली कितीतरी कुटुंब हळहळली. 

शिरीषला नेमकं काय झालं होतं?

पूजाने पुढे सांगितलं की, साधारण मार्च एप्रिलपासून शिरीषला मध्येमध्ये सर्दीचा त्रास सुरु झाला. कधीकधी शिरीषचं डोकेदुखी पण होतं. त्यासाठी पहिले फिजिशियन आणि नंतर इनटी म्हणजे नाक, कान, घासा तज्ज्ञाला शिरीषला दाखवण्यात आलं. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की, त्याला साइनसाइटिस (Sinusitis) चा त्रास आहे. त्याचे औषध उपचार सुरु असतानाच मे महिन्याच्या सुरुवातीला त्याला किडनी स्टोनचा त्रास सुरु झाला. ज्यामध्ये 11 एमएमचा स्टोन असल्यान छोटी सर्जरी करावी लागली. सर्जरीनंतर शिरीष पहिलेसारखा ठणठणीत झाला. मग डॉक्टरांच्या परवानगीने श्रीजाच्या पहिल्या वाढदिवसाच्या तयारीला लागलो. 

पूजा पुढे म्हणाली की,लेकीच्या वाढदिवशी मी शिरीष सर्वात आंनदी पाहिलं होतं. त्यानंतर सर्जरीच्या वेळी असलेला स्टेंन होतं ते काढण्यासाटी मुंबईला गेलो तिथे तो काढला आणि घरी परतलो. श्रीजाचा वाढदिवसाचा व्हिडीओ एडिट करुन तो अपलोड करेपर्यंत शिरीषला कुठलाही त्रास झाला नाही. त्याच्यामध्ये कुठलेही लक्षणं दिसली नाहीत. त्याच्या मृत्यूच्या 15 दिवस आधी त्याला उलट्या आणि पिताचा त्रास सुरु झाला, चक्कर यायला लागली. पोटात अन्नपाणी टिकत नव्हतं. अचानक बिघडलेली तब्येत आमच्यासाठीही चकरवणारी होती. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात जाऊन त्यावर उपचार सुरु केलेत. याच दरम्यान त्याला पहिल्यांदाच फिट आली. क्षणाचाही विलंब न करता गोव्यातील नामांकित हॉस्पिटलमध्ये न्यूरो सर्जनकडे घेऊन गेलो. त्यावेळी शिरीषला काही तासांच्या फरकाने फिट येत होत्या.

पुढे पूजा म्हणाली की, आमच्या घरात मोठा दादा, मोठी वहिनी आणि शिरीषची बहीण प्राची सगळेच डॉक्टर असल्यामुळे कोणताही विलंब न करता आम्ही सीटी ब्रेन ही टेस्ट केली. त्यावेळी शिरीषच्या फिटचा त्रास वाढला आणि अनकॉन्शियस झाला. सीटीचा अहवाल आल्यावर त्यात कळलं की, त्याच्या मेंदूत गाठ आहे आणि पाणी भरलं आहे असं दिसून आलं. ब्रेन ट्यूमर हा शब्द ऐकताच आमच्या पायाखालची जमीनच सरकली आणि हे सगळं इतक्या अचानक होत होतं की, तरीही मी खंबीरपणे उभी होती. मुंबईतील न्यूरो सर्जनशी संपर्क करुन शिरीषचे रिपोर्ट आणि त्याच्या प्रकृतीबद्दल सांगितलं. पण गोवा ते मुंबई हा 8 तासांचा बायरोड प्रवास आणि त्यात अशक्य असा मुसळधार पाऊसामुळे बायरोडने शक्यच नव्हतं. दुसरा पर्याय होता तो एअर एंबुलेंसचा पण त्यात बेशुद्ध माणसाला शिफ्ट करता येत नाही. हे समजल्यावर आम्ही हतबल झालो. 

त्यानंतर आम्ही गोवातील गोवा मेडीकल कॉलेजमध्ये आम्ही शिरीषला घेऊन गेलो. या हॉस्पिटलमध्ये बेस्ट न्यूरो सर्जन आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली होती. अवघ्या दोन ते तीन तासात शिरीष कोमात गेला होता. शिरीषची क्रिटिकल परिस्थिती पाहून तिथल्या डॉक्टरांनी दोन ते तीन तासात त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. या ऑपरेशनदरम्यान शिरीषच्या डोक्यात साठलेले पाणी काढलं. त्यानंतर शिरीष प्रकृती थोडी स्टेबल झाली पण तो शुद्धीवर आला नव्हता. त्याच दिवशी 6 तासांच्या सर्जरीनंतर त्याच्या मेंदूमधील रक्ताच्या गाठीपण काढण्यात आल्या होत्या. दोन दिवसांनंतर शिरीष शुद्धीवर आला होता. त्यानंतर आमचा जीवात जीव आला. तो आम्हाला ओळखायला लागला. त्याला सगळं कळतं होतं. हे पाहून डॉक्टरांसह आम्हाला सकारात्मक वाटू लागलं. तीन चार दिवसांनी शिरीषची प्रकृती स्थिर झाल्यानंतर ट्यूमरचं ऑपरेशन करायचं ठरलं. अतिशय हायरिक्स ही सर्जरी होती, त्यामुळे यावेळी आम्ही मुंबईतील नामांकित न्यूरो सर्जनकडे सेकंड ओपिनियनसाठी संपर्क केला. त्यांनीदेखील आम्हाला या सर्जरीसाठी गो ऑन हा ग्रीन सिग्नल दिला. 

7 - 8 तासांच्या ऑपरेशमध्ये शिरीषच्या मेंदूतील ट्यूमर काही अंशी काढण्यात यश आले. परंतु हा ट्युमर अत्यंत संवेदनशील आणि नाजूक अशा मेंदूच्या अत्यंत आतल्या भागात होता. यावर न्यूरो सर्जनने सांगितलं की, या जागेवरचा ट्यूमर पूर्णपणे काढणे अशक्य आहे. हा ट्यूमर काढताना जराजरी धक्का लागला असता तर शिरीषच्या जीवाला धोका होता.  शिरीषला गंभीर असा सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड एसओएल हायड्रोसेफलस हा आजार झाला होता.एसओएल म्हणजे मेंदूमध्ये जागा व्यापणारी गाठी ज्यामुळे मेंदूत पाणी होतं. या सर्जरीमध्ये डॉक्टर 20 ते 30 टक्के ट्युमर काढण्यात यशस्वी झाले. कारण तो काढताना धक्कामुळे शिरीषच्या हालचालीवर, चालण्याबोलण्यावर त्याचा मेमरीवर परिणाम झाला असता. सर्जरी यशस्वी झाली पण ट्यूमर पूर्ण न काढता आल्यामुळे तो पुन्हा कधीही वाढू शकतो, ही भीती होतीच. तीन ते तीन दिवसांनी शिरीषची प्रकृती चांगली व्हायला लागली. औषध उपचारांसोबत व्यायामाला शिरीष प्रतिसाद देत होता.

हळूहळू त्याची प्रकृती सुधारत होती. पण अचानक चार पाच दिवसांनी शिरीषला ताप आला. त्यानंतर त्यांच्या सगळ्या टेस्ट करण्यात आल्यात. त्यावेळी त्याच्या यूरिन आणि मेंदूच्या पाण्यात संसर्ग असल्याच समोर आलं. साधारण अशा मोठ्या सर्जरीमध्ये या प्रकारचा संसर्ग होतो,असं डॉक्टारांनी सांगितलं होतं. शिरीषच्या मेंदूतील गाठ अत्यंत नाजूक जागी असल्याने संसर्ग रोखणे अतिशय कठीण होतं. यानंतर त्याला आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आलं. हळूहळू तो पुन्हा बेशुद्ध होऊ लागला होता आणि पाच दिवसांनी तिथे शिरीष आम्हाला कायमचा सोडून गेला. 

'शिरीषच्या मृत्यूचा बाजार मांडला'

पूजाने या व्हिडीओमध्ये नाराजीही व्यक्त केली. ती म्हणाली की, 'शिरीषच्या मृत्यूचा काही लोकांनी बाजार मांडला. फक्त व्ह्यूज मिळावे यासाठी त्यांनी शिरीषच्या मृत्यूचे भांडवल केलं. शिरीषच्या मृत्यूची बातमी इतक्या चुकीच्या मथळ्याने आणि भडक पणे लोकांपर्यंत पोहोचवली. या संधीसाधू लोकांनी कधीही आमच्याशी किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यांशी संपर्क न साधता मनाला वाटेल ते विधान फक्त व्ह्यूजसाठी केली.ज्यात आमच्या सुखी संसाराला कशी नजर लागली, डॉक्टरांच्या चुकीमुळे मृत्यू झाला, कुटुंबाचे शिरीषकडे दुर्लक्ष झाले किंवा शिरीषने स्वत:च्या तब्येतीकडे कसे दुर्लक्ष केले, एवढंच नाही तर सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे ब्रेन ट्युमर झाला. चॅनेल आता बंद होईल, पूजाताई काय निर्णय घेतली, निर्सगाच्या सान्निध्यात राहून हेल्दी जेवण घेऊनही एवढा गंभीर आजार कसा झाला, असे चुकीचे आणि गंभीर आरोप आमच्यावर केले गेले. या व्हिडीओमुळे आमच्या दु:खात अजून भर पडली. सत्य तुम्हाला कळावं म्हणून हा व्हिडीओ मी करतेय.'

 

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More