'त्या' रात्री नेमकं काय घडलं? अखेरीस सैफनं चाकू हल्ल्याबद्दल सोडलं मौन, ट्रोलर्सनाह दिलं चोख उत्तर!

Saif Ali Khan On Stabbing Incident: सैफ अली खानने 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल' या शोमध्ये त्याच्यावर झालेल्या चाकू हल्ल्याबद्दल खुलासा केला आहे.  ही घटना खोटी असल्याचा दावा करणाऱ्यांनाही त्याने चोख प्रत्युत्तर दिले.    

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 11, 2025, 09:34 AM IST
'त्या' रात्री नेमकं काय घडलं? अखेरीस सैफनं चाकू हल्ल्याबद्दल सोडलं मौन, ट्रोलर्सनाह दिलं चोख उत्तर!

Too much with Kajol and twinkle show: बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या शोमध्ये सैफने काही महिन्यांपूर्वी झालेल्या चाकू हल्ल्याबद्दल खुलासा केला आहे. त्याचबरोबर या घटनेला 'फेक' म्हणणाऱ्यांनाही त्याने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. या वर्षाच्या सुरुवातीला मुंबईच्या बांद्रा येथील पाली हिल परिसरात सैफच्या घरात एका अनोळखी व्यक्तीने घुसखोरी करून चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात सैफच्या पाठीच्या कण्याजवळ गंभीर जखमा झाल्या होत्या आणि त्याला जवळपास एक आठवडा रुग्णालयात राहावं लागलं होतं. मात्र, जेव्हा तो रुग्णालयातून बाहेर आला, तेव्हा त्याचा शांत आणि आत्मविश्वासपूर्ण स्वभाव पाहून सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले. 

Add Zee News as a Preferred Source

पांढरा शर्ट आणि जीन्स परिधान केलेला सैफ अली खान पूर्णपणे स्थिर आणि आत्मविश्वासपूर्ण दिसत होता.  अनेकांनी सैफच्या संयमाचं कौतुक केलं, पण काही सोशल मीडिया युजर्सनी या घटनेला बनावट ठरवलं. आता सैफने या संपूर्ण प्रकरणावर अखेर मौन तोडलं आहे.

शोदरम्यान केला खुलासा

शोदरम्यान होस्ट काजोलने सैफला विचारलं की इतक्या गंभीर जखमा असूनही तो एवढ्या शांततेने कसा हाताळू शकला? त्यावर सैफ म्हणाला, “घटना संपल्यानंतर अनेक लोक आले. कुणी म्हणालं तुम्हाला अॅम्ब्युलन्समध्ये न्यायला हवं, कुणी म्हणालं व्हीलचेअर वापरा. पण माझ्या अंतर्मनाने सांगितलं की मी ठीक आहे आणि माझ्या कुटुंबीयांमध्ये किंवा चाहत्यांमध्ये भीती निर्माण करू नये. म्हणून मी ठरवलं की स्वतः चालत बाहेर जावं आणि लोकांना फक्त हे दाखवावं की मी सुरक्षित आहे.”

तो पुढे म्हणाला, “घटनेनंतर मीडियात खूप गोंधळ होता. मला वाटलं की गोष्टी शांत ठेवायला हव्यात. माझ्या पाठीवर टाके पडले होते, चालताना थोडं दुखत होतं, पण मी चालू शकत होतो. मला व्हीलचेअरची गरज नव्हती.”

 

ट्रोलिंगवर सैफचा प्रत्युत्तर

या घटनेनंतर काहींनी सोशल मीडियावर सैफवर टीका करत म्हटलं की हा सगळा बनावटी प्रकार आहे. या ट्रोलिंगवर उत्तर देताना सैफ म्हणाला, “मी जाणूनबुजून गोष्टी ड्रामॅटिक बनवल्या नाहीत. पण जेव्हा मी शांतपणे बाहेर आलो, तेव्हा लोक म्हणाले की हे खोटं आहे. आजच्या जगात लोक सत्यापेक्षा अफवांवर जास्त विश्वास ठेवतात.”

 

ट्विंकल खन्नाने संवादादरम्यान सांगितलं की तिने सैफची आई शर्मिला टागोर यांच्याशीही या घटनेबद्दल चर्चा केली होती. त्यांनी सैफला व्हीलचेअर वापरण्याचा सल्ला दिला होता. ट्विंकलने सांगितलं, “शर्मिला मॅडम म्हणाल्या, ‘मी त्याला व्हीलचेअरवर जाण्यास सांगितलं, पण तो माझं ऐकत नाही.’” या चर्चेदरम्यान सैफने स्पष्ट केलं की तो कोणत्याही परिस्थितीत लोकांमध्ये भीती किंवा नकारात्मकता निर्माण करू इच्छित नाही. त्याचं म्हणणं आहे की, “लोकांना आश्वस्त करणं आणि शांत ठेवणं हीच खरी जबाबदारी आहे.”

अशा प्रकारे, सैफ अली खानने केवळ स्वतःवर झालेल्या हल्ल्याबद्दलच नव्हे तर संकटाच्या काळात कसा संयम राखावा, याचाही  संदेश दिला आहे.

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More