)
मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि शिवसेना नेते समाधान सरवणकर यांच्या साखरपुड्याचा सोहळा. ‘तुझेच मी गीत गात आहे’ फेम तेजस्विनीने काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना हा सुखद धक्का दिला. या खास प्रसंगी दोघांच्या आयुष्यातील नवीन पर्वाची सुरुवात झाली असून, त्यांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
तेजस्विनीचा साखरपुडा शिवसेना चे नेते आणि माजी आमदार सदा सरवणकर यांचा थोरला मुलगा समाधान सरवणकर याच्यासोबत पार पडला. या सोहळ्यात नातेवाईकांसोबतच कलाविश्वातील आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. अभिनेत्री तेजस्विनी आणि समाधान या दोघांनीही पारंपरिक पोशाखात साखरपुड्याच्या विधींचा आनंद घेतला. त्यांच्या हातात अंगठ्या घालतानाचे फोटो आणि ‘साखरपुडा हातात घेऊन’ दिलेल्या पोझेस सध्या सोशल मीडियावर गाजत आहेत.
समाधान सरवणकर यांनी आपल्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत तेजस्विनीबद्दलचा प्रेमळ संदेश लिहिला आहे. त्यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे 'एक नवीन सुरुवात, एक नवं आयुष्य देणारा हा क्षण, भावनांच्या ओघात गुंफलेला हा सुंदर प्रवास. जेव्हा 'मी' आणि 'तू' म्हणत चाललो होतो, आज 'आपण' झालो आणि कायमचे एक झालो. हा क्षण म्हणजे आयुष्यभर जपल्या जाणाऱ्या प्रेमाची सुरूवात!'
तेजस्विनीनेही ही पोस्ट आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत समाधानला उत्तरादाखल हार्ट आणि लव्ह इमोजीसह भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर दोघांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर शुभेच्छा देणाऱ्या मित्रमंडळींच्या पोस्टही रीपोस्ट केल्या आहेत. या साखरपुडा सोहळ्याला अनेक नामांकित कलाकार उपस्थित होते. सिद्धार्थ जाधव, पूजा सावंत, अभिजीत खांडकेकर, सुखदा खांडकेकर, हार्दिक जोशी, अक्षया देवधर आणि पल्लवी भावे वैद्य यांनी मैत्रिणी तेजस्विनीला शुभेच्छा देण्यासाठी खास हजेरी लावली होती. संपूर्ण वातावरण आनंद, प्रेम आणि उत्साहाने भारलेले होते.
समाधान सरवणकर हे मुंबई महानगरपालिकेतील वॉर्ड क्रमांक 194 येथून शिवसेनेतर्फे नगरसेवक राहिले आहेत. सध्या ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत कार्यरत असून ‘समाधान सरवणकर फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेद्वारे विविध सामाजिक उपक्रम राबवतात. ते प्रभादेवीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तसेच शिवाजी पार्क जिमखान्याचे उपाध्यक्ष आहेत. समाधान हे माजी आमदार सदा सरवणकर यांचे सुपुत्र असून, सरवणकर कुटुंब हे मुंबईतील प्रभावशाली आणि सक्रिय राजकीय कुटुंबांपैकी एक मानले जाते.
FAQ
तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर यांचा साखरपुडा कधी झाला?
तेजस्विनी आणि समाधान सरवणकर यांचा साखरपुडा नुकताच पार पडला असून, या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
समाधान सरवणकर कोण आहेत?
समाधान सरवणकर हे शिवसेना (शिंदे गट) नेते आणि माजी आमदार सदा सरवणकर यांचे सुपुत्र आहेत. ते माजी नगरसेवक असून, सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.
साखरपुड्याच्या सोहळ्याला कोणते कलाकार उपस्थित होते?
या साखरपुडा सोहळ्याला सिद्धार्थ जाधव, पूजा सावंत, अभिजीत आणि सुखदा खांडकेकर, हार्दिक जोशी, अक्षया देवधर आणि पल्लवी भावे वैद्य यांसारखे अनेक कलाकार उपस्थित होते.