Fact Check : तब्बल 144 वर्षांनी प्रयागराज येथे महाकुंभाचे आयोजन झाले आहे. तेव्हा त्रिवेणी संगमावर डुबकी लगावण्यासाठी आणि या महाकुंभात सहभागी होण्यासाठी देशविदेशातील करोडो भाविक प्रयागराज येथे भेट देत आहेत. देशातील अनेक नामांकित व्यक्तींनी संगमावर पवित्र स्नान केले. अशातच सध्या बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात शाहरुख खान आपल्या कुटुंबासहित महाकुंभात स्नान करायला गेल्याचा दावा करण्यात आलाय. परंतु या व्हिडीओच सत्य काय याविषयी जाणून घेऊयात.
इंस्टाग्रामवर ayodhyaa_2024 नावाच्या यूजरने शाहरुख खानचा एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओवर त्याने लिहिले की 'शाहरुख खान महाकुंभात गंगा स्नान करण्यासाठी पोहोचला'. शाहरुख खानच्या या व्हिडीओची सत्यात पडताळल्याशिवाय नेटकरी हा व्हिडीओ शेअर करत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला 5 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आले असून इंस्टाग्रामवरील ayodhyaa_2024 या अकाउंटला 3 लाखांहून अधिक लोकं फॉलो करतात.
शाहरुख खान महाकुंभमध्ये गेला होता का यासंबंधित किवर्ड्स टाकून आम्ही काही माहिती समोर येते का पाहिले. परंतु या संदर्भात कोणत्याही अधिकृत प्रसारमाध्यमाने दिलेली माहिती सापडली नाही. शाहरुख खान महाकुंभमध्ये गेल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. हा व्हिडीओ गुगल लेन्सच्या माध्यमातून सर्च केला असता हा व्हायरल व्हिडीओ क्लिप ही 5 सप्टेंबर 2023 मध्ये NDTV या युट्युब चॅनलवर अपलोड केलेल्या व्हिडीओचा एक भाग असल्याचे समोर आले. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याने 2023 मध्ये त्याचा आगामी चित्रपट 'जवान' च्या प्रकाशनापूर्वी तिरुपती येथील श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिराला भेट दिली होती. यावेळी अभिनेता पारंपरिक पांढऱ्या वेशभूषेत दिसला. त्याच्यासोबत यावेळी अभिनेत्री नयनतारा आणि तिचा नवरा विग्नेश शिवान यांसह शाहरुखची मुलगी आणि मॅनेजर सुद्धा दिसली.
शाहरुख खान तिरुपती मंदिरात जात असल्याचा हा व्हिडीओ इंडियन एक्सप्रेसने देखील 5 सप्टेंबर 2023 रोजी अपलोड केला होता. या व्हिडीओला टायटल देण्यात आलं होतं की शाहरुख खान आणि नयनतारा जवान चित्रपटाच्या रिलीजपूर्वी तिरुपती मंदिरात प्रार्थना केली. यापूर्वी सुद्धा हा व्हिडीओ व्हायरल करून शाहरुख खानने राम मंदिराला भेट दिल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु तो दावा खोटाही होता.
झी 24 तासने केलेल्या फॅक्ट चेकमध्ये सध्या शाहरुख खानच्या महाकुंभला गेल्याचा दावा करण्यात आलेला व्हिडीओ हा खोटा असल्याचे समोर आले आहे. हा व्हिडीओ महाकुंभातील नसून तर 2023 रोजी शाहरुख खानने केलेल्या आंध्र प्रदेशातील तिरुमाला वेंकटेश्वर मंदिराला भेट दिल्या वेळेचा आहे. यावेळी जवान चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी शाहरुख आपल्या सहकलाकारांसह मंदिरात गेला होता.