अभिनेता सिद्धार्थ जाधवने मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्याच्या अभिनय क्षेत्राबाबत कायमच चर्चा होत असते. यासोबत त्याच्या वैवाहिक आयुष्याबाबतही लोकांना अनेक प्रश्न आहेत. असं असताना या दोघांमध्ये काही आलबेल नसल्याच्या चर्चा होत्या. या सगळ्यावर सिद्धार्थची पत्नी तृप्ती अक्कलवार हिने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. तृप्तीने सोशल मीडियावरुन सिद्धार्थचे नाव आणि त्याच्यासोबतचे फोटो का डिलीट केले याचा खुलासा देखील तिने केला आहे.
व्यावसायिक तृप्ती अक्कलावर हिने नुकतीच कांचन धर्माधिकारी यांना मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने आपल्या वैवाहिक जीवनातील अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. यामध्ये तिने सिद्धार्थसोबतचा प्रवास आणि त्याच्यापासून वेगळं होऊन स्वतःची निर्माण केलेली ओळख इथपर्यंतचा आपला प्रवास मांडला आहे.
2013 मध्ये मी नोकरीमधून ब्रेक घेतला. प्रत्येक मुलीला घर, चूलमूल या गोष्टी चुकलेल्या नाहीत. त्यानंतर मी सिद्धार्थची मॅनेजर म्हणून काम सांभाळू लागले यामध्ये त्याचे कामं, कामाच्या तारख्या या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणे अशा कामांचा सहभाग होता. हळुहळू पैसे साठवून आम्ही वन बीएचके घर घेतलं. त्यानंतर 2 बीएचके घर घेतलं. एकंदर आम्ही आयुष्यात एकत्र पुढे आलो.
नवरा बायकोमध्ये छोटी मोठी भांडण होतंच असतात. 2020 मध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आमच्यातही असंच छोटंस भांडण झालं. या वादात सिद्धू मला बोलता-बोलता सहज बोलून गेला की, ‘तुला कोण ओळखतं? तुला सगळे माझ्यामुळे ओळखतात. तुझी काय ओळख आहे? सगळे तुला सिद्धार्थ जाधवची बायको म्हणून ओळखतात… माझ्या मनाला ती गोष्ट खूप लागली.’ त्याच्या ते आज हे लक्षातही नसेल. त्यानंतर मी बसले, खूप विचार केला. घर सांभाळणं हे माझं कामच आहे पण, जेव्हा एखाद्या बाईच्या ओळखीचा प्रश्न येतो, तेव्हा स्वत:चं काहीतरी करावं लागतं. मग, मी जॉब करण्याचा प्रयत्न केला पण, सिद्धू व्यग्र होता त्यामुळे आपण मुलींना वेळ देऊ शकू की नाही हा प्रश्न होता. जर्नलिझममध्ये पुन्हा 12 तास काम करणं मला जमेल की नाही अशा अनेक गोष्टींचा विचार मी करत होते.”
तृप्ती या मुलाखतीत सांगते की, “वयाच्या अगदी 19-20 व्या वर्षीपासूनच मला बिझनेसवुमन व्हायची इच्छा होती. मग या बोलण्यानंतर त्या इच्छेने डोकं वर केलं. पण, आता शून्यातून सुरुवात कशी करायची हा प्रश्न माझ्यासमोर उभा होता. बिझनेससाठी जवळपास 50 लाखांची गुंतवणूक करायची होती. कोणी विश्वास नाही ठेवणार पण, मी सिद्धूला यातलं काहीच सांगितलं नाही. कारण, मला त्याच्याकडून पैसे घ्यायचे नव्हते. मैत्रिणीच्या साथीने मी स्टार्टअप सुरू केला. तेव्हा मी एक गोष्ट ठरवली होती की, आयुष्यात नाव लावायचं ते फक्त ‘तृप्ती अक्कलवार’ असं नाव लावायचं. कारण, लग्नानंतर आपली ओळख आपण विसरून जातो. त्यामुळे सगळ्या बिझनेसमध्ये मी माझं ‘तृप्ती अक्कलवार’ असं नाव लावलं. मी सिद्धार्थची बायको आहे हे मी खोडू शकत नाही. मी इतकंही बोलेन की, सिद्धू सहज बोलून गेला पण, ती स्वत:ची ओळख निर्माण करण्याची मला प्रचंड गरज होती.”