मुंबई : सध्या सगळीकडे 'गदर 2'चा बोलबाला आहे. या सिनेमाचा बॉक्सऑफिसवर चांगलाच दबदबा आहे. मात्र नुकताच अभिनेता सनी देओल अडचणीत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या.  अलीकडेच एका अहवालात असा दावा करण्यात आला होता की, अभिनेता सनी देओल कर्जात बुडाला आहे. आणि हे कर्ज फेडण्यासाठी सनी देओलच्या जुहू येथील घराचा लिलाव होऊ शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र आता बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या बंगल्याचा आता लिलाव होणार नाही. कारण आता बँक ऑफ बडोदाने सनी देओलच्या जुहू व्हिलाच्या लिलावाची नोटीस मागे घेतली आहे.  बँकेने नोटीस मागे घेण्यामागे तांत्रिक कारणे सांगितली आहेत. याआधी बँकेच्या सूचनेनुसार, 26 डिसेंबर 2022 पासून सनी देओलवर एकूण 55 कोटी 99 लाख 80 हजार 766 रुपये आणि व्याज देय आहे. बंगल्याची आरक्षित किंमत 51.43 लाख रुपये इतकी आहे.


बँक ऑफ बडोदाने नुकतीच जारी केलेल्या नोटीसमध्ये असं म्हटलं आहे की, सनी देओल नावाने ओळखल्या जाणाऱ्या अजय सिंग देओलच्या मालमत्तेच्या विक्रीशी संबंधित 19 ऑगस्ट 2023 ची ई-लिलाव सूचना तांत्रिक कारणांमुळे मागे घेण्यात आली आहे. बँक ऑफ बडोदाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, परतफेडीची समस्या सोडवली जाईल, परंतु यासाठी कोणताही कालावधी किंवा टाइमलाइन दिलेली नाही.


बँक ऑफ बडोदाच्या नोटीसनुसार, सनी देओलच्या कर्जाला धर्मेंद्र आणि बॉबी देओल जामीनदार आहेत. याशिवाय सनी देओलची कंपनी सनी साउंड्स प्रायव्हेट लिमिटेड कॉर्पोरेटही हमीदार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सनी देओलने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्याच्यावर 53 कोटी रुपयांचे दायित्व आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे 87 कोटी रुपयांहून अधिक संपत्ती आहे. सनी देओलने वडील धर्मेंद्र यांनाही साडेतीन कोटी रुपयांहून अधिक कर्ज दिले आहे.
 
सनी देओलचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट 'गदर 2' ने 11 दिवसांनंतर 376 कोटी रुपये कमवले. या चित्रपटाने दुसऱ्या रविवारी 39 ते 40 कोटींचा गल्ला जमवला आहे. दुसऱ्या रविवारच्या कमाईतही या चित्रपटाने बाहुबली 2 ला मागे टाकले आहे. 'गदर 2' 400 कोटींच्या कलेक्शनकडे वेगाने वाटचाल करत आहे.