सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच, CBI चा क्लोजर रिपोर्ट, रिया चक्रवर्तीलाही क्लीन चिट

सुशांत सिंह राजपूतची हत्या नसून त्यानं आत्महत्या केल्याचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयनं कोर्टात सादर केला आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Mar 23, 2025, 08:45 PM IST
सुशांत सिंह राजपूतची आत्महत्याच, CBI चा क्लोजर रिपोर्ट, रिया चक्रवर्तीलाही क्लीन चिट

Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्या झाल्याचा कोणताही पुरावा सीबीआयला सापडलेला नाही. त्यामुळे सुशांत सिंह राजपूतची हत्या नसून त्यानं आत्महत्या केल्याचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयनं कोर्टात सादर केला आहे. तसंच या प्रकरणात सीबीआयनं रिया चक्रवर्तीला देखील क्लीन चिट दिली आहे. 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. सुशांत सिंह राजपूतची हत्या नव्हे त्यानं आत्महत्याच केल्याचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयनं मुंबई उच्च न्यायालयात सादर केला आहे.

सुशांतची आत्महत्याच, CBIचा क्लोजर रिपोर्ट

14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह त्याच्या निवासस्थानी आढळून आला होता. मुंबई पोलिसांनी ही आत्महत्याच असल्याचं सांगितलं होतं. मात्र, याप्रकरणी काही संशय असल्यानं सुशांतच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आलेला होता. आता अखेर साडेचार वर्षानंतर सीबीआयने या प्रकरणाचा अंतिम अहवाल सादर केला आहे. यामध्ये सुशांतने आत्महत्याच केली असल्याचं म्हटलं आहे. 

रिया चक्रवर्तीला क्लीन चिट

सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर संशय होता. त्यामुळे तिला अटक देखील करण्यात आली होती. मात्र, सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये रिया चक्रवर्तीलाही क्लीन चिट देण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं राजकारण करण्यात आल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच यावेळी त्यांनी भाजपवर देखील टीकास्त्र डागलं आहे. भाजपनं मृत्यूंचं राजकारण केल्याची सडकून टीका संजय राऊतांनी केली आहे. तर उद्धव ठाकरेंनी लगेचच प्रकरण सीबीआयकडे दिलं असतं तर सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळाला असता असं वक्तव्य राम कदमांनी केलं आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं राजकारण

बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं राजकारण करण्यात आलं होतं असा आरोप अनिल देशमुखांनी केला आहे. दरम्यान सुशांतच्या मृत्यू प्रकरणात सीबीआयनं दिलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकाराव असं मत संजय निरुपम यांनी व्यक्त केलं आहे. 

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर तेव्हाचे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु होते. दरम्यान काहींनी सुशांत सिंगची हत्या केल्याचा दावा केला होता. दरम्यान सीबीआयनं या प्रकरणाची चौकशी केली असून जवळपास 5 वर्षानंतर क्लोजर रिपोर्ट सादर करत ही हत्या नसून आत्महत्याच असल्याचं स्पष्ट केलं आहे.