T20 World Cup : मौकाsss मौकाssss; जाहिरातीत झळकणारा 'हा' अभिनेता कोण आहे माहितीये?

एका जाहिरातीनं त्याचं संपूर्ण आयुष्यच पालटून टाकलं.   

Updated: Oct 20, 2021, 12:17 PM IST
T20 World Cup : मौकाsss मौकाssss; जाहिरातीत झळकणारा 'हा' अभिनेता कोण आहे माहितीये?
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट सामना येत्या रविवारी खेळला जाणार आहे. टी20 विश्वचषकातील या सामन्यासाठी क्रीडारसिक कमालीचे उत्सुक आहेत. क्रिकेट विश्वचषकाची सुरुवात इथं होत नाही, तोच तिथे दमदार जाहिरातबाजीही सुरु झाली. या जाहिरातबाजीत लक्ष वेधलं ते म्हणजे 'मौका' जाहिरातींनी. 

इंजिनियरिंगची नोकरी सोडून कलाजगताकडे मोर्चा वळवणारा हा अभिनेता आहे विशाल मल्होत्रा. मौका- मौका या एका जाहिरातीनं त्याचं संपूर्ण आयुष्यच पालटून टाकलं. 

निर्मात्यांना हवा होता काहीसा पाकिस्तानी दिसणारा चेहरा 
माध्यमांशी संवाद साधताना विशालनं सांगितल्यानुसार तो एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत होता. 2012 मध्ये तो मुंबईत आला. 'रागिनी एमएमएस 2' मध्ये त्यानं एक लहानशी भूमिका साकारली होती. यादरम्यान त्याचा संघर्षाचा काळ सुरु होता. यातच त्याला या जाहिरातीची ऑफर आली. त्यांना कोणीतरी पाकिस्तानी चेहऱ्याचा दिसणारा अभिनेता हवा होता, याच निकषांच्या आधारे माझी निवड झाली, असं तो म्हणाला. 

अवघ्या दोन दिवसांचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर ही जाहिरात प्रसिद्ध झाली आणि पाहता पाहता तिला अमाप लोकप्रियता मिळाली. इतकी ज्याची कुणी अपेक्षाही केली नसावी. त्यावेळी मीम्सचा ट्रेंडही नसताना असंख्य मीम्स साकारण्य़ात आले. सर्वत्र माझा चेहरा दिसू लागला होता, असं विशाल म्हणाला. 

जाहिरातीला लोकप्रियता मिळत असल्याचं पाहत स्टार स्पोर्ट्सकडून त्याच्यासोबत एक करार करण्यात आला. या जाहिरातीमुळं विशाल पाकिस्तानमध्येही प्रसिद्ध झाला, इतकंच नव्हे तर एक दिवस आपणही फटाके फोडू असे मेसेजही त्याला येऊ लागले. 

एका जाहिरातीनं विशालचं पूरतं आयुष्य बदलून टाकलं. मुंबईत घर घेण्याचं त्याचं स्वप्न साकार झालं. कलाकारांच्या आयुष्यात अनेक चढ- उतार असतात. पण, या जाहिरातीनं आपल्याला मोठा आधार दिला, असं तो मोठ्या अभिमानानं सांगतो.