प्रवीण तरडे यांची विनंती : ‘बाबा, रायगडावर पुन्हा येऊ नका…’ हा व्हिडिओ कोणासाठी?

Pravin Tarde Video: रायगडाच्या कचरा समस्येबाबत जागृतीसाठी प्रवीण तरडेंनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

कावेरी पिंपळे | Updated: Nov 17, 2025, 07:09 PM IST
प्रवीण तरडे यांची विनंती : ‘बाबा, रायगडावर पुन्हा येऊ नका…’ हा व्हिडिओ कोणासाठी?

दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी रायगड किल्ल्यावर वाढत चाललेल्या कचऱ्याच्या समस्येबाबत तीव्र नाराजी व्यक्त करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत दमदार भूमिका आणि दिग्दर्शनासाठी ओळखले जाणारे तरडे सामाजिक प्रश्नांवरही स्पष्टपणे भूमिका घेतात. रायगडाच्या स्वच्छतेबाबतचा त्यांचा नवीन व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.

Add Zee News as a Preferred Source

या व्हिडिओमध्ये त्यांनी रायगडावर वाढत जाणारा प्लास्टिक, बाटल्या, चिप्सचे पाकीट यांसारख्या कचऱ्याचा ढिग प्रत्यक्ष दाखवत पर्यटकांच्या निष्काळजी वागणुकीवर जोरदार टीका केली. 'हा फक्त कचरा नाही… ही आपल्या इतिहासाची, आपल्या भावनेची खिल्ली उडवणारी गोष्ट आहे.' असे ते म्हणाले. रायगडासारख्या पवित्र स्थळी, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, तिथे स्वच्छता नसणे हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.

तरडे पुढे म्हणतात, 'किल्ल्यावर येताना आपण महाराजांच्या भूमीत पाऊल ठेवतो… पण त्याच भूमीत कचरा फेकून आपण त्यांच्याच वारशाचा अपमान करतो.' त्यांनी प्रशासनालाही सुचना देत काही ठिकाणी अधिक स्वच्छता कर्मचाऱ्यांची गरज असल्याचे नमूद केले. मात्र, त्यांनी हेही स्पष्ट केलं की “कचरा उचलण्याची जबाबदारी फक्त प्रशासनाची नाही, ती प्रत्येक नागरिकाची आहे.'

व्हिडिओमध्ये त्यांनी काही पर्यटकांना विनंती करताना दिसतात 'कृपया रायगडावर येऊ… पण आपल्या घरासारखी स्वच्छता सांभाळा.'

त्यांचा हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी प्रवीण तरडेंचे समर्थन करत 'स्वच्छ रायगड, सुंदर रायगड' अशी मोहीम चालवण्याचा संकल्पही व्यक्त केला आहे. काही इतिहासप्रेमी आणि स्थानिक स्वयंसेवी संघटनांनी तरडेंच्या आवाहनानुसार येत्या काही दिवसांत रायगड स्वच्छता उपक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. इतिहास, संस्कृती आणि स्वाभिमानाचं प्रतीक असलेला रायगड किल्ला स्वच्छ व संरक्षित रहावा ही सर्वांचीच जबाबदारी असल्याचा एकजुटीचा संदेश या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा समोर आला आहे.

FAQ

प्रवीण तरडेंनी रायगडावरील कचऱ्याबाबत व्हिडिओ का शेअर केला?
प्रवीण तरडे यांनी रायगड दर्शनादरम्यान किल्ल्याच्या भिंतीत अडकवलेला प्लॅस्टिक आणि इतर कचरा पाहून नाराजी व्यक्त केली. किल्ल्याचा अपमान होत असल्याचं जाणवल्याने त्यांनी जनजागृतीसाठी हा व्हिडिओ शेअर केला.

व्हिडिओमध्ये प्रवीण तरडे कोणत्या मुद्द्यावर अधिक भर देतात?
ते सांगतात की रायगड हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पवित्र स्थळ आहे आणि पर्यटकांनी तिथे कचरा न टाकता स्वच्छता राखणे अत्यावश्यक आहे. हा केवळ किल्ला नाही तर इतिहास आणि संस्कृतीचा वारसा आहे.

या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया उमटल्या?
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर लोकांनी प्रवीण तरडेंच्या भूमिकेचं समर्थन केलं. अनेकांनी स्वच्छता मोहिमा सुरू करण्याची घोषणा केली तसेच किल्ले प्लास्टिकमुक्त करण्याबाबत आवाहन केले.

About the Author

kaveri pimpley

कावेरी पिंपळे सध्या ‘झी २४ तास डिजिटल’मध्ये कंटेंट एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पत्रकारितेचा चार वर्षांचा अनुभव आहे. ...Read More