Jheel Mehta Register Marriage : 'तारक मेहता का उलटा चष्मा' या प्रसिद्ध टीव्ही सिरीयलमध्ये सोनू नावाची भूमिका साकारलेली अभिनेत्री झील मेहता हिने मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात अतिशय थाटामाटात लग्न केलं होतं. आता 17 फेब्रुवारी 2025 रोजी पुन्हा एकदा झील मेहताने पती आदित्य दुबे सोबत कोर्ट मॅरेज केलं आहे. अतिशय मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत झील मेहता हिने पती सोबत रजिस्टर मॅरेजच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. या लग्नाचे फोटो झीलने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
रजिस्टर मॅरेज करताना दोघांनी रजिस्टारर ऑफिसमध्ये जाऊन कागदपत्रांवर स्वाक्षरी केली, एकमेकांना कुटुंबाच्या उपस्थितीत वरमाला घातली. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून झीलने लिहिले की, 'अखेर कायदेशीरपणे लग्नबंधनात अडकलो. 17•02•25'. पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये झील आणि आदित्य यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसतोय.
हेही वाचा : 'ज्या' चित्रपटामुळे विकण्यात आलं कंगना रणौतचं घर? ओटीटी प्रदर्शनातून मिळवू शकतील का पैसे!
झील मेहताने तिचा खूप वर्षांपासूनचा मित्र असलेल्या आदित्य दुबे याच्याशी विवाह केला. झील आणि आदित्य या दोघांचं लग्न हे शाही पद्धतीने झालं. लग्नातील मेहंदी, हळद, संगीत इत्यादी सर्व कार्यक्रम अतिशय दणक्यात पार पडले. झील मेहता हिने लग्नात लाल रंगाचा लेहेंगा घातला होता. 2008 ते 2012 पर्यंत झील मेहता हिने तारक मेहता का उलटा चष्मा या सिरीयलमध्ये सोनू भिडे नावाचं पात्र साकारलं होतं. शोच्या अगदी सुरुवातीपासून सोनू ही या कार्यक्रमाचा भाग होती. मात्र 2012 नंतर स्वतःच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तिने ही सिरीयल सोडण्याचा निर्णय घेतला होता. झील मेहता सध्या 29 वर्षांची असून ती आजही मनोरंजन सृष्टीत कार्यरत आहे.