नवी दिल्ली : टीनएजर्सनी बॉलिवूड चित्रपट 'कबीर सिंग' पाहण्यासाठी आपल्या आधार कार्डमध्ये छेडछाड केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी स्टारर 'कबीर सिंग' चित्रपटगृहांमध्ये सुपरहिट सुरु आहे. परंतु या चित्रपटाला ए सर्टिफिकेट म्हणजेच वयस्क प्रमाणपत्र मिळालं आहे. त्यामुळे 18 वर्षांखालील मुलांना 'कबीर सिंग' पाहण्यासाठी परवानगी नाही. परंतु हा चित्रपट पाहण्यासाठी तरुणाई उत्साही असून ते टेक्नॉलॉजीचा चुकीचा वापर करत असल्याचं पाहायला मिळत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयपुरमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. एका विद्यार्थ्याने 'आयएएनएस'ला दिलेल्या माहितीत, 'मी आणि माझ्या मित्रांनी आमच्या आधार कार्डचा फोटो घेतला. त्यानंतर जन्मतारिख बदलण्यासाठी त्या फोटोला एका अॅपवर एडिट केलं. कोणीही आम्हाला चित्रपटगृहाच्या गेटवर थांबवलं नाही आणि आम्ही चित्रपट पाहण्यात यशस्वी झालं असल्याचं' त्याने सांगितलं.



एका विद्यार्थ्याने 'आम्ही बुक माय शोवरुन अनेक तिकीटं बुक केली होती. त्यावर आम्हाला कोणीही आमच्या वयाबाबत किंवा ओळखपत्राबाबत विचारलं नाही. चित्रपटगृहाच्या गेटवर पोहचल्यावर आम्ही स्मार्टफोनवरुन आधारकार्डवरील जन्मतारिख बदलली' असंही त्याने सांगितलं.


तिकीट बुकिंग वेबसाइट 'बुक माय शो'च्या अधिकाऱ्यांनी 'तिकीट बुक करताना आमच्या साइटवर एक पॉप-अप येतो. जो 18 वर्षांखालील मुलांना ए-रेटेड फिल्म पाहण्यास परवानगी नसल्याचं सांगतो. परंतु अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात आणि तिकीट बुक करतात. हे ऑनलाइन ट्रान्झक्शन आहे त्यामुळे आम्ही ओळखपत्र मागत नाही. परंतु या तिकीटांची चित्रपटगृहांच्या गेटवर तपासणी केली जाते' असं त्यांनी सांगितलं.



आयनॉक्स मुंबईतील एका अधिकाऱ्याने या गोष्टीचा स्वीकार केला आहे की, अनेक तरुण मुलं 'कबीर सिंग' पाहण्यासाठी येत आहेत. परंतु आमचे कर्मचारी ही परिस्थिती योग्यप्रकारे हाताळत असून अशा 18 वर्षांखालील मुलांना परत पाठवत असल्याचं म्हटलं आहे. 


गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या शाहीदच्या या सिनेमाने केवळ तीन दिवसांत ५० करोड आणि पाच दिवसांत १०० करोडचा आकडा पार केलाय.