गौरव मोरे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडून हिंदी कॉमेडी शोमध्ये जाण्यामागचं खरं कारण समोर

Reason behind Gaurav More leaving 'Maharashtrachi Hasyajatra' to join a Hindi comedy show : गौरव मोरेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून काही काळासाठी बाहेर पडले होते, तेव्हा तो हिंदी कॉमेडी शोमध्ये व्यस्त होता. आता त्याने नुकत्याच मुलाखतीत यामागचं सत्य उघड केलं आहे.  

कावेरी पिंपळे | Updated: Feb 4, 2026, 10:43 AM IST
गौरव मोरे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडून हिंदी कॉमेडी शोमध्ये जाण्यामागचं खरं कारण समोर

मुंबई: महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या आणि ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणून ओळख मिळवलेल्या गौरव मोरेने आपल्या विनोदबुद्धी आणि अचूक टायमिंगच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप सोडली. त्याचा प्रवास विशेषतः ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमुळे गाजला. या कार्यक्रमातून त्याला प्रचंड प्रसिद्धी, आर्थिक स्थैर्य आणि शोहरत मिळाली, तरीही मध्यंतरी गौरवने या शोमधून पाय काढला आणि प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनला.

Add Zee News as a Preferred Source

गौरव मोरेने हास्यजत्रा सोडल्यावर हिंदी कॉमेडी शो ‘मॅडनेस मचायेंगे’ मध्ये काम केले. नुकत्याच ‘9 माईंड क्रिएशन’ला दिलेल्या मुलाखतीत गौरवने यामागचं खरं कारण सांगितलं. त्याने म्हटलं, 'एकजण येतो आणि म्हणतो, तुमचा रोल मस्तय. तुम्ही येता.. मग कॉमेडी होते. ते विचारायचे की, सर तुम्ही या तारखेला आहात का? तुम्हालाच मस्त भूमिका आहे. त्यात हिरो हिरोइन असतात, त्यांच्यामध्ये तुम्ही येता.. घरात समस्या निर्माण होतात.. तुम्ही येता आणि मग कॉमेडी होते. सतत तेच तेच करून मला कंटाळा आला. म्हणून मी वर्षभर या कामातून ब्रेक घेतला. त्यादरम्यान मी ‘मॅडनेस मचायेंगे’चे एपिसोड केले. कारण हिंदीतून मला बोलावलं होतं. बाकी मला हे करायचं नाही, असं काहीच नव्हतं.'

गौरव मोरेने याआधी ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’, ‘हास्य सम्राट’ यांसारख्या कॉमेडी शोमध्ये भाग घेतला होता. मात्र, अभिनय आणि कॉमेडीत अनुभव नसल्यामुळे तो मोठ्या संधीपर्यंत पोहोचू शकला नव्हता. स्थानिक कार्यक्रमांमध्ये स्टँड-अप परफॉर्मन्स करताना त्याला अनेक अनुभव मिळाले. मात्र ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता, पैसा आणि स्थैर्य दिले.

गौरवने आपल्या यशाबाबत खुलासा करताना सांगितले, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने मला सर्वकाही दिलं पैसा, प्रसिद्धी आणि स्थैर्य. दहा वर्षांपूर्वी माझ्याकडे बस किंवा ट्रेनने प्रवास करण्यासाठी पैसे नव्हते. आता माझ्याकडे कार आणि बाईक आहे. त्या काळी माझ्याकडे शूज नव्हते, आता शूजचं कलेक्शन आहे. आर्थिक परिस्थितीमुळे काही मित्रांनी माझ्याशी बोलणं बंद केलं होतं, पण आता तेच मित्र माझ्या घरी येतात आणि माझ्यासोबत सेल्फी किंवा फोटो क्लिक करतात.'

गौरवचा प्रवास हे दाखवतो की चिकाटी, मेहनत आणि टॅलेंट यांच्या जोरावर एखादी व्यक्ती मर्यादित संसाधनांवरूनही प्रेक्षकांच्या मनावर अमिट ठसा उमठवू शकते. मनोरंजनविश्वात त्याचे नाव आज स्टॅन्ड-अप कॉमेडी आणि हिंदी व मराठी शोमधील कामगिरी यासाठी सन्मानासह घेतले जाते.

गौरव मोरेची ही कथा नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरते, जिथे मेहनत, चिकाटी आणि धैर्य यांच्यामध्ये एकत्रित प्रयत्न केल्यास छोट्या सुरुवातीपासून मोठ्या यशापर्यंत पोहोचता येते.

About the Author

kaveri pimpley

कावेरी पिंपळे सध्या ‘झी २४ तास डिजिटल’मध्ये कंटेंट एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना पत्रकारितेचा चार वर्षांचा अनुभव आहे.

...Read More