मुंबई : या फोटोत दिसणार्‍या या दोन मुली कोण आहेत हे तुम्ही सांगू शकता का? या दोन्ही मुली बॉलिवूडच्या मोठ्या स्टार्स होत्या. एक वयाच्या 11व्या वर्षी तर दुसरी वयाच्या 9 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यातील एक मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये गरिबीत मोठी झाली. एवढंच नाही तर ही मुलगी 60 आणि 70 च्या दशकातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. तरीही तुम्ही ओळखले नाही तरी हरकत नाही. चला जाणून घेऊया या अभिनेत्रींविषयी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोत डावीकडून पहिल्या असलेल्या आहेत अभिनेत्री मुमताज आणि अरुणा इराणी दुसऱ्या आहेत. मुमताज मुंबईच्या झोपडपट्टीत मोठ्या झाल्या. त्यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. तेव्हाही त्यांना माहित नव्हते की एक दिवस त्या भारताच्या जनतेच्या मनावरही राज्य करणार आहेत. मुमताज यांनी वयाच्या 11 व्या वर्षी 'सोने की चिडिया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट 1958 मध्ये प्रदर्शित झाला होता. बालकलाकार म्हणून मुमताज यांनी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या. मुमताज यांनी अनेक चित्रपटांमध्ये खूप स्टंट देखील केले, त्यामुळे त्यांना 'स्टंट हिरोईन' देखील म्हणत असत. यामुळे मुमताज यांच्या करिअरला काही काळ ब्रेक लागला होता.



1969 साली आलेल्या 'दो रास्ते' या चित्रपटानं मुमताज यांच्या करिअरचा कायापालट केला. लवकरच मुमताज या काळातील हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेत असलेल्या अभिनेत्रींपैकी एक ठरल्या. अभिनेत्री म्हणून मुमताज यांनी 'बंधन', 'आदमी और इंसान', 'सच्चा झूठा', 'खिलौना', 'तेरे मेरे सपने', 'हरे रामा हरे कृष्णा' असे अनेक हिट चित्रपट दिले. त्या 60 आणि 70 च्या दशकातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री ठरल्या. 1977 मध्ये मुमताज यांनी अभिनयातून ब्रेक घेतला आणि त्यानंतर 13 वर्षांनी त्यांनी 1990 मध्ये आलेल्या 'आंधियां' चित्रपटातून पुनरागमन केले. या चित्रपटानंतर मुमताज यांनी अभिनयातून रिटायरमेंट घेतली.


दुसरीकडे मुंबईत मोठ्या झालेल्या अरुणा ईरानी यांच बालपण हे अडचणींनी भरलेलं होतं. त्यांचे वडील नाटक मंडळ चालवत होते आणि आई शगुन अभिनेत्री होत्या. आठ भावंडांमध्ये त्या सगळ्यात मोठ्या, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यानं अरुणा इराणी यांना सहावीनंतर शिक्षण सोडावे लागले. घरखर्च भागवण्यासाठी अरुणा यांना अभिनय क्षेत्रात येण्यास भाग पाडले. अरुणा इराणी यांनी वयाच्या ९व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यांनी कोणाकडूनही डान्सचे धडे घेतले नाही, असे असूनही अरुणा यांचं नाव बॉलिवूडमधील उत्तम डान्सर्सच्या यादीत आहे.


अरुणा इराणी यांनी 1961 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गंगा जमना' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. हिंदी व्यतिरिक्त त्यांनी कन्नड, मराठी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अरुणा यांनी त्यांच्या करिअरमध्ये 500 हून अधिक चित्रपट केले, ज्यात त्यांनी आठवणीत राहतील अशा अनेक भूमिका साकारल्या. अरुणा यांनी अनेक चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिकाही साकारल्या, ज्यात त्यांना खूप पसंती मिळाली. याशिवाय अरुणा यांनी अनेक टीव्ही शोमध्ये काम केलं. त्या अजूनही अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत.