'छावा'तील आगीचा सीन कसा शूट झाला हे पाहून चाहते थक्क; मराठमोळ्या मुलीने जीव धोक्यात टाकत...

Chhaava Fire Scene Marathi Stunt Girl: 'छावा' चित्रपट पाहाणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर हा सीन पाहून काटा आला. मात्र या सीनमध्ये दिसलेली तरुणी कोण? तिच्याचसंदर्भात आणि हा सीन कशा शूट केला हे जाणून घेऊयात...

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 18, 2025, 12:04 PM IST
'छावा'तील आगीचा सीन कसा शूट झाला हे पाहून चाहते थक्क; मराठमोळ्या मुलीने जीव धोक्यात टाकत...
तिनेच शेअर केले हे व्हिडीओ

Chhaava Fire Scene Marathi Stunt Girl: छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरआधारित 'छावा' चित्रपटाने तिकीटबारीवर अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला महिन्याभरानंतरही चांगला प्रतिसाद मिळत आहे. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या ऐतिहासिक चित्रपटांमध्ये 'छावा' पहिल्या स्थानी तर सर्व चित्रपटांचा विचार केल्यास कमाईच्याबाबतीत हा चित्रपट तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल मागील काही दिवसांपासून या चित्रपटाच्या शुटींगदरम्यानचे बिहाइंड द सिन्स म्हणजेच चित्रिकरणादरम्यानच्या तयारीचे व्हिडीओ पोस्ट करत आहे. मात्र सध्या इंतरनेटवर मागील आठवडाभरापासून एका मराठमोळ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत असून तिने केलेला हा काही सेकंदांचा सीन अनेकांची मने जिंकत आहेत.

हा सीन नेमका काय? सीनमध्ये दिसणारी तरुणी कोण?

खरं तर ज्यांनी ज्यांनी हा सीन चित्रपटामध्ये पाहिला त्यांच्या काळजाचा ठोका चुकला असं म्हटलं तरी वागवगं ठरणार नाही. मात्र हा सीन जसा पडद्यावर दिसतो तितकाच तो शूट करतानाही धोका पत्करावा लागल्याचं दिसून येतं. ज्या तरुणीने हा सीन प्रत्यक्षात साकारला आहे तिचं नाव आहे, साक्षी सकपाळ! स्वराज्यावर हल्ला करण्यासाठी औरंगजेबची फौज स्वराज्यावर चाल करुन येते तेव्हा एका मेंढपाळाच्या मुलीला ते जिवंत जाळतात असा सीन या चित्रपटामध्ये आहे. या सीनमध्ये दिसणारी मुलगी ही साक्षीच आहे. हा चित्रपटातील सदर सीन हा व्हीएफएक्स नसून प्रत्यक्षात आगीच्या ज्वाला साक्षीने अंगाखांद्यावर खेळत हा सीन शूट केला आहे. साक्षीनेच हा सीन नेमका कसा शूट करण्यात आला याबद्दलची माहिती आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिहाइंड द सीन्स व्हिडीओ पोस्ट करत दिली आहे. 

स्वत: शेअर केला सेटवरील व्हिडीओ

"पहिल्यांदा मी अभिनेत्री आणि स्टंट गर्ल म्हणून 'छावा' चित्रपटामध्ये काम केलं. संपूर्ण दिवस माझ्या या सीनसाठी सेटअप करण्यात आला होता. माझा अभिनय आणि आगीच्या या दृष्यासाठी एक संपूर्ण दिवस ठेवण्यात आला होता. मला हे शूट करताना छान आणि तितकाच विचित्र अनुभवही आला. मला या चित्रपटात काम करता आलं याचा फार आनंद आहे," असं साक्षीने 3 मार्च रोजी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ....

संतोष जुवेकरनही केली कमेंट

'छावा' चित्रपटामधील हा आगीत होरपळतानाचा सीन शूट करण्यासाठी काय विशेष तयारी करण्यात आली यासंदर्भातील कॅमेरामागील घडामोडींचा व्हिडीओ साक्षीने 10 मार्च रोजी शेअर केला आहे. यामध्ये सीनपूर्वी साक्षीने परिधान केलेला विशेष ड्रेस, त्यानंतर तिचा इजा होऊ नये म्हणून घेण्यात आलेली काळजी आणि इतर गोष्टींचा समावेश असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओवर अभिनेता संतोष जुवेकरनेही कमेंट करत, "ग्रेट वर्क" असा शेरा साक्षीला दिला आहे. या मराठमोळ्या स्टंट गर्सनले औरंगजेबची क्रूरता पडद्यावर साकारण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकल्याबद्दल अनेकांनी तिचं कौतुक केलं असून यासाठी फार धाडस लागतं असं म्हणत तिला शब्बासकी दिली आहे. हा व्हिडीओ तुम्ही खाली पाहू शकता...

750 कोटी रुपयांहून अधिक कमाई

'छावा' चित्रपटाने जगभरामध्ये 31 दिवसांमध्ये जगभरामध्ये 750 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. भारताबाहेर या चित्रपटाने 89 कोटी 20 लाख रुपये कमवले आहेत.