`टांग टिंग टिंगा` करत विजय चव्हाण यांनी साकारलेली `मोरूची मावशी`
`टांग टिंग टिंगा`
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं वयाच्या ६३व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं. विजय चव्हाण यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यांच्यावर मुलुंड येथील फोर्टिज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. नाटक, मालिका, चित्रपट अशा तीनही क्षेत्रात विजय चव्हाण यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. विनोदाचं अचूक टायमिंग आणि प्रेक्षकांना आपल्या संवादांनी आपलंसं करण्यात विजय चव्हाण यांचा हातखंडा होता. 'मोरूची मावशी' हे त्यांच नाटकं आजही लोकप्रिय आहे.
'मोरुची मावशी'
विजय चव्हाण यांचं 'मोरुची मावशी' हे नाटक म्हणजे तर रसिकांसाठी हास्याची मेजवानी होती. आजही मोरूची मावशी म्हटलं की विजय चव्हाण यांचंच नाव अग्रक्रमाने येतं. विजय चव्हाण रंगभूमीवर जेवढे रमले तेवढंच त्यांनी सिनेमातही स्वतःला झोकून दिलं होतं. जवळपास ३५० ते ४०० चित्रपटांमध्ये विजय चव्हाण यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्यात. नुकतचं त्यांना महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन गौरवलं होतं. मोरूची मावशी या नाटकातील 'टांग टिंग टिंगा' हे गाणं प्रेक्षकांच्या आजही तेवढंच पसंतीला पडतं.
'मोरूची मावशी' हे संपूर्ण नाटक. विजय चव्हाण यांच्या आठवणींना नक्की उजाळा देणार आहे. आचार्य अत्रे यांनी मोरूची मावशी हे नाटकं लिहिलं आहे. दिलीप कोल्हटकरांनी या नाटकांच दिग्दर्शन केलंय. अशोक पत्की यांनी या नाटकाला संगीत दिलं आहे. यामध्ये विजय चव्हाण, प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन, सुरेश टाकले, विजय साळवी, वासंती निमकर, रोशनमी मुरकर यासारखे कलाकार होते.